मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रविवारी नोव्हाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वेरेव, कार्लोस अल्कारेझ या मानांकित खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीमध्येही आर्यना सबालेंका, कोको गॉफ यांनी विजयी घोडदौड कायम राखली. मिश्र दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा व चीनची शुआई झँग ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. (Australian Open)
सर्बियाच्या सातव्या मानांकित जोकोविचने चौथ्या फेरीमध्ये चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेकाला ६-३, ६-४, ७-६(७-४) असे नमवले. हा सामना जोकोविचने २ तास ३९ मिनिटांत जिंकून १५व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच, या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिकवेळा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझशी होईल. अल्कारेझचा सामना चौथ्या फेरीमध्ये १५ व्या मानांकित जॅक ड्रेपरशी झाला. या सामन्यात अल्कारेझने पहिले दोन सेट ७-५, ६-१ असे जिंकून आघाडी घेतली असताना ड्रॅपरने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. अल्कारेझने मागील वर्षी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले होते. दरम्यान, द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवने फ्रान्सच्या युग हम्बर्टवर ६-१, २-६, ६-३, ६-२ अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत झ्वेरेवसमोर अमेरिकेच्या टॉमी पॉलचे आव्हान आहे. (Australian Open)
महिला एकेरीमध्ये बेलारुसच्या अग्रमानांकित सबालेंकाने रशियाच्या मिरा अँड्रिव्हाला चौथ्या फेरीत ६-१, ६-२ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये सबालेंकाची लढत रशियाच्या अनास्ताशिया पाव्हलूचेंकोवाशी होईल. अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने चौथ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिकला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ५-७, ६-२, ६-१ असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत गॉफ पॉला बॅडोसाशी खेळेल.
दरम्यान, मिश्र दुहेरीमध्ये दुसऱ्या फेरीत बोपण्णा-झँग जोडीची लढत अमेरिकेची टेलर टाउनसेंड आणि मोनॅकोचा ह्युगो निस या चतुर्थ मानांकित जोडीशी होती. तथापि, टेलर-ह्युगो जोडीने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे बोपण्णा-झँग जोडीला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. (Australian Open)
हेही वाचा :
फिरकीपटूंनी साकारला पाकचा विजय