कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलन खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री. कश्यप यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. असून तब्बल १३ वर्षानंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतक-यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकाला गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. (Raju Shetty’s acquittal)
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी आंदोलने करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलिस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपुर्वक हा गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा बारा हत्तीचे बळ आले आहे. शेतकरी हा न्याय हक्कासाठी व घामाच्या दामासाठी संघर्ष करत होता आणि तो यापुढेही लढतच राहणार आहे. (Raju Shetty’s acquittal)
शिरोली येथे झालेल्या घटनेनंतर सुरवातीस वडगांव न्यायालयात कामकाज चालले. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आले. गेली १५ वर्षे या आंदोलनातील आरोपी असलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते न्यायालयाच्या पाय-या झिजवित होते. अखेर प्रदीर्घ वर्षानंतर सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शेतकरी संघटनेकडून ॲड ब्रिजेश शास्त्री, ॲड श्रेणिक पाटील, ॲड अमेय मकरे, ॲड, सुवर्णभद्र पाटील, ॲड टी. वाय. जाधव, ॲड. प्रिती चिटणीस, ॲड ऋषिकेश काकडे, ॲड ऋषिकेश शास्त्री, ॲड. व्ही व्ही डोईजड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. (Raju Shetty’s acquittal)