Home » Blog » राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञान क्षेत्रात मोठ्या रोजगारसंधी : पद्मश्री डॉ.एच.सी.वर्मा

राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञान क्षेत्रात मोठ्या रोजगारसंधी : पद्मश्री डॉ.एच.सी.वर्मा

by प्रतिनिधी
0 comments
National Quantum Mission

कोल्हापूर : प्रतिनिधी :  संपूर्ण विश्व हे प्रचलित शास्त्रीय (क्लासिकल) नियमांपेक्षा पुंज भौतिकीय (क्वांटम) नियमांवर चालते. प्रकाशाचे वर्तन, अणूंची रचना, चुंबकत्व, विद्युतवाहकता, अर्धसंवाहक, अणुऊर्जा, सूर्याची ऊर्जा आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान यामागे क्वांटम भौतिकशास्त्र कार्यरत आहे. त्यामुळे क्वांटम भौतिकशास्त्र केवळ प्रयोगशाळेतील विषय नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारसंधींची निर्मिती होणार आहे. आपण सारेच क्वांटम विश्वात जगत आहोत, असे प्रतिपादन पदार्थविज्ञानाचे ज्येष्ठ संशोधक, शिक्षक आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आज डॉ. वर्मा यांचे “क्वांटम भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील रोजगार संधी” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. ( National Quantum Mission)

सेमीकंडक्टर तंत्रज्ञान क्वांटम सिद्धांतांचे यशस्वी उदाहरण

पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी विद्यार्थ्यांना क्वांटम भौतिकशास्त्राची संकल्पना अत्यंत सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितली.  डॉ. वर्मा म्हणाले, न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकत्व किंवा ऊष्मागतिकीचे नियम अनेक घटना स्पष्ट करतात; मात्र तांबे वीज का वाहून नेतो, प्लास्टिक विद्युतरोधक का असते, लोखंडच चुंबकीय का असते किंवा काच पारदर्शक आणि पारा अपारदर्शक का असतो, याचे उत्तर केवळ पारंपरिक शास्त्रीय (क्लासिक) भौतिकशास्त्र देऊ शकत नाही. या सर्व घटनांचे स्पष्टीकरण क्वांटम भौतिकशास्त्रामध्ये मिळते. क्वांटम भौतिकशास्त्रातील ऊर्जा क्वांटीकरण, वेव्ह-पार्टिकल द्वैधस्वरूप, अनिश्चितता, क्वांटम टनेलिंग, सुपरपोझिशन यांसारख्या संकल्पना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. अणुभट्टीतील अणुभंजन, सूर्याच्या केंद्रातील अणुसंम्मीलन, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आणि आधुनिक सेमीकंडक्टर तंत्रज्ञान ही क्वांटम सिद्धांताची यशस्वी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सहा हजार कोटींची तरतूद

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर केवळ अध्यापन किंवा संशोधन हेच पर्याय उपलब्ध नसतात. भारत सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनअंतर्गत देशात क्वांटम संगणन, क्वांटम माहितीशास्त्र, क्वांटम संप्रेषण आणि क्वांटम सुरक्षा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. या मिशनसाठी केंद्र सरकारने सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध आयआयटी, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ( National Quantum Mission)

भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी

याशिवाय, इस्रो, सीएसआयआर, भाभा अणुसंधान केंद्र, भौतिकी संशोधन प्रयोगशाळा, प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट, यांसह विविध राष्ट्रीय प्रयोगशाळा, वैज्ञानिक संस्था, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान व्यवस्थापन, संशोधन प्रशासन तसेच उद्योग क्षेत्रात भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होत असल्यामुळे उद्योगक्षेत्र त्यांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संशोधनाकडे वळावे

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी भौतिकशास्त्र हे सर्व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, एज कॉम्प्युटिंग आणि उच्च कार्यक्षम संगणन (High Performance Computing) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी क्वांटम भौतिकशास्त्र असून, भविष्यातील वैज्ञानिक क्रांतीचे नेतृत्व हे याच क्षेत्रातून होणार आहे. मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांतील दरी भरून काढल्याशिवाय देशाचा वैज्ञानिक विकास अशक्य असून विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीलेश तरवाळ यांनी आभार मानले.

 तील संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. पद्मश्री डॉ. वर्मा यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवीन दिशा आणि करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ( National Quantum Mission)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00