सध्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये एक भयानक ट्रेंड आला आहे. शाळा कॉलेजमध्ये वर्षभर न जाता डायरेक्ट परीक्षेच्या वेळेला जायचे. परीक्षा देऊन पास होऊन पुढच्या वर्गात जायचे. हा ट्रेंड किती भयानक आणि आत्मघातकी आहे, याचे गांभीर्य अद्याप पालकही लक्षात घेईनासे झाले आहे. (private classes and anxiety)
-अजय पाटील
हा ट्रेंड एकदम आला नाही. तर सर्वांत आधी हा ट्रेंड फक्त ज्युनिअर कॉलेजेसमध्ये आला. अकरावी-बारावीला कॉलेजमध्ये जायचे नाही. बाहेर क्लास लावायचे आणि डायरेक्ट परीक्षा द्यायची. आम्ही जेव्हा २००० साली ज्युनिअर कॉलेजला जायचो तेव्हा कॉलेजचेच क्लास असायचे. प्रायव्हेट क्लासेस नव्हते. मात्र त्यानंतर प्रायव्हेट क्लासेसचे फॅड झपाट्याने पसरले. आणि कॉलेजला जाण्यापेक्षा बाहेरून कॉलेज करायचे आणि फक्त क्लासेस करायचे असा ट्रेंड आला.
ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अक्षरशः फुकट पगार घ्यायला लागले. त्यांना फक्त प्रॅक्टिकल घेण्याचे काम असायचे.
कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये लेक्चर व्हायचे नाहीत.
विशेष करून सर्वांत जास्त सायन्स फॅकल्टी मध्ये हा ट्रेंड आला. बारावीला चांगले मार्क्स मिळावेत आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता यावी यासाठी पालकांनी मुलांना कॉलेजमध्ये पाठवणे बंद केले. (private classes and anxiety)
आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांना वेगवेगळे क्लासेस लावून दिले.
जवळपास कोरोनापर्यंत हा ट्रेंड फक्त ज्युनिअर कॉलेजेसमध्ये होता. आणि त्यातही विशेष करून सायन्स फॅकल्टीमध्ये.
मात्र कोरोना नंतर हा ट्रेंड झपाट्याने सीनियर कॉलेजेसमध्ये सुद्धा पसरला. आणि सीनियर कॉलेजेससुद्धा विद्यार्थ्यांविना भकास पडू लागले.
जास्तीत जास्त विद्यार्थी अशा बाहेरून ॲडमिशन देणाऱ्या कॉलेजमध्ये जाऊ लागल्याने रेगुलर लेक्चर्स घेणारे कॉलेजेस मधल्या ऍडमिशन कमी झाल्या. आणि अशा चांगल्या कॉलेजेसला सुद्धा नाईलाजाने हा ट्रेंड स्वीकारावा लागला.
शहरांपेक्षा खेड्यांमध्ये हा ट्रेंड भयानक पद्धतीने पसरला आहे. (private classes and anxiety)
कुठल्यातरी लांबच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवायची आणि फक्त परीक्षेच्या वेळेला जायचे असं सध्या विद्यार्थ्यांमध्ये वातावरण आहे. हीच गावातील तरुण मंडळी दिवस पर स्मार्टफोनवर टाइमपास करत असतात.
कॉलेजमध्ये फक्त मार्क मिळवण्यासाठी आणि पुढच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षेला जायचे हा किती भयानक संकुचित दृष्टिकोन आहे. खरंतर कॉलेजमध्ये तरुणांचे व्यक्तिमत्व घडत जाते. त्यांना वेगवेगळे मित्र मैत्रिणी भेटतात. त्यांच्या सर्जनशीलतेला, अभिव्यक्तीला वाव मिळतो. कॉलेजमधून वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेता येतो.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते तयार होते. वेगवेगळे चर्चासत्र, संवाद, आंदोलनं यामध्ये भाग घेऊन तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतात. एनसीसी, एनएसएस सारख्या तरुणाईच्या ऊर्जेला दिशा देणाऱ्या उपक्रमांमध्ये मध्ये भाग घेता येतो. गॅदरिंग, युथ फेस्टिवल्स सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवता येतो. वेगवेगळ्या जाती, धर्म, प्रांत आणि लिंगाच्या व्यक्तींमध्ये सामील झाल्यामुळे तरुण सोशल होत जातात.
