नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पधवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघ तर पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद या पदवीधर मतदारसंघात निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार आहे. तर मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. (Elections for the Pune and Amravati Teachers’ Constituencies have been announced)
मतदान २३ ऑक्टोबरला, मतमोजणी २७ ऑक्टोबरला
निवडणुकीचे वेळापत्रक आज मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी निघणार असून त्याच दिवसापासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर ही ठेवण्यात आली आहे. ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. मतदानाची तारीख २३ आक्टोबर असून मतमोजणी व निकाल २७ ऑक्टोबरला होणार आहे.
२०२० च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश
पाच सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. २०२० ला झालेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, पुणे पदवीधरमधून काँग्रेसचे जयंत आसगांवकर, विजयी झाले होते. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरमधून काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले होते. (Elections for the Pune and Amravati Teachers’ Constituencies have been announced)
महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढणार?
गतवेळच्या २०२० निवडणुकीत पाचही विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपयश आले होते. आता यावेळच्या निवडणुकीत महायुती निवडणूक एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. गावडे यांना टीडीएफ शिक्षक संघटनेने निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गावडे हे भाजपचे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. पंढरपूर येथील प्रा.बी.पी.रोगे हेही भाजपकडून इच्छुक आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
पुणे पदवीधरमधून अरुण लाड, भैय्या माने इच्छुक
पुणे पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अरुण लाड दुसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. अरुण लाड भाजपकडून कि राष्ट्रवादीकडून लढणार हे गुलदस्तात आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भैय्या माने यांनीही पदवीधरमधून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. माणिक पाटील यांनीही भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Elections for the Pune and Amravati Teachers’ Constituencies have been announced)