पूर्वी रामसे बंधू रहस्यमय अशा लेबलचे हिंदी सिनेमे काढत. दोन तास नाच, गाणी, डरावने आवाज वगैरे मसाला असे. शेवटच्या दहा मिनिटांत पटापट अत्यंत किरकोळ रहस्य-स्फोट असे. बहुतेकदा ते पाहून थिएटरमध्ये लोक जोरदार हसत असत. मुंबईतील मराठा आंदोलन, निर्माण झालेला तणाव आणि शेवटी पाच मिनिटांत तोडगा निघून पाटलांनी झटपट उपोषण मागे घेणे यावरून त्या सिनेमाची आठवण झाली. (Maratha andolan analysis)
- राजेंद्र साठे
पण हे आंदोलन म्हणजे सिनेमा नव्हता. लोकांच्या जीवनातला अत्यंत गंभीर विषय होता. त्यामुळे काही प्रश्न पडले.
हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा तोडगा इतका सोपा होता तर तो देवेंद्रांनी आधीच का पुढे आणला नाही?
जीआर ही इतकी स्वस्त आणि टू मिनिट नूडल्ससारखी तयार होणारी वस्तू आहे का? आणि तसे असेल तर ती इतर वेळी जनतेला का मिळत नाही?
‘सरसकट’ची मागणी व्यवहार्य नाही हे आंदोलकांना मुंबईत आल्यावर ताबडतोब कसे मान्य झाले?(Maratha andolan analysis)
‘सगेसोयरे’च्या जीआरला आठ लाख हरकती असल्याने वेळ लागेल हेही विखेंसोबतच्या संभाषणातून केवळ पाच मिनिटात कसे पटले?
सर्वात शेवटी- जे हैदराबाद गॅझेट लागू होणे खरेच मोठा विजय आहे का? कारण गॅझेट लागू म्हणजे सगळे मराठे सरसकट कुणबी असे होणार नाही. यातही नोंदी व पुरावे लागणार आहेतच. शिंदे समिती तेच तर करीत होती. शिवाय या सगेसोयरचा जीआर आठ लाख हरकतींमुळे लटकला आहे. तर मग हैदराबादचा जीआर हरकत-प्रूफ आहे काय ?
बाकी आंदोलनापूर्वीचा व आजच्या घटनाही मनोरंजक व उद्बोधक आहेत.
मनोज जरांगे यांनी तीन-चार महिन्यांपूर्वीच मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली. २९ ऑगस्ट दिली. देवेंद्र फडणवीस निवांत होते. केवळ आठवडाभर आधी २२ ऑगस्टला मराठा उपसमितीची नवी घोषणा झाली. चंद्रकांत पाटील यांना बदलण्यात आले. त्यांच्या जागी विखे आले. हा बदल नेमका का झाला कोणीही विचारले नाही. नंतर उपसमितीही काही करताना दिसत नव्हती. जरांगे मुंबईत आले तेव्हा विखे मस्तपैकी नगरला होते. जरांगे मुंबईत येण्यापूर्वी विखे त्यांना भेटणार अशा बातम्या काही काळ टीव्हीवर चालल्या. पण नंतर लगेच बंद झाल्या. विखे सावकाश मुंबईत आले. मग त्यांच्या बैठका झाल्याचे दोन-तीन फोटो आले. पण सरकारचा कोणीही माणूस पाच दिवसात जरांगेंकडे फिरकला नाही. आज मात्र एकाएकी सगळ्यांच्या पायांना चाके लागली. विखे एकदाच आले आणि उपोषण खलास. उपसमितीत भाजपचे विखे आणि दादा गटाचे कोकाटे ठळकपणे समोर होते. शिंदे गटाच्या उदय सामंतांना यावेळी दुय्यम रोल होता.(Maratha andolan analysis)
संध्याकाळी देवेंद्रांनी हा प्रश्न सुटल्याचे सर्व श्रेय उपसमितीला दिले. उद्या कोर्टात याचिका होतील तेव्हा पुढे करायला बहुदा ही उपसमिती उपयोगी पडेल. जरांगे यांचा उल्लेख देवेंद्रांनी एकदाही केला नाही. मुंबईकरांना त्रास झाल्याबद्दल मात्र आवर्जून दिलगिरी व्यक्त केली. जरांगे यांनीही आभाराच्या भाषणात देवेंद्रांना महत्व दिले नाही. एकनाथ शिंदे यांनी जरांगे व आंदोलकांचे कौतुक केले. शिवाय आजच्या बऱ्याच मागण्या आपल्याच काळात मान्य झालेल्या आहेत हेही सांगून घेतले.
जरांगे यांच्या सच्चेपणाबद्दल अजिबात शंका नाही. मुंबईत आलेले बहुतांश आंदोलकही खरे गरजवंत व साधे लोक होते.
पण त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा सर्व काय प्रकार झाला?