मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ते सलग तीन वेळा काँग्रेसचे आमदार होते. २०२४ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. ४५ वर्षे आमदारकी असलेल्या काँग्रेस निष्ठावंत थोपटे घराणे अशी ओळख असलेल्या घराण्यातील संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ‘निष्ठा राखून पक्षाचे काम केले पण निष्ठेचे फळ मिळाले नाही’, अशी खंतही संग्राम थोपटे यांनी भाजप पक्ष प्रवेशानंतर व्यक्त केली. (Sangram Thopate)
मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात संग्राम थोपटे यांचा प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहूल कुल यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. भाजप प्रवेशानंतर संग्राम थोपटे म्हणाले, तुम्ही काँग्रेस का सोडली असे अनेक लोकांनी प्रश्न विचारले. गेली अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांनी काँग्रेस रुजवली. असे लोक विचारत होते. पण ही वेळ काँग्रेसने आणली आहे. (Sangram Thopate)
संग्राम थोपटे म्हणाले, गेली पाच सात वर्षे मी या परिस्थितीचा विचार करत होते. विधीमंडळात अनेक भाजप नेते मला वारंवार विचारायचे संग्राम निर्णय घ्या, किती दिवस तुमच्यावर अन्याय होतोय. पण मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळे या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो. विधानसभा निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला. परत खंत एवढीच की निष्ठा राखून पक्षाचे काम केले पण निष्ठेचे फळ मिळाले नाही. संघर्षाच्या भूमिकेतून सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिष्द, नगरपालिका असतील तिथे एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पक्षाची ताकद मिळो ना मिळो. काँग्रेस पक्ष वाढवण्याचे प्रामाणिक काम केल्याचे थोपटे म्हणाले. (Sangram Thopate)
ते म्हणाले, निवडणूक झाल्यापासून कार्यकर्ते येऊन सांगायचे दादा आपल्याला काही निर्णय घ्यावे लागणार आहे. मी त्यांना शांत करायचे. पण माझ्याही डोक्यावरुन पाणी चालले होते. मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून फडणवीसांसोबत संबध आहेत. फडणवीसांनी वेळोवेळी काम केले आहे. शब्द दिल्यावर कधी पडू न देणारे नेतृत्व आहे. हा मावळा स्वाभिमानी आहे. अनेकवेळा खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. आम्ही कधी स्वाभिमान गहाण ठेवत नाही. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा परिसर आहे. मला काही मिळावे म्हणून मी इथे आलेलो नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या मतदारसंघातील जनेतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने प्राधान्य द्यावे अशी आग्रहाची विनंती थोपटेंनी केली. (Sangram Thopate)
हेही वाचा :
‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय
काटामारीवर आळा घालण्यासाठी ‘एआय’ वापर करा
हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!