Home » Blog » Manisha Kayande: वारी आणि अर्बन नक्षल

Manisha Kayande: वारी आणि अर्बन नक्षल

by प्रतिनिधी
0 comments
Manisha Kayande

खरेतर मनीषा कायंदे यांच्यासारख्या दलबदलू आमदारांची दखल घेण्याचे कारण नव्हते. किंवा त्यांची दखल घ्यावी एवढी त्यांची राजकीय योग्यताही नाही. परंतु त्यांनी वारकरी चळवळीसंदर्भात जे विधान केले आहे, त्यामुळे त्यांचा समाचार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Manisha Kayande)

-डॉ. विजय चोरमारे

गेले तीन आठवडे महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघालाय. पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांनी ग्यानबा तुकारामच्या गजराने महाराष्ट्राच्या मनामनात चैतन्य निर्माण केले आहे. विठूरायाच्या ओढीने मार्गस्थ झालेले राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपूरजवळ पोहोचले आहेत. या वारीचा कळसाध्याय म्हणजे आषाढी एकादशी रविवारी ६ जुलैला आहे. मराठी संस्कृतीचा हा आनंदसोहळा टिपेला पोहोचला असताना त्यासंदर्भात एक नवाच वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचे विधान विधिमंडळात केल्यामुळे त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत.(Manisha Kayande)

तर विधिमंडळात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, काही अर्बन नक्षलवादी वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत. देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक व्यक्तींनी आषाढीत वारीत प्रवेश केला आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत सारख्या संघटनांच्या नावाखाली शहरी नक्षलवादी पथनाट्ये सादर करत आहेत. भाषणे देत आहेत. भक्तांच्या विचारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.” (Manish Kayande)

शिंदेंकडून संघाचाच अजेंडा

त्यांनी हे आरोप केले त्यावेळी सभागृहात त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. नंतर सभागृहाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी, मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन झाले. शिंदे यांचे हे आश्वासन म्हणजे ‘सशाला खळगा सामील,’ या पठडीतले म्हणता येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिने मूर्खपणाचे विधान करायचे आणि तेवढ्याच मूर्खपणाचे आश्वासन उच्च पदावरील व्यक्तिने द्यायचे. खरेतर एकनाथ शिंदे यांच्याकडून यापेक्षा वेगळ्या प्रतिसादाची आवश्यकता नाही. कारण भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातल्या ज्या संघटना आहेत, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल वगैरे. तर त्या संघटनांसाऱखीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अवस्था आहे. त्यामुळे त्यांचाच अजेंडा त्यांना चालवावा लागतो. समाजकार्य करणे, वारीमध्ये सुविधा देणे हा भाग वेगळा आणि वारीची परंपरा, तिचा आशय समजून घेणे वेगळे. वारीला हिंदुत्ववादाशी जोडणाऱ्या विद्वेषी लोकांच्या टोळीमध्ये एकनाथ शिंदे सामील झाले आहेत. गेल्यावर्षीही राहुल गांधी यांच्या वारीत सहभागी होण्यावरून एकनाथ शिंदे यांनी असेच काहीतरी भंपक विधान केले होते. (Manisha Kayande)

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, वारकरी सांप्रदाय हा संविधानाच्या गाभ्यात असलेल्या समता, बंधुता, न्याय, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला सांप्रदाय आहे. मनीषा कायंदे ज्या घटकांना अर्बन नक्षलवादी म्हणतात, संविधानाचाच प्रचार करत आहेत. म्हणजेच वारकरी संतांच्याच विचाराचा प्रचार करत आहेत.

तलवारी घेऊन वारीत घुसलेल्या धारकऱ्यांना काय म्हणणार?

गेल्या दोन दशकांपासून वारीचे आणि वारकरी परंपरेचे भगवेकरण करण्याचे प्रयत्न व्यापक पातळीवर सुरू आहेत. वारकऱ्यांना हिंदुत्वाच्या विचारधारेशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बंडातात्या कराडकरांच्यासारख्या मंडळींना प्रोत्साहन दिले. टीव्हीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कीर्तन करणा-यांमधले बहुतांश कीर्तनकार किर्तनाच्या आडून भाजपचा प्रचार करीत असतात. या मंडळींनी वारकरी चळवळ भ्रष्ट केली आहे. वारकरी चळवळीचा प्रवाह दूषित करून टाकला आहे. त्यांचेच प्रतिनिधित्व करणा-या मनीषा कायंदे प्रबोधनाचे काम करणा-या घटकांना अर्बन नक्षलवादी म्हणतात. मग वारकरी परंपरेत नसताना तलवारी घेऊन वारीमध्ये घुसलेल्या धारकऱ्यांना त्या काय म्हणणार आहेत, हा खरा प्रश्न आहे. (Manisha Kayande)

महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वगैरेंनी कायंदे यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीनेही कायंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. वारकरी सांप्रदाय हा कोणत्याही धर्माचा नाही तर तो मानवतेचा पाईक आहे, हे मनीषा कायंदेंनी लक्षात घ्यावे. वारीमध्ये वारकरी संतांच्या विचारांचे व संविधान आचरणाच्या प्रबोधनाचे काम करणाऱ्यांवर अर्बन नक्षलवादी म्हणून कारवाई झाल्यास विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे,” असेही चळवळीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहेत.

गद्दारी करून शिंदे सेनेत

मनीषा कायंदे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्या तरी त्यांची मुळे भाजपमध्ये आहेत.  लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. सुमारे पंचवीस वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं १९९७ मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे २००९ मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. परंतु त्यांच्याशी गद्दारी करून त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या.

शिक्षणाचा बुद्धीशी संबंध असल्याचे मानले जाते. परंतु मनीषा कायंदे यांच्याबाबतीत तसे जाणवत नाही. त्या एमएस्सी पीएचडी आहेत. परंतु त्यांचे ताजे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षणाबाबत शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे.

मनीषा कायंदे यांनी वारकरी चळवळ, संतांची विचारधारा समजून घ्यावी. काही समजले तर एकनथ शिंदे यांनाही समजावून सांगावे. ते त्यांच्याही आणि महाराष्ट्राच्याही भल्याचे राहील. किमान मूर्खपणाची वक्तव्ये तरी होणार नाहीत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00