शिर्ड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंर्तगत १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु घरचा महिन्याचा खर्च त्या पैशात भागतो का? अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत शिर्डी येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे राहुल गांधी यांच्याकडून वदवून घ्या, असे आव्हान दिले होते. यावर बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, की आमचे विचार जरी वेगळे असले तरी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महारांजाचा देशाला अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी संसदे बाहेर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, तर मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान करणार असाल तर निवडणुकीत त्यांचे नाव घेऊन काय उपयोग? काँग्रेसचा कोणताच नेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले.
जातनिहाय जनगणना कधी होणार?
शिर्डीच्या सभेत पुढे बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला. त्या म्हणाल्या, की आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कधी वाढवणार, जातनिहाच जनगणना कधी करणार, अशा प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी द्यावीत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केले आहे. शेतकऱ्यांशी संबंधित अनेक समस्या आहेत. त्यावर हे काही बोलत नाहीत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. कापूस, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. कोणतीही वस्तू घेतली तर त्यावर जीएसटी द्यावा लागतो. भारत हा युवकांचा देश आहे, परंतु देशातील युवा र्गाला नोकरीची संधी नाही. देशात महागाई वाढत चालली आहे. महाराष्ट्रतील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्र मागे जात आहे, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी महायुतीसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.