मुंबई : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बूट फेकण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या कृतीच्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या कृत्याच्या विरोधात निदर्शने केली. बारामती येथे सुप्रिया सुळे यांनी तर छत्रपती संभाजीनगर येथे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन केले. (NCP protests)
मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर लोकशाहीला घातक
संभाजीनगर येथे मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादीने निदर्शने केली. यावेळी मीडिया प्रतिनिधीसमोर बोलताना आमदार पवार म्हणाले, सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका वकीलाने हल्ला केला. तो आरएसएसचा कार्यकर्ता आहे. या व्यक्तीने सरन्यायाधीशांवर हल्ला केला आहे. सरन्यायाधीश गवई हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कष्टाने ते वकील झाले. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असलेले ते व्यक्ती आहेत. ते सुप्रिम कोर्टाचे प्रमुख आहेत. अशा व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर ते लोकशाहीला घातक आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. (NCP protests)
जातीयवादी प्रवृत्तीचे लोकांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
आमदार रोहित पवार म्हणाले, लोकशाही टिकली पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना हळूहळू सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपला कंट्रोल असावा, असे वाटते. कोर्टात सामान्य लोकांना न्याय मिळत असतो. तिथे कुठेतरी आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळात मनुवाद देशात परत आला पाहिजे, असा प्रयत्न काही लोकांचा आहे. त्याला विरोध आम्ही करत आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले. (NCP protests)
रोहित पवारांची भाजपवर टीका
रोहित पवार यांनी काल हे प्रकरण घडलं तेव्हा सामान्य लोकांनी लगेचच निषेध व्यक्त केला. पुरोगामी विचारांच्या सर्व पक्षांनी निषेध केला. पण, भाजपच्या नेत्यांनी आठ-आठ तास उशिरा या गोष्टीचा निषेध केला याकडे लक्ष वेधले. थातूर मातुर गोष्टींवर लगेचच ट्विट करणारे भाजपचे मोठमोठे नेते हे इतक्या मोठ्या घटनेवर आठ-आठ तासांनी व्यक्त होतात. त्यामुळे आम्ही या मनुवादी व्यक्तींचा निषेध करत आहोत. त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलवू शकत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.