Home » Blog » अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री फडणवीस

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
State-of-the-art studio inaugurated by the Chief Minister

मुंबई  :  प्रतिनिधी : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरातील प्राइम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, मुंबई सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. (State-of-the-art studio inaugurated by the Chief Minister)

वर्षात प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभारून जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राइम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे. शासनाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केल्याचे सांगून ‘वेव्ह्स २०२५’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत. या कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे. प्राइम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(State-of-the-art studio inaugurated by the Chief Minister)

संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्राइम फोकसच्या उपक्रमाचे कौतुक करताना, संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम या प्रकल्पातून साकार झाल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही विभागांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्राइम फोकसच्या या परिसरात संस्कृती आणि तंत्रज्ञान एकत्र येऊन समाजासाठी मूल्यनिर्मिती करणारे आदर्श उदाहरण पाहायला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

            ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरचा उल्लेख करताना मंत्री ॲड. शेलार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’च्या संकल्पनेला प्राइम फोकसने प्रत्यक्ष आकार देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. सर्जनशीलता, सांस्कृतिक समृद्धी आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून देशासाठी नवे मानदंड निर्माण करणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांनी प्राइम फोकसच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. 

            प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा म्हणाले, मुंबईतील हा प्रकल्प प्राइम फोकसचे जागतिक मुख्यालय असून भारतीय म्हणून आणि मुंबईकर म्हणून तो अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जगातील सर्वोत्तम दर्जाची सुविधा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आणि राज्य शासनाच्या पाठबळामुळे तो प्रत्यक्षात साकार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (State-of-the-art studio inaugurated by the Chief Minister)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!