त्यांच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात. तारुण्याच्या अभिव्यक्तीचे सर्वोत्तम व्यासपीठ म्हणजे कॉलेज जीवन. मात्र बाहेरून कॉलेज करण्याच्या ट्रेंडमुळे तरुण विद्यार्थी हे सर्व गमावत आहेत. आणि त्यातूनच एक उथळ, कौशल्यहीन, असामाजिक तरुण तयार होत आहे. असा तरुण एखाद्या तकलादू मडक्यासारखा आहे जो थोडाशा दबावाने फुटून जाईल. तसेच वैचारिक दिशा नसलेल्या अशा तरुणांचा अराजक, असामाजिक गोष्टींसाठी वापर करणे ही सोपे आहे.
फक्त ज्युनियर आणि सीनियर कॉलेजेस मध्ये नाही तर आता शाळांमध्येही बाहेरून शाळा करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे.
मुळात बाहेरून कॉलेज करण्याची सुविधा ही अशा लोकांसाठी आहे ज्यांचे वय जास्त असून ते नोकरी व्यवसाय करत आहेत मात्र त्यांना शिकण्याची इच्छा आहे. तसेच ज्यांचे शिक्षण घ्यायचे काही कारणास्तव राहून गेले होते आणि आता त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. आपल्या दिवसभराच्या व्यस्त शेड्युलमुळे जे रेगुलर लेक्चर करू शकत नाही अशांसाठी खरंतर ही सुविधा आहे.
मात्र ज्यांचे शिक्षणाचे वय आहे ते मुलं सुद्धा सध्या बाहेरून शाळा कॉलेज करताना दिसतात.
शाळा कॉलेजमध्ये घडते तसे मुलांचे व्यक्तिमत्व प्रायव्हेट क्लासेसमध्ये घडत नाही हे पालकांना समजत नाही.
मात्र पालक फक्त स्पर्धा आणि समाजातील ट्रेंड फॉलो करतात. (private classes and anxiety)
विशेष म्हणजे असे विद्यार्थी शिक्षण सुद्धा फक्त मार्क मिळवण्यासाठी घेतात. शिक्षणामध्ये सुद्धा अशा विद्यार्थ्यांना गोडी नसते. फक्त परीक्षा द्यायच्या, जास्त मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि पुढच्या वर्गात जायचे अशा भयानक रॅट रेसमध्ये हे विद्यार्थी पळत असतात.
यामध्ये विद्यार्थ्यांचे भावविश्व पूर्णपणे चिरडले जाते.
अशा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर भयानक विपरीत परिणाम होत आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थी स्मार्टफोनच्या व्यसनाला बळी पडले आहेत. जास्त मार्क्सच्या दबावामुळे या विद्यार्थ्यांमध्ये एन्झायटीचे प्रमाण वाढत आहे. या विद्यार्थ्यांचे कुटुंबाशी भावनिक नाते कमजोर होतच आहे शिवाय समाजामध्ये कसे वावरायचे यामध्येही हे विद्यार्थी कमी पडत आहेत.
बाहेरून शाळा आणि कॉलेज करण्याच्या या ट्रेंडमुळे विद्यार्थ्यांमध्ये भयानक नकारात्मक बदल घडत आहेत.
याला जबाबदार पालकांची संकुचित भूमिका आहे.
शाळा आणि कॉलेज फक्त मार्क्स मिळवण्यासाठी, डिग्री घेण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी आहेत का?? असा प्रश्न प्रत्येक पालकाला विचारावासा वाटतो.
या भयानक ट्रेंडमुळे अनेक चांगल्या शाळा आणि कॉलेजेस बंद होण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे.
मी स्वतः एक चाइल्ड काऊन्सलर म्हणून सांगतो माझे व्यक्तिमत्व घडण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्या शाळा आणि कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे.
पालकांनो तुमच्या मुलांना वर्षभर रेग्युलर शाळा आणि कॉलेजमध्ये पाठवा.
नाहीतर तुमच्यावर भविष्यात पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
(चाईल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन, जळगाव)