Home » Blog » Suruchi Singh : सुरुची सिंहचा सुवर्णनेम

Suruchi Singh : सुरुची सिंहचा सुवर्णनेम

by प्रतिनिधी
0 comments
Suruchi Singh

म्युनिच : भारताची युवा नेमबाज सुरुची सिंहने शुक्रवारी यावर्षी वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून अनोखी सुवर्णहॅट्ट्रिक नोंदवली. म्युनिच येथील आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये १९ वर्षीय सुरुचीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध घेतला. भारताचे हे या स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक ठरले. (Suruchi Singh)

सुरुचीने यावर्षी ब्युनॉस आयरिस आणि लिमा येथे झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदकविजेती कामगिरी केली होती. म्युनिचमध्येही तिने या कामगिरीची पुनरावृत्ती केली. प्राथमिक फेरीत सुरुची ५८८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. चीनच्या याओ क्विआनशुन या फेरीत ५८९ गुणांसह नवा जागतिक ज्युनिअर रेकॉर्ड नोंदवत अग्रस्थानी राहिली. चीनचीच वेई क्विआन ५८३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती. भारताची मनू भाकेरला प्राथमिक फेरीत ५७४ गुण मिळवता आल्यामुळे ती पंचविसाव्या स्थानावर राहिली. परिणामी, तिच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. (Suruchi Singh)

अंतिम फेरीमध्ये सुरुचीने पहिल्या दोन राउंडअखेर १०१.५ गुण मिळवून अग्रस्थानी झेप घेतली. पुढे एलिमिनेशन फेरीमध्ये तिने सातपैकी पाच राउंडमध्ये दहापेक्षा अधिक गुणांचा वेध घेतला. फ्रान्सच्या कॅमिली जेडरेजेस्कीने सुरुचीला अखेरपर्यंत कडवी लढत दिली. एलिमिनेशन फेरीत पहिल्या तीन राउंड्सअखेर सुरुची आघाडीवर होती. मात्र, चौथ्या राउंडपासून कॅमिलीने सरस खेळ करत सुरुचीला मागे टाकले. सहाव्या राउंडअखेर कॅमिलीचे २२२.४, तर सुरुचीचे २२१.९ गुण होते. सुरुची ०.५ गुणांनी पिछाडीवर होती. मात्र, निर्णायक साउंडमध्ये सुरुचीने १०.५ आणि ९.५ असे गुण नोंदवले, तर कॅमिलीला ९.५ व ९.८ इतकेच गुण मिळवता आले. त्यामुळे, सुरुचीने ०.२ गुणांची निसटती आघाडी घेत २४१.९ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. कॅमिली २४१.७ गुणांसह रौप्यपदकाची मानकरी ठरली.

चीनच्या याओ क्विआनशुनने २२१.७ गुणांसह ब्राँझपदक जिंकले. सुरूचीच्या सुवर्णपदकामुळे भारताची या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन ब्राँझ अशी एकूण तीन पदके झाली आहेत. यासह भारत गुणतक्त्यात चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा :
गंभीर मायदेशी परतले
डब्ल्यूटीसी अंतिम सामना रंगतदार स्थितीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00