नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज करू नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी दिल्या आहेत. अशा संरक्षण मोहिमांचे लाईव्ह कव्हरेज टाळण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. (I&B advisory)
‘‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संरक्षण आणि इतर सुरक्षा-संबंधित ऑपरेशन्सशी संबंधित बाबींवर वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागावे. विद्यमान कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे,’’ असे मंत्रालयाने म्हटले आहे. (I&B advisory)
मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमा राबविण्यात येत असताना रिअल-टाइम कव्हरेज करू नये, तशा दृश्यांचा प्रसार किंवा रिपोर्टिंग करण्यात येऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठ्या दहशतवादविरोधी ऑपरेशन्स राबवत असल्याच्या वृत्तांदरम्यान या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः संरक्षण ऑपरेशन्स किंवा हालचालींशी संबंधित ‘सूत्रांच्या’’ माहितीवरून देण्यात येणाऱ्या बातम्या तसेच रिअल-टाइम कव्हरेज, दृश्यांचा प्रसार किंवा वृत्तांकन करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. (I&B advisory)
“संवेदनशील माहिती उघड केल्यामुळे अनवधानाने शत्रूला मदत होऊ शकते तसेच प्रत्यक्ष मोहिमांवर परिणाम होऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकतो,’’ असे त्यात म्हटले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की कारगिल युद्ध, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ले आणि कंधार अपहरण यासारख्या काही घटनांमध्ये, अनिर्बंध कव्हरेजमुळे राष्ट्रीय हितांवर प्रतिकूल परिणाम झाले. (I&B advice) ‘‘ सर्व टीव्ही वाहिन्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांच्या थेट प्रक्षेपणापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशी कारवाई पूर्ण होईपर्यंत सरकारने नियुक्त केलेल्या योग्य अधिकाऱ्याकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या ब्रीफिंगपुरते मीडिया कव्हरेज मर्यादित असू शकते,’’ असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.