Home » Blog » मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या गट नोंदणीला ब्रेक

मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या गट नोंदणीला ब्रेक

by प्रतिनिधी
0 comments
Shiv Sena corporators' group registration suspended

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज मंगळवारी कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार होती. पण अचानक शिवसेनेची गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तब्बल ११ दिवस झाले असून मुंबई महानगरपालिकेतील भाजप आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांची सदस्य नोंदणी झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेल्याने भाजपची गटनोंदणी थांबली होती. त्यामुळे शिवसेनेनेही गट नोंदणी थांबवली होती. शिवसेनेने निवडून आलेल्या उमेदवारांना दगाफटका होऊ नये म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवले होते. मुख्यमंत्री दावोसवरुन परतल्यावर दोन्ही गटांची नोंदणी आज मंगळवारी होणार होती. पण आज ही नोंदणी होऊ शकली नाही. (Shiv Sena corporators’ group registration suspended)

संयुक्त गटनोंदणीसाठी भाजपचे प्रयत्न

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढल्याने भाजप आणि शिवसेनेची संयुक्त गट नोंदणी करण्याची इच्छा भाजपची होती. पण एकत्र नोंदणी झाल्यास पाच वर्षे भाजपबरोबर फरफट होईल या भितीने शिवसेनेने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी गट नोंदणी करण्याचे ठरले होते. तयारीही झाली होती. पण अचानक शिवसेनेची गट नोंदणी पुढे ढकलण्यात आली.

शिवसेनेचा स्वतंत्र गटनोंदणीचा प्रयत्न

गटनोंदणीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप शिवसेनेकडून सर्व ११८ नगरसेवकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची इच्छा होती. त्यासाठी दोन्ही पक्षांची एकत्रित कोकण आयुक्त कार्यालयात एकत्र नोंदणी होणार होती. पण शिवसेनेने स्वतंत्र गट नोंदणी करण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेत विशेष समित्या आणि वैधानिक समितीतील सदस्यसंख्येवरुन एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Shiv Sena corporators’ group registration suspended)

शिवसेनेला डावलले जाण्याची भिती

संयुक्त गट नोंदणी केल्यास एकच गटनेता असल्याने भाजपची संख्या ८९  असल्याने त्यांच्याकडे गटनेतेपद जाणार असल्याने शिवसेनेची भूमिका दुय्यम ठरणार आहे. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलले जाण्याची भिती वाटत आहे. दोन पक्षांची स्वतंत्र नोंदणी केल्यास दोन्ही पक्षांना स्वतंत्र पक्ष कार्यालय मिळू शकते. त्यातून दोन्ही पक्षांची स्वतंत्र नोंदणी होण्याची शक्यता आहे. ही नोंदणी उद्या व परवा होण्याच् शक्यता आहे. गट नोंदणी जेवढी उशिर होईल तेवढा वेळ महापौर निवडीला होणार आहे.  (Shiv Sena corporators’ group registration suspended)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00