Home » Blog » सह्याद्रीच्या कुशीत माशाच्या नव्या जातीचा शोध

सह्याद्रीच्या कुशीत माशाच्या नव्या जातीचा शोध

by प्रतिनिधी
0 comments
Discovery of a new species of catfish

पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण आढळते, जे या माशाला लपण्यासाठी व अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देते. (Discovery of a new species of catfish)

माशाचे नामकरण ‘अम्लीसेप्स वायव्य’

स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अभिषेक शिर्के यांचा या संशोधनात सहभाग होता. नव्याने शोधलेल्या माशाचा समावेश अम्लीसेप्स या कुळामध्ये करण्यात आला आहे. पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अधिवास असणाऱ्या या माशाचे नामकरण ‘अम्लीसेप्स वायव्य’ असे करण्यात आले आहे. या प्रजातीच्या उत्तर-पश्चिम म्हणजे वायव्य घाटातील वास्तव्याच्या संदर्भाने हे नाव देण्यात आले आहे. (Discovery of a new species of catfish)

माशाच्या प्रजातीची नोंद गोवा, महाराष्ट्रात

दुभंगलेली शेपटी, अपूर्ण मध्यरेषा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या रचनेचा अभाव, तसेच शेपटीच्या भागाशी एकरूप न होता स्पष्टपणे वेगळी असलेली कल्ल्यांची रचना असे या माशाचे रूप आहे. त्यामुळे या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ओळख मिळते. गोवा राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी हा परिसर पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता जपणारा एक महत्त्वपूर्ण अधिवास मानला जातो. या प्रजातीची नोंद सध्या गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील काही मर्यादित ठिकाणांवरूनच झाली आहे. या दोन्ही ठिकाणांमधील अंतरही लक्षणीय असल्यामुळे या प्रजातीची उपस्थिती खूपच कमी आणि विखुरलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास केवळ या प्रजातीचेच नव्हे तर गोड्या पाण्यातील इतर अनेक माशांच्या प्रजातींचेही संरक्षण होऊ शकते. मात्र खाणकाम, औद्योगिक सांडपाण्याचा निचरा, मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडल्या गेलेल्या माशांच्या परकीय प्रजाती यांसारख्या घटकांमुळे येथील जलपरिसंस्थांवर धोका निर्माण होत आहे. (Discovery of a new species of catfish)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00