Home » Blog » Vice Chancellor Shirke : कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा जागतिक लौकिक: डॉ. माणिकराव साळुंखे

Vice Chancellor Shirke : कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा जागतिक लौकिक: डॉ. माणिकराव साळुंखे

by प्रतिनिधी
0 comments
Vice Chancellor Shirke

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक कसा असावा, याचा वस्तुपाठ म्हणजे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची कारकीर्द आहे. त्यांना जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची लाभलेली साथ मौल्यवान आहे. या जोडीने उत्तम प्रशासकीय कौशल्याचे प्रदर्शन घडवित शिवाजी विद्यापीठाला शैक्षणिक व संशोधकीय दिशा देऊन जागतिक लौकिक प्राप्त करून दिला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठातील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पदउतार होत असल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनातर्फे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्या समारंभात ते बोलत होते. सुमारे पाच तास चाललेल्या या समारंभाला विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांसह समाजातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. अत्यंत हृद्य अशा या कार्यक्रमात अनेक वक्त्यांना आपली मनोगते प्रकट करीत असताना गहिवरुन आले. हा गहिवर श्रोत्यांनाही हेलावून टाकणारा ठरला. (Vice Chancellor Shirke)

डॉ. साळुंखे म्हणाले, डॉ. शिर्के आणि डॉ. पाटील यांनी काम करीत असताना ज्या समन्वयवृत्तीचे आणि समंजसपणाचे दर्शन घडविले, ते अतिशय कौतुकास्पद आणि दुर्मिळ आहे. विद्यापीठाप्रती असलेल्या सर्वोच्च निष्ठेमुळेच आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट सेवा प्रदान केली. डॉ. शिर्के यांनी विद्यापीठात वादविवाद टाळून संवादावर भर देत सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला. सर्व प्रकारच्या चर्चेखेरीज कोणत्याही नवीन ज्ञानाची निर्मिती होऊ शकत नाही, याचे भान त्यांनी बाळगले. संख्याशास्त्रज्ञ असल्यामुळे प्रशासनातील बारकावे त्यांनी नेमके हेरले. त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील यशामध्ये संख्याशास्त्राचा वाटा मोठा आहे. विद्यापीठाची स्वायत्तता टिकविण्याचे मोठे आव्हान कुलगुरूंसमोर असते. ही बाजूही डॉ. शिर्के यांनी मोठ्या कौशल्यपूर्णतेने सांभाळली. डॉ. पाटील यांनी देशातल्या एका कोपऱ्यातील विद्यापीठामधून जागतिक दर्जाचे संशोधन होऊ शकते, हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. तथापि, आजही आपल्या देशाचा संशोधन व विकासावरील गुंतवणुकीचा वाटा अत्यल्प आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि संशोधन व विकास यांवरील गुंतवणुकीत मोठी वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Vice Chancellor Shirke)

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठात आपण विद्यार्थी म्हणून प्रवेशित झाल्यापासून ते आज कुलगुरू म्हणून निवृत्त होण्यापर्यंतच्या आपल्या वाटचालीचा वेध घेतला आणि या दरम्यान विविध टप्प्यांवर आपल्याला सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या कुलगुरूंपासून ते अधिकारी, क्लार्क, शिपाई आणि विद्यार्थी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आज निवृत्त होत असताना ‘याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा’, अशी भावना व्यक्त करून ते म्हणाले, वसतिगृह अधीक्षक म्हणून काम पाहिले असले तरी तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यामुळे कुलसचिव म्हणून सर्वप्रथम प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात आलो. तेथून पुढे टप्प्याटप्प्याने अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, वित्त समिती सदस्य अशा जबाबदाऱ्या विविध कुलगुरूंनी सोपविल्या. पुढे प्र-कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आणि कुलगुरू म्हणूनही काम करता आले. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना डॉ. साळुंखे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम केले. त्यांच्या चांगल्या बाबींचे अनुकरण केले. त्या अर्थाने मी डॉ. माणिकराव साळुंखे यांचा पठ्ठ्या आहे, असे सांगताना मला अभिमान वाटतो. माझ्या कारकीर्दीत केलेल्या कामांचे श्रेय माझे एकट्याचे नाही. हे सामूहिक कार्याचे फलित आहे. त्या कामाचा लेखाजोखा आता समाजाने करावयाचा आहे. तथापि, विद्यापीठ गीताची निर्मिती, क्रांतीवनाचे सुशोभीकरण, राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त निर्माण केलेले कुस्ती संकुल, असे होते आपले शाहू महाराज हे बालकुमारांसाठी निर्मिलेले पुस्तक, लोकस्मृती वसतिगृह आणि अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या वर्षभर चालविलेल्या मालिकेची निर्मिती या पाच कामांमुळे अत्युच्च समाधान प्राप्त झाले. (Vice Chancellor Shirke)

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून माझी डॉ. शिर्के यांच्याशी मैत्री आहे. त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू म्हणून काम करीत असताना विद्यापीठाच्या विकासात योगदान देण्यासाठी ही मैत्री उपयुक्त ठरली. आमच्यामध्ये संघर्षाचा एकही प्रसंग उद्भवला नाही. सर्वसमावेशकतेचे भान ठेवून काम केल्याने आणि विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच शिवाजी विद्यापीठाला विविध क्षेत्रांत अग्रेसर बनवू शकलो. यावेळी डॉ. पाटील यांनी आपल्या पत्नीने दिलेल्या पाठबळामुळेच हा ‘पी.एस. पाटील’ घडू शकला, अशा शब्दांत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या ४१ वर्षांच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांप्रतीही त्यांनी कृतज्ञभाव व्यक्त केला. माझ्या पाठीशी या विद्यापीठाची ज्ञानाची शिदोरी असल्यामुळे येथून पुढची दुसरी इनिंगही यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Vice Chancellor Shirke)

यावेळी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. माधुरी वाळवेकर, महेश साळुंखे, धैर्यशील यादव, डॉ. पी.एस. कांबळे, प्रा. मधुकर पाटील, डॉ. संतोष सुतार, डॉ. एस.जे. नाईक, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. संजय कुबल, डॉ. उदय पाटील, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. रघुनाथ ढमकले यांचा समावेश होता.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. साळुंखे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रदान करून सपत्नीक सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले.

कार्यक्रमास डॉ. सुनिता शिर्के, डॉ. मोना पाटील, माजी वित्त व लेखाधिकारी बी.एस. पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00