लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०७ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ७४ धावांच्या आघाडीमुळे आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान होते. चहापानानंतर आफ्रिकेने २८ षटकांत २ बाद १०७ धावा करून विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. (South Africa)
लॉर्ड्सवर सुरू असणाऱ्या या कसोटीत विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात आफ्रिकेची सुरुवात वाईट झाली. स्टार्कने तिसऱ्या षटकातच सलामीवीर रायन रिकलटनला ६ धावांवर बाद केले. त्यानंतर, एडन मारक्रम आणि वियान मुल्डर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. स्टार्कनेच मुल्डरला बाद करून ही जोडी फोडली. मुल्डर ५० चेंडूंमध्ये ५ चौकारांसह २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर, मारक्रमने कर्णधार तेंबा बावुमासह चहापानापर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. चहापानास खेळ थांबला, तेव्हा मारक्रम ४९, तर बावुमा ११ धावांवर खेळत होते. चहापानानंतर मारक्रमने अर्धशतक पूर्ण केले. आफ्रिकेला विजयासाठी अद्याप १७५ धावांची गरज असून ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीची गदा उंचावण्यासाठी ८ विकेट हव्या आहेत. (South Africa)
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात मिचेल स्टार्कने जोश हेझलवुडच्या साथीत झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १४४ धावांवरून डाव सुरू केल्यानंतर रबाडाने दिवसाच्या तिसऱ्या षटकात नॅथन लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाची नववी विकेट काढली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव दीडशे धावांत गुंडाळणे शक्य वाटत होते. मात्र, स्टार्क आणि हेझलवूड यांनी अखेरच्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या. स्टार्कने नाबाद अर्धशतक झळकावताना १३६ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. हेझलवूडने त्याला १७ धावांची साथ दिली. मारक्रमने हेझलवूडला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. आफ्रिकेकडून रबाडाने ४, तर एन्गिडीने ३ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव २१२ आणि दुसरा डाव – ६५ षटकांत सर्वबाद २०७ (मिचेल स्टार्क ५८, ॲलेक्स केरी ४३, जोश हेझलवूड १७, कॅगिसो रबाडा ४-५९, लुंगी एन्गिडी ३-३८) विरुद्ध दक्षिण आफ्रिका – पहिला डाव १३८ आणि दुसरा डाव – २८ षटकांत २ बाद १०७ (एडन मारक्रम खेळत आहे ५४, वियान मुल्डर २७, तेंबा बावुमा खेळत आहे १९, मिचेल स्टार्क २-३७).
हेही वाचा :
सुरुची सिंहचा सुवर्णनेम
गंभीर मायदेशी परतले