कोल्हापूर : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग’ हा विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घोट घेणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राज्यातील तमाम शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असून, हा महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या आजरा येथे झालेल्या सभेत बोलताना मा. खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आजरा येथे शक्तीपीठ विरोधात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या अत्यंत संवेदनशील पट्ट्यातून जात आहे. डोंगर फोडून आणि हजारो वृक्षांची कत्तल करून हा मार्ग बनवला जाणार आहे. यामुळे निसर्गाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल. या महामार्गासाठी हजारो एकर बहुपिक सुपीक जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन होणार आहे. (Struggle will continue until the Shaktipeeth Highway project is cancelled)
या प्रकल्पाचा सुरुवातीचा ८०२ किलोमीटरचा खर्च ८६ हजार कोटी रूपये होता. आता हा प्रकल्प ८५६ किलोमीटर करून प्रकल्प खर्च १ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे म्हणजे वाढीव ५४ किलोमीटरसाठी १४ हजार कोटी व एका किलोमीटरसाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये खर्च होणार आहे. या प्रकल्पातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ७० हजार कोटींचा ढपला पाडायचा असल्याने हा प्रकल्प करण्याचा अट्टाहास ते करत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून राज्यातील १३ जिल्ह्यांत या महामार्गास शेतकरी व ग्रामस्थ कडाडून विरोध आहे. पोलिसांना हाताशी धरून हा प्रकल्प रेटण्याचे काम राज्य सरकार करू लागले आहे. एकीकडे राज्यातील ठेकेदारांचे ७० हजार कोटी देणी प्रलंबित आहेत , कंत्राटी कर्मचारी यांचे पगार झाले नाहीत , आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख प्रमाणे मदत देण्यासाठी ६ हजार कोटींचा खडखडाट असताना राज्यातील जनतेच्या डोक्यावर लाखो कोटीचा बोजा करून यामधून ७० हजार कोटींचा मलिदा गोळा करण्यात येणार आहे. (Struggle will continue until the Shaktipeeth Highway project is cancelled)
यावेळी विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील , मा. आमदार राजेश पाटील , स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर , कॅाम्रेड गिरीष फोंडे, कॅा.संपत देसाई, कॅा. सम्राट मोरे , गोकुळचे संचालक प्रकाश पाटील , जिल्हा बॅंकेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई , शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनिल शिंत्रे , तानाजी देसाई , मुकुंद देसाई यांच्यासह आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. (Struggle will continue until the Shaktipeeth Highway project is cancelled)