नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत आज एका खळबळजनक घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचा एक खासगी सचिव आणि दोन अतिरिक्त खासगी सचिवांना तातडीने पदावरून हटविण्यात आले.
भूपेंद्र यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या कारवाईने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचा मोठा फेरबदल सामान्यतः पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसारच केला जातो. मात्र, सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये केवळ ‘भारत सरकार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. (Three secretaries of Bhupender Yadav have been removed)
३ जुलै रोजी स्वतंत्र आदेश
पर्यावरण मंत्रालयाने ३ जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढून ही कारवाई केली. या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. स्वतः मंत्री भूपेंद्र यादव यांनीही यावर मौन बाळगले आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार, भारतीय महसूल सेवा (IRS)२०१० बॅचचे अधिकारी अमर सिंह यांना “प्रशासकीय कारणास्तव” त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजेच महसूल विभागात परत पाठविण्यात आले आहे. त्यांना तत्काळ प्रभावाने विद्यमान जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आल्याचे संबंधित आदेशामध्ये म्हटले आहे.
अमर सिंह यांची २०२१ मध्ये भूपेंद्र यादव यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी यादव यांच्याकडे कामगार आणि रोजगार मंत्रालयाची जबाबदारी होती. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने जून २०२४ मध्ये त्यांच्या नियुक्तीचा कालावधी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढविला होता. मात्र मुदत संपण्यापूर्वीच त्यांना अचानक हटविण्यात आले. (Three secretaries of Bhupender Yadav have been removed)
दोन अतिरिक्त खासगी सचिवांवरही कारवाई
खासगी सचिवांबरोबरच दोन अतिरिक्त खासगी सचिवांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. शैलेश कुमार सिंह यांना मुदतपूर्व त्यांच्या मूळ संवर्गात परत पाठविण्यात आले असून त्यांच्यावर ‘एक्स्टेंडेड कूलिंग ऑफ’ लागू करण्यात आले आहे. त्यांना तत्काळ कार्मिक व प्रशिक्षण विभागात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुसरे अतिरिक्त खासगी सचिव आयुष सरन यांच्या सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आल्या आहेत. अवर सचिव विभूती पंजीयार यांनी स्वाक्षरी केलेल्या या आदेशाच्या प्रती पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ सचिवालय आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागालाही पाठविण्यात आल्या आहेत. (Three secretaries of Bhupender Yadav have been removed)