नाशिक : प्रतिनिधी : नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी थेट व्यापपीठावर जाऊन गिरीश महाजन यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्रमच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आक्रमक झालेल्या माधवी जाधव यांनी म्हटले की, मला कामावरून काढून टाका किंवा सस्पेंड करा, परंतु मी हा प्रश्न विचारातच राहणार, असा इशारा दिला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ध्वजवंदनानंतर भाषण करताना गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागाच्या महिला अधिकारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत महाजन यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या आक्रमक झाल्या होत्या. पण इतर पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. मात्र माधवी जाधव यांनी म्हटले की, मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी चूक मान्यच केली पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितल्याचे पाहायला मिळाले. (Madhavi Jadhav questioned Mahajan regarding the matter)
माधवी जाधव यांनी मांडली भूमिका
व्यासपीठावर केलेल्या कृतीबद्दल आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. त्यामुळे मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी गिरीश महाजन यांची माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. गिरीश महाजन यांनी आपली चूक स्वीकारावी. गिरीश महाजन भाषण करत असताना बाबासाहेबांचे नाव ते आता घेतली, नंतर घेतील, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव त्यांच्या भाषणात आले नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे ते वारेवार घेत होते. संविधान आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? असा प्रश्न उपस्थित करत माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला. (Madhavi Jadhav questioned Mahajan regarding the matter)
मंत्री महाजनांकडून खुलासा
या घटनेबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही. मात्र आज जे काही घडलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.


