मुंबई : जमीर काझी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवे वादळ शुक्रवारी (२९ ऑगस्ट) पहाटे आझाद मैदानात दाखल झाले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यत मी एक इंचही मागे हटणार नाही. आता फायनल काही तरी होईल, गोळ्या घातल्यातरी मागे हटणार नाही, सरकार गोळ्या घालून मारेल किंवा मी उपोषण करून मरेन, असा निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला. (Maratha agitation)
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या या आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे.
आम्हाला ओबीसीचे काढून आरक्षण द्या, असे सांगत नाही, तर हक्काचे मागत आहोत, आंदोलन मोडायचे की नाही हे सरकारने ठरवावे, एक, एक दिवसाची परवानगी देण्याची नाटके सरकारने करू नयेत,जर आंदोलकांना मुंबईत त्रास झाला तर तुमच्या सभांनाही असेच केले जाईल,मराठी राज्यात सरकारचे चाक सुद्धा फिरवून देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. (Maratha agitation)
आंदोलनात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आंदोलक एकत्र आले असून त्यामुळे दक्षिण मुंबई पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे शहर, उपनगर आणि फ्री वे, एक्सप्रेस वे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसात आंदोलकांनी आझाद मैदान, सीएसटी, चर्चगेट परिसरात ठिय्या मारला आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलनाला शनिवारपर्यंत आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. (Maratha agitation)
आज सकाळी दहाच्या सुमारास जरांगे आझाद मैदानात उभारलेल्या छोट्याखानी व्यासपीठावर हजर झाले. स्टेजवरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करीत उपस्थितांना सबोधित केