चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या पुस्तकाची ओळख करून देणारा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, कादंबरीकाराचा हा लेख. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)
श्रीकांत देशमुख
अगदी सुरवातीला हे नमूद केले पाहिजे की, तद्दन भिकार, आत्मकेंद्री, बाजारू, जाहिरातबाज साहित्य संस्कृतीच्या गदारोळात असे आत्मकथन वाचायला मिळणे हा केवळ अपूर्व योग आहे. ‘काळ्या निळ्या रेषा’ हे राजू बाविस्कर यांचे आत्मकथन राजहंस प्रकाशनाने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले. त्यापूर्वी त्याचे काही भाग युगवाणी मासिकातून प्रकाशीत झालेले. याचे श्रेय प्रफुल्ल शिलेदार यांना नक्कीच द्यायला हवे. या भागातूनच लेखक काहीतरी खूप आतले काही देऊ पहातोय याचा अंदाज आलेला. मुळात चित्रकार म्हणून ओळख असलेले बाविस्कर हे असे काही लिहितील असे मलाही वाटले नव्हते. त्यामुळे त्यांचे आत्मकथन हा त्यांना ओळखणाऱ्यांसाठी एक प्रकारचा धक्का होता. साठीच्या उंबरठ्यावर या लेखकाला असे काही लिहावेसे वाटावे हीच मुळात आश्चर्य वाटावी अशी बाब होती.
संत परंपरेशी नाते सांगणारा विद्रोह
मुळात कला कोणतीही असो, अभिव्यक्तीचे प्रभावी असे साधन असते. बाविस्कर हे या अर्थाने आपल्या रंगातून त्यांचे आत्मचरित्र कथन करीत होतेच. त्यांच्या चित्रातले रंग दैन्य, दारिद्र्य यांना मिसळून येणारी उदासी घेऊन कॅनव्हासवर उतरत होते. एक व्यवस्था या रंग आणि रेषातून थेटपणे समोर येत होती. ही व्यवस्था नाकारले गेलेल्यांची व्यवस्था होती. त्याच्यात असणारे उघडे नागडेपण मनाला दंश करणारे होते. हा चित्रकार जे काही चितारायचा त्यात नकारापेक्षा, नाकारले जाणे अधिक प्रभावी होते. कारण त्यात असणारा संयतभाव हा थेट विद्रोह मांडणाऱ्या जातकुळीचा वाटत नव्हता. जो समंजसपणाचा, नकार पचवून व्यक्त होण्याचा भाव होता तो इथल्या संत परंपरेशी नाते सांगणारा होता.
हा गुण राजू यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे, जो ते आपल्या व्यक्त होण्यातूनही टाळू शकले नाही. असे असणे हे चांगले की वाईट, हा प्रश्न पुन्हा वेगळा आहे पण हा चित्रकार जेव्हा लिहू लागला तेव्हा त्याच्या या असण्याचा अतिशय खोलवर परिणाम त्याच्या लेखनावर झाला, हे त्याच्या या कथनातून दिसते. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)
आत्मकथनाची एक समृद्ध परंपरा मराठी साहित्यात आहे. दलित आत्मकथने असोत की इतर. परिपक्व आत्मकथनाचे महत्वाचे वैशिष्ट्य हे असते की जे एकाच वेळी आत्मशोध आणि समाजशोध घेत असते. राजूचे आत्मकथन यासाठी महत्वाचे आहे की जे रूढार्थाने ‘दलित आत्मकथन’ या परंपरेला छेद देणारे आणि व्यापक मानव्यभाव व्यक्त करणारे आहे. ज्यात कुठे कोणाविषयी असूया, द्वेष नाही. आत्मकथनात लेखक खूपदा खोटे बोलत जातो. सेल्फ ग्लोरिफिकेशन करत जातो. आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असा कुठलाही सोस नसलेले हे आत्मकथन आहे.
माणूस जातीचे लेखन
हे आत्मकथन द्वेषपूर्ण नाही, म्हणून मला आवडावे का? मी सवर्ण आहे, म्हणून मला आवडावे का? याचे उत्तर माझ्या बाजूने नकारार्थी आहे. सवर्ण अवर्ण यापलीकडे जाऊन, एक माणूस म्हणून जात असते, त्याचा विचार करणारे लेखन मराठीत खूप कमी लिहिले जाते. त्याला ‘आवाज’ नसतो. त्याची आपली एक नम्र आवाहन करणारी भाषा असते, जी मुळात फार कमी लोकांना कळते. राजुची भाषा त्या वळणाची आहे.
मातंग म्हणजे मांग, या जातीत जन्माला आलेला हा नायक आहे. ठोक्याचे लासुर हे त्याचे गाव. हा नायक सगळा गाव, शिवार आपल्या पोटात घेताना दिसतो. ‘माणसांमध्ये राहूनही माणसांपेक्षा गुराढोरांनीच पोटाची भूक भागवली’ असे तो म्हणतो. शेती नसूनही शेती कसणारा कृषक या रीतीने दलित आत्मकथनातून प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणीचे पक्षी’ यानंतर राजुच्या आत्मकथनातून पहिल्यांदा आलेला दिसतो.
नायकाची दूधमाय वडार जातीतली आहे. या अर्थाने तो दोन मायचा आहे. इथे पुन्हा हे आत्मकथन आपली कक्षा आणखी व्यापक करते. ज्यात जातीभेद किती गौण असतात, माणूसपण मोलाचे असते, हे लेखक सहजपणे सुचवून जातो, ज्यात कुठलीही पोझ नाही, अविर्भाव नाही. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)
अनेक व्यक्तिचित्रांतून साकारलेले
‘…रेषा’ हे आत्मकथन अनेक अतिशय तरल व्यक्तिचित्रातून साकारले आहे. अनेक व्यक्तिचित्रांचा हा एक देखणा कोलाज आहे. दुधमाय, कमली, नबा, रंगूभाई, धुपी, सिकंदर काका असे कितीतरी वेगवेगळ्या जातीचे लोक यात आहेत. नायकाला ‘भुऱ्या’ म्हणून हाक मारणारी नबा असो की पवा वाजवणारा धुडक्या सारेच प्रचंड संमोही. धुडक्या जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या सरणात पवा शोधणारा नायक मनाला गोठून टाकतो.
खंड्या काका हे असेच एक व्यक्तीचित्र. चोऱ्या माऱ्या करणारा हा खंड्या. तो म्हणतो, ‘श्रीमंतांच्या विहिरीचं घागरभर पाणी गरिबांना वाटलं तर विहिरींना काय फरक पडतो?’ इथे हे आत्मकथन थेट अण्णा भाऊंना स्वतःला नकळत जोडून घेते. यात कुठलीही कृत्रिमता नसते, सोस नसतो.
गावातल्या सोंगात हनुमान साकारणारा सिकंदर काका ही अशीच एक अफलातून गोष्ट ( जय श्रीराम वाल्या तथाकथित लोकांनीही ही समजून घ्यावी अशी ). नायक म्हणतो, ‘काकासारखे लोक खेड्यात होते म्हणून हा देश माझ्यासाठी खेड्यात होता.’ यावर वेगळे भाष्य करण्याची गरज भासू नये इतके हे प्रभावी आहे.
अतिशय एकाकी जगणारी विमला मावशी. लेखकाला ती शबरी सारखी वाटते. तिच्या दारासमोरची लिंबाची दोन झाडे मनाला उदासी देऊन जातात.
अशा असंख्य अतिशय तरल, वेदनादायी, प्रगल्भ व्यक्तिचित्रातून लेखक स्वतःला उसवत जातो. स्वबद्दल बोलत बोलत त्याचा चराचर सांगत जातो. हे सगळं वाचताना वाचकाला भान रहात नाही. वाचक आपली जात, धर्म विसरून जातो. लेखनाचे सामर्थ्य या पेक्षा वेगळे नसते. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)
आंबेडकर, अण्णा भाऊंना समजून घेणारा
झडी, ग्रहण यासारखी अतिशय स्वतंत्र वाटावी अशी काही प्रकरणे यात आहेत. झडीच्या काळात जात धर्म विसरून महार मांग आदिवासी साठी राममंदिर खुले करून देणारे सवर्ण यात आहेत. नायक हे सगळे निरलसपणे सांगत जातो. तो कोण गढी बुरुजावर रहात होते याबद्दल नाही बोलत. तो सुडाची भाषा नाही वापरत. तो व्यापक अश्या माणूसपणाच्या शोधात असताना दिसतो. त्या त्या काळातली एक व्यवस्था असते. वाईट असेल, चांगली असेल. त्यातले मानवी काय आहे, याचा शोध नायक घेताना दिसतो.
बँड वाजवणारा हा नायक, डल्या खाणारा हा नायक कुठल्याही अर्थाने सुडाची भाषा बोलत नाही. तो बाबासाहेब आंबेडकर यांनाही समजून घेणारा आहे, अण्णाभाऊ साठे यांनाही. तो अकारण आकांडतांडव करताना दिसत नाही. पुन्हा पुन्हा जाती बद्दल बोलताना दिसत नाही. एक व्यापक असा परिप्रेक्ष तो मांडत जातो.
समतेबद्दल आग्रही नायक
हे आत्मकथन एक व्यवस्था समोर ठेवते. ज्यात सवर्ण, दलित, आदिवासी सगळे आहेत. शिवार आहे, जंगल आहे, ऊन पाऊस सगळे आहे. तळातल्या जगण्याचा अंधार आहे. दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळे आहे. गावातल्या पोरांना भीक कशी मागावी हे शिकवणारा नायक कुठेही सुडाची भाषा बोलत नाही पण समतेबद्दल खूप आग्रही आहे. इथेच तो व्यापक अश्या भारतीय संत परंपरेशी आपले नाते सांगून जातो नकळत. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)
राजू बाविस्कर यांचे हे आत्मकथन का मोलाचे ठरावे? या प्रश्नाचे उत्तर हे आत्मकथन वाचल्यानंतरच मिळू शकते. ही गावगाड्यातल्या अगदी तळातली गोष्ट आहे. गावाला नकार देण्यापेक्षा गाव म्हणजे समूह संस्कृती समजून सांगणारी ही गोष्ट आहे. शेती आणि शेतकरी समुदायाला भिडून पण समांतरपणे जाणारी ही प्रदीर्घ कहाणी आहे. खंड्या कुत्र्याच्या निमित्ताने एक निखळ आदीमत्व निसर्गाच्या कुशीत शिरून सांगणारी ही गोष्ट आहे.
मुळात ही एक मोलाचा चित्रकाराची घडण्याची गोष्ट आहे. हे सगळं वाचताना त्याची चित्रे आपल्याला उमगत जातात. फाडलेली जनावरं, उदास माणसं, कुत्रे, एक बोजड अवकाश सारे काही. हा चित्रकार या आत्मचरित्रातून आपल्या चित्रांचे आरंभबिंदू जणू शोधू पहातोय असे कायम वाटत जाते. अमूर्तातुन मूर्त होत जाणारे हे आत्मकथन एका शुद्ध वर्तमानाची आस बाळगते.
वर्तमानात बरेच लोक आत्मकथा लिहीत आहेत. त्या सगळ्यांपेक्षा राजू बाविस्कर यांचे हे कथन वेगळे आहे. ते कोणाला अकारण उपदेश करत नाही, कोणाचा मत्सर वा द्वेष करत नाही, तत्वज्ञान सांगत नाही, ते जगणे सांगते, जगणे पोझ न घेता बोलत जाते. ज्यात कुठलाही अविर्भाव नाही. त्यात आत्मशोध आहे, त्याचबरोबर समूहशोध आहे.
मराठीतील आत्मकथन परंपरेला समृद्ध करणारे हे आत्मकथन अनेक कारणांसाठी मोलाचे ठरावे असे आहे. (Sahitya Akademi award to Raju Baviskar)