Home » Blog » ‘नीट’ सारखाच ‘सीईटी’ परीक्षेत घोटाळा; विरोधकांचा आरोप

‘नीट’ सारखाच ‘सीईटी’ परीक्षेत घोटाळा; विरोधकांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Scam in the CET exam

मुंबई : प्रतिनिधी : देशभर वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना आता  महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेतील निकालात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पण महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली आहे. सध्या पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Scam in the CET exam)

राज्यातील एमएचटी-सीईटी २०२६ परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा आणि अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप काँगेसचे सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांनी केला आहे.  या आरोपामुळे नीटच्या वादानंतर आता राज्यातील अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या या सीईटी प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परीक्षा केंद्रे मॅनेज केल्याचा आरोप

ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटात अवघे ३५ ते ४० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना सीईटी परीक्षेत  ९९ ते १०० पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर एका शिक्षकाचा सुमारे ३० मिनिटांचा सीईटी परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मेरिट रँकिंगमध्ये पैशांच्या जोरावर फेरफार केल्याचा आणि गुण वाढवल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, संभाजीनगरमधील एका खाजगी क्लास चालकाची ऑडिओ क्लिपही समोर आली असून, त्यात पैशांच्या मोबदल्यात पर्सेंटाईल वाढवून देण्याचे आश्वासन पालकांना दिल्याचा आरोप  केला आहे. परीक्षेसाठी काही विशिष्ट संगणक प्रयोगशाळा आणि परीक्षा केंद्रे गैरप्रकारांसाठी मॅनेज केली गेल्याचा संशय विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केला जात आहे. (Scam in the CET exam)

सीईटी सेलने आरोप फेटाळले

 या  सर्व प्रकरणावर महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आपली अधिकृत भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळले आहेत. गुण पद्धतीमधील फरकाबाबत सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  बारावीची बोर्डाची परीक्षा थिअरी स्वरुपात असते  आणि सीईटी प्रवेश परीक्षा एमसीक्यू स्वरुपात असते. दोन्ही परीक्षांचे  स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. अनेक विद्यार्थी केवळ सीईटीला प्राधान्य देऊन अभ्यास करतात, त्यामुळे टक्केवारी (Percentage) आणि पर्सेंटाईल (Percentile) यांची थेट तुलना करणे चुकीचे आहे असा दावा सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केला. परीक्षा केंद्रांचे वाटप पूर्णपणे संगणकीकृत आणि ऑटोमेटेड पद्धतीने केले जात असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सायबर सेलकडे तक्रार

  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सद्वारे परीक्षेची नाहक बदनामी केली जात असल्याचा दावा करत सीईटी सेलने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या कथित दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Scam in the CET exam)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!