मुंबई; प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या १० लाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहासह आवश्यक त्या ठिकाणी सुसज्ज सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. (Mahaparinirvan Day)
तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिला व नवजात बालकांसाठी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीतील कार्यक्रमांचे मोठ्या पडद्यावर तसेच समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
महापालिका परिमंडळ २चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून या परिसरातील महापालिकेच्या काही शाळाही निश्चित केल्या आहेत. या शाळांमध्येही सर्व नागरी सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्हीची करडी नजर (Mahaparinirvan Day)
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या सूचनेनुसार सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे. शिवाजी पार्क परिसरात ६०, चैत्यभूमी परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय दादर, माहीम भागातील गर्दी होणाऱ्या तसेच प्रवेशद्वार असणाऱ्या महत्त्वाच्या स्थळांवरही सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
पालिकेचे अधिकारी-कर्मचारी तैनात
अनुयायांना सेवा-सुविधा पुरवणे तसेच मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाचा पूर्ण अधिकारी आणि कर्मचारीवर्ग येथे तैनात करण्यात आला आहे. तसेच आवश्यतेनुसार इतर कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची अधिकची कुमकदेखील मागवण्यात आली आहे. (Mahaparinirvan Day)
स्वच्छतेवर भर
येथील स्वच्छतेवर भर देण्यात येत असून, साफसफाईसाठी घनकचरा विभागाचे सुमारे ३०० कर्मचारी तीनही पाळ्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
या सुविधा मिळणार
- चैत्यभूमी येथे शामियाना, व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था
- ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
- १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
- एकावेळी १० हजार लोकांची बैठक व्यवस्था
- शिवाजी पार्क व परिसरात ३२५ फिरती शौचालये, न्हाणीघरे
- रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशी फिरती शौचालये.
- पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था
- पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाला १२ पाणी टँकर्सची व्यवस्था
- अन्नदाता स्टॉलसाठीची वेगळी व्यवस्था
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था
- अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा
- चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहीत संपूर्ण परिसरात बोटीची व्यवस्था
- चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
- फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवरील महापालिकेच्या अधिकृत खात्याद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.
- पुस्तकी साहित्य तसेच वस्तूंसाठी ५५० स्टॉल्सची सुविधा
- दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ उत्तर विभाग, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
- भिक्खू संघाच्या निवासाची व्यवस्था.
- मैदानातील धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादनाची व्यवस्था.
- अनुयायांना मार्गदर्शनासाठी १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुग्याची व्यवस्था.
- मोबाइल चार्जिंगसाठी पॉइंटची व्यवस्था.
- फायबरच्या तात्पुरत्या स्थानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची पुरेशा संख्येने व्यवस्था.
- रांगेतील अनुयायांसाठी सुमारे ५ किमी लांबीचे तात्पुरते छत व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था.
- डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही तात्पुरत्या निवाऱ्यांसह पुरेशा संख्येने फिरती शौचालये.
- स्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- महिला व नवजात बालकांसाठी हिरकणी कक्ष
हेही वाचा :
- थोडा हैं, थोडेकी जरुरत है…
- सिंधुदुर्गावर उभारलेला पुतळा, त्याच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती आणि…
- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री