राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. युती, आघाडीसाठी नेतेमंडळीमध्ये चर्चेच्या फेऱ्या रात्रंदिवस सुरू आहेत. इलेक्ट्रिव्ह मेरिट लक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतला आहे. पक्षाचे संख्याबळ वाढवण्यासाठी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणेच नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. खासदार आमदारांचे नातेवाईकही त्यात पुढे आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षात चर्चा सुरू असल्या तरी जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीकडून कोणाचाही उमेदवारी जाहीर झाली नसतानाच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच मुलगा कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. सोशल मिडियात सक्रीय असलेल्या कृष्णराज यांना फॅन फॉलोअर्स मोठा आहे. २०२४ विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. त्याच कृष्णराज महाडिक यांनी महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढण्याची घोषणा केली निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरल्याने भाजपसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खळबळ उडाली.
सतीश घाटगे
कृष्णराज महाडिक यांनी शनिवारी भाजप उमेदवार म्हणून अर्ज भरला. अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राज्यातील नेते आणि जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फॉर्म भरल्याने भाजपमधील महाडिक गटात उत्साह संचारला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझ्या उमेदवारीच्या निर्णयावर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा सहभाग नाही. मी स्वत: निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील वरिष्ठांनी तसा निरोप दिल्यानेच मी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा पक्षाचा निर्णय
कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरल्यानंतर शहरात जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. पण रविवारी सकाळी अचानक एक बातमी धडकली. कृष्णराज महाडिक उमेदवारी अर्ज मागे घेणार. त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. कृष्णराज यांनी तडकाफडकी माघार का घेतली याबाबत तर्क वितर्क लावले जाऊ लागले. पण कृष्णराज यांनी माघार का घेतली याचे स्पष्टीकरण त्यांचे वडील खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्रित महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत. त्यामुळे साहजिकच भाजपच्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी संधी देता येत नाही. अशा स्थितीत खासदार, आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही कृष्णराज यांची माघार घेतली आहे.
मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता
कृष्णराज महाडिक यांनी सांगितले आहे की मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाचा निर्णय झाल्याने मी निवडणूक मी लढणार नाही. भाजप शिस्तबद्ध संघाटना असून पक्षाचा आदेश शिरसावंध मानतो. मी निवडणूक लढणार नसलो तरी माझ्या नावचा विचार झाला ही सुद्धा जमेची व समाधानाची बाब आहे. यापुढे मी समाजकारणात कार्यरत राहीन.
घराणेशाहीच्या आरोपामुळे माघार?
कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरणे आणि तडकाफडकी माघार घेण्याचा निर्णय या मागे कोणते कारण आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. खासदार महाडिक यांनी खासदार, आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे असे कारण सांगितले. खासदार महाडिक यांच्या घरात त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक आमदार आहेत. आमदार महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या गोकुळच्या संचालक आहेत. यापूर्वी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही होत्या. आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास त्या इच्छुक आहेत. एकाच घरात अनेक पदे असताना परत कृष्णराज यांना उमेदवारी दिल्यास भाजपवर घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्यता असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जाते. त्यातच महाडिक यांनी प्रतिक्रिया देताना आमदार, खासदारांबरोबर पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक पक्षांकडे उमेदवारी मागत आहेत. खासदार पुत्र जर निवडणुकीतून माघार घेत असतील तर पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी पक्षाकडे का उमेदवारी मागावी असाही सूर निघण्याची शक्यता आहे. कृष्णराज यांनी माघार घेतल्याने त्यांची प्रतिमा उजळेल असा दावाही महाडिक गटांकडून केला जात आहे.
शिवसेनेच्या सत्यजीत कदम यांचा कृष्णराज यांच्या उमेदवारीला विरोध?
कृष्णराज यांच्या उमेदवारीला मित्र पक्ष शिवसेनेने विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामागे २०२४ ची विधानसभा निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा महायुतीत सुरू आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून सत्यजीत कदम निवडणूक लढण्यास इच्छुक होते. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते परत कोल्हापूर उत्तर मध्ये निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी करत होते. त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. सत्यजीत कदम आणि खासदार महाडिक हे जवळचे नातलग असून सत्यजीत कदम यांनी प्रत्येक निवडणुकीत महाडिक गटाच्या मागे ताकद लावली होती. त्यासाठी विरोधकांनाही अंगावरही घेतले होते. पण खासदार महाडिक यांनी सत्यजीत कदम यांच्याऐवजी मुलगा कृष्णराज यांच्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी मागितल्याने सत्यजीत कदम नाराज झाले. या नाराजीमुळे गेले वर्षभर त्यांच्यात आणि महाडिक यांच्यात वेगाने अंतर पडले आहे. एकीकडे सत्यजीत कदम महानगरपालिका निवडणुकीच्या रणनितीत सक्रीय सहभागी झाले असताना कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने भविष्यात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला धक्का बसू शकत असल्याने त्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. प्रभाग तीन हा सत्यजीत कदम यांचा बालेकिल्ला आहे. सत्यजीत कदमांचा विरोध पत्करुन निवडणूक लढवणे ही धोक्याची घंटा असल्याने कृष्णराज महाडिक यांनी ताबडतोब माघार घेतल्याची चर्चा आहे. कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? खासदार महाडिक प्रभाग तीनमध्ये कोणाच्या मागे ताकद लावणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. तुर्तास कृष्णराज महाडिक यांचा सक्रिय राजकारणाचा मुहुर्त हुकणार की निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार हे दोन जानेवारीपर्यंत स्पष्ट होणार आहे.