Home » Blog » गांधीजींचा महान शत्रू, ज्याला त्यांनी चपला भेट दिल्या

गांधीजींचा महान शत्रू, ज्याला त्यांनी चपला भेट दिल्या

by प्रतिनिधी
0 comments
Smuts slippers gift from Gandhi

ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपरबोअर कमांडोराजकारणीब्रिटिश साम्राज्याचे मंत्रीतत्त्वज्ञवकीलवैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रभावशाली व्यक्ती होते.

मनीष सिंग

बोअर म्हणजे डच नाविकांच्या संतती. ज्यांनी दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप परिसरात वसाहत केली. नंतर ब्रिटिशांनी या भागांवर कब्जा केला, आणि याच संघर्षांना बोअर युद्ध असे म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतील गोरे लोक म्हणजे हेच बोअर. रंगभेद त्यांच्या संस्कृतीत खोलवर रुजलेला होता. पण रंगभेद किती कठोर असावा यावर त्यांच्यातही मतभेद होते. स्मट्स यांना त्यात तुलनेने उदारमतवादी मानले जायचे.

आशियातून मोठ्या संख्येने दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका हा वेगाने वाढणारा देश होता. जगभरातून विशेषतःभारत, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार, अरब देशातू मोठ्या संख्येने लोक तिकडे स्थलांतरित झाले होते. या लोकांबद्दल गोऱ्यांना चीड होती. जितकी आपल्याकडच्या काही लोकांना बांगलादेशी घुसखोरांविषयी असेल. (Smuts slippers gift from Gandhi)

गांधींनी अन्यायी कायद्याविरोधात आवाज उठवला

या स्थलांतरितांना नियंत्रित करण्यासाठी नवे नियम केले गेले. सर्वांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केले. प्रत्येकाला बोटांचे ठसे द्यावे लागणार. रजिस्टेशन आणि बोटांच्या ठशाच्या  तो कागद (आजच्या आधारकार्डसारखा) नेहमी जवळ ठेवावा लागणार. निश्चित मुदतीत सर्वांना हा कागद घ्यावा लागणार होता. तेव्हा एका भारतीयाने आवाज उठवला.  “आम्ही हा कागद दाखवणार नाही.”

यानंतर एक नवा कायदा आला.  हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळ्यांनी एकाच प्रकारे विवाह करावा. ख्रिश्चन शैलीने—“ यू मे किस द ब्राईड”. म्हणजेच एक प्रकारचा सार्वत्रिक नागरी विवाह कायदा. फेरे घेणे, कबूल कबूल, किंवा इतर पारंपरिक पद्धती कायद्यानुसार अवैध ठरल्या. या कायद्याच्या विरोधात गांधी पुन्हा उभे राहिले. (Smuts slippers gift from Gandhi)

गांधीजींची सत्याग्रहाची प्रयोगशाळा

अशा अनेक लढायांनी गांधी हे सरकारची कायमची डोकेदुखी बनले. स्मट्स त्या काळात गृहमंत्री होते. त्यांनीच हे निर्णय लागू केले. त्यांच्या कठोरतेमुळे गांधींनी जेलवास, मोर्चे, उपवास, सत्याग्रह या शस्त्रांची धार अजून तीक्ष्ण केली. जी नंतर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उपयोगी पडली. स्मट्स आणि गांधी यांच्यातील हा संघर्ष आठ वर्षे चालला.आणि हीच वर्षे गांधींच्या सत्याग्रहाची खऱ्या अर्थाने प्रयोगशाळा ठरली. स्मट्स म्हणजे गांधींचे दुश्मन-गुरु. स्मट्स यांनी गांधींना किमान दहा वेळा अटक केली.त्यापैकी चार वेळा मोठी शिक्षा झाली.

 पण प्रत्येक वेळी, गांधी जेलमधून बाहेर आले की त्यांची लोकप्रियता वाढली होती. सरकारशी चर्चा होत असे.  गांधी थोडे माघार घेत असत. स्मट्स थोडी सूट देत असत. आणि मग काही ना काही सवलती मिळत. नोव्हेंबर १९१३ मध्ये गांधींना शेवटच्या वेळेस अटक झाली. ते १९१४ मध्ये सुटले. (Smuts slippers gift from Gandhi)

जेलमध्ये बनवलेल्या चपला स्मटस् ना भेट

काँग्रेस आणि गोपाळ कृष्ण गोखले गांधीना वारंवार भारतात बोलावत होते. म्हणून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या आठ महिन्यांच्या शेवटच्या जेलवासात गांधीजी वेळ घालवण्यासाठी चप्पल बनवायला शिकले. त्यांनी स्वतः बनवलेली एक जोडी चप्पल स्मट्स यांना भेट दिली. गिफ्ट देताना गांधी म्हणाले, “या चपला मी जेलमध्ये बनवल्या. आपण वेगवेगळ्या बाजूने लढलो त्या संघर्षांची ही आठवण समजा.” स्मट्स यांनी त्या चपला आदराने स्वीकारल्या. जपून ठेवल्या.

 स्मट्स नंतर म्हणाले,  “मी त्या अनेक उन्हाळ्यांत घातल्या. पण नेहमी वाटत राहिले. मी त्या महान मनुष्याच्या चप्पलांमध्ये पाय ठेवण्याइतका मोठा नाही.” स्मट्स पुढे वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान राहिले. त्यांच्या कारकिर्दीत रंगभेदाची पूर्ण अंमलबजावणी कधी होऊ शकली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र स्थापन झाले. त्याचा मानवाधिकार जाहीरनामा लिहिणारे मुख्य व्यक्ती कोण होते माहिताय? जनरल स्मट्स. त्यात गांधींची अहिंसा व समानतेचे तत्त्व स्पष्ट दिसते.

गांधीसमोर मी लहान होतो

 ११ सप्टेंबर १९५० रोजी प्रिटोरियात स्मट्स यांचे निधन झाले. त्याआधी ४४ वर्षांपूर्वी गांधींनी पहिला सत्याग्रह केला होता. स्मट्स आयुष्यभर गांधींच्या प्रवासाचे साक्षीदार राहिले. त्या महान शत्रूला जगभर उभे राहताना पाहिले. आणि नंतर एका तुच्छ हल्लेखोराच्या हातून त्यांचा खून झाला, तेही पाहिलं.

 स्मट्स यांच्या डायरीत (Field of Force) त्यांनी लिहिले आहे.  “गांधी गेले. असे वाटते माझ्या आयुष्याचा एक भागही निघून गेला. गांधी हे एकमेव व्यक्ती असे होते ज्यांच्यासमोर मला मी लहान वाटत होतो. आठ वर्षे आम्ही वाघांसारखे भांडलो, पण दूर झालो तेव्हा आम्ही मित्र झालो होतो. दुनियेत पुन्हा गांधीसारखा कोणी येणार नाही.”

स्मट्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने त्या चप्पला देशाला दिल्या. आज त्या चप्पला प्रिटोरियाच्या नॅशनल कल्चरल म्युझिअममध्ये जपून ठेवलेल्या आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00