सांगली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पडळकरांच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटांसह महाविकास आघाडीचे नेतेही रस्त्यांवर उतरले. पडळकरांच्या निषेधार्थ सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैयर्शील मोहिते पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार विशाल पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री राजेश टोपे सहभागी झाले होते. नेत्यांनी पडळकरांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. (Sangli Morcha)
लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल आमदार विश्वजीत कदम यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांचा आदर सन्मान राखला. पण दुर्दव्याने कुठेतरी राजकीय खंड पडला आहे. पक्षाच्या नेतृत्वासमोर किंवा कुठेतरी त्यांना नेत्यांच्या समोर प्रसिद्धी मिळावी, असे वाटते. लवकर आपल्याला काहीतरी मिळाले म्हणुन असे बोलण्याचे पाप काही जण करत आहेत अशी टीका कदम यांनी पडळकरांवर केली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, असेच बोलत रहा आपल्या ओरिजनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, आपण ओरिजनल कसे आहोत हे सर्वांना समजू द्या. असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांची अप्रत्यक्षरित्या पडळकर आणि भाजप नेत्यांना लगावला आहे. वाचाळविरांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने निच्चोत्तम पातळी गाठली आहे. मोठ्या नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पडळकरांनी राजारामबापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर टीका करुन चूक केली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आईबद्दल असे बोलले असते तर तुम्ही ऐकून घेतले असते का? असा सवालही आव्हाड यांनी केला. (Sangli Morcha)
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, चांगल्याला चांगले म्हणायचे आणि वाकड्यात कुणी शिरलं तर तगंडे मोडून काढायचे हे संस्कार आहेत. आम्हालासुद्धा ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत शिव्या देता येतात. पण महाराष्ट्र शिव्यासमोर नव्हे तर विकासाच्या ओव्यासमोर नतमस्तक होते याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.
यावेळी खासदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या पक्ष नेत्यांना सल्ला दिला. ते म्हणाले, आपल्या आमदारांना आवरा अन्यथा दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातच एक दिवस जावे लागेल. पडळकर यांचे आरोप हे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची दिशा विचलित करण्याचा प्रकार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत हे सरळ सरळ दिसत आहे. आजवर कोणीही वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करत नव्हतं मात्र सध्या राजकारणाचा दर्जा ढासळत चालला आहे .यावरून राज्यात जातीय दंगली सुरू झाल्यात असे चित्र आहे. असे लंके म्हणाले. आमदार पडळकर पोलिस घेऊन फिरत आहेत. त्यांनी पोलिस बाजूला ठेवावेत. बघूया कुणाच्यात किती दम आहे असा इशाराही खासदार लंके यांनी दिला. (Sangli Morcha)
दिलीप तात्या पाटील यांनी पडळकर आणि सदाभाऊ यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. राजाराबापू पाटील आणि वसंतदादा पाटील राजकीय विरोधक असले तरी ते एकमेकांचा आदर करत होते. पण त्याच राजारामबापू पाटील यांच्यावर आमदार पडळकर यांनी टीका करुन चूक केली आहे. बापूसाठी आम्हीही काहीही करायला तयार आहे. यापुढे करेक्ट नाही तर कार्यक्रमच करणार असा इशाराही दिलीप तात्या पाटील यांनी दिला.
खासदार विशाल पाटील यांची मोर्चातील उपस्थिती लक्षणीय ठरली. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात राजकीय आणि वैचारिक संघर्ष असला तरी ते एकमेकांचा आदर करत होते. जयंत पाटील आणि आमचे राजकीय वैर आहे. त्यांना आम्ही राजकीय विरोधक, शत्रू समजतो. पण शत्रूच्या आईबद्दल सुध्दा असे ऐकूण घेण्याचे वाईट संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. महाराष्ट्राचे राजकारण दुषित झाल्याने आता सर्वांनी एकत्र होण्याची गरजही विशाल पाटील यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिशीर शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. पडळकरांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र तुमच्यासमोर छी थू करत आहे. फडणवीसांनी असेच नेते पाळावेत, त्यामुळे तुमचे भवितव्य संपणार आहे असा इशारा दिला.