मुंबई : प्रतिनिधी : विधीमंडळाच्या परिसरात गुरुवारी सायंकाळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. त्यानंतर मध्यरात्री आणखीन एक ड्रामा झाला. राड्यातील संशयित नितिश देशमुख याला पोलिस घेऊन जात असताना आमदार आव्हाड यांनी अटकाव करताना पोलिसांच्या वाहनांसमोर आडवे झाले. अखेर पोलिसांना बळाचा वापर करुन आव्हाडांना फरफडत बाजूला केले. यावेळी विधीमंडळाच्या आवारात प्रचंड गोंधळ उडाला. आमदार रोहित पवारही यावेळी उपस्थित होते. (Jitendra Awhad)
सायंकाळच्या राड्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांचा कार्यकर्ता नितिन देशमुख आणि पाडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याला विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत नेले. त्यानंतर पोलिसांनी दोनही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेतले. तसेच घटनास्थळावरील उपस्थित कर्मचाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी पोलिसांकडे वस्तुस्थिती मांडणार अहवाल मागितला. रात्री नऊ वाजता विधानसभा अध्यक्षांकडे पोलिसांनी अहवाल दिला. अहवालात दोन्ही बाजूकडून दिलगिरी व्यकत करण्यात आल्याची माहिती पुढे आली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. (Jitendra Awhad)
मध्यरात्री साडेबारा वाजता नितिन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना घेऊन वाहनाने जात असताना आमदार आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे वाहन रोखले. वाहनांसमोर आव्हाडाला ठिय्या मांडला. यावेळी घटनास्थळी आमदार रोहित पवारही पोचले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पण जितेंद्र आव्हान पोलिसांच्या वाहनासमोर आडवे झाले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करुन आव्हाडांना फरफडत वाहनांच्या समोरुन उचलून बाजूला नेले. नितिन देशमुख यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात घेऊन गेले. देशमुख आणि ऋषिकेश टकलेवर गुनहा दाखल करण्यात आला. (Jitendra Awhad)