कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. सर्वाधीक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी, शिवसेनेला यश आले. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचा वचपा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Undalkar elected as Chairman of Satara District Bank)
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ संचालकांपैकी भाजपचे सर्वाधीक ९ संचालक निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक विजयी झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आली आणि बँकेवर सत्ता स्थापन केली. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अर्ज भरला. पण त्यांच्याविरोधात अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झाली.
या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका महत्वाचे ठरली. सर्वाधीक ९ जागा जिंकल्यानंतर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी भूमिका मांडली होती. तर अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादी शिवसेनेने एकत्र येत गणित जुळवत बँक ताब्यात घेतली. (Undalkar elected as Chairman of Satara District Bank)
जिल्हा परिषदेचा वचपा बँकेत काढला.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असून भाजपने एक मताने विजय मिळवत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद खेचून आणले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले निवडून आले होते. या निवडीच्यावेळी अभूतपूर्व गोंधळ उडाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतदारांना रोखण्यासाठी भाजपने पोलिसी बळाचा वापर केला होता. यावेळी शंभूराजे देसाई आणि मकरंद देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. देसाई यांच्या हाताला दुखापत झाली होती. जिल्हा परिषदेतील पराभवाच वचपा शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील यांनी काढला.
उंडाळकर घराण्याचे बँकेवर पुन्हा वर्चस्व
बँकेचे नुतन अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर याचे वडील दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे जिल्हा बँकेवर अनेक वर्षे वर्चस्व होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांनी लक्ष् घातल्यानंतर बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली होती. आता विलासकाकांचे पुत्र उदयसिंह यांची बँकेच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याने उंडाळकर घराण्याकडे सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थेची सत्ता पुन्हा ताब्यात आली आहे. उदयसिंह पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
दीपक चव्हाण यांचे पुनर्वसन
उपाध्यक्ष दीपक चव्हाण हे माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक मानले जातात. ते फलटणचे आमदार होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बँकेत उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. (Undalkar elected as Chairman of Satara District Bank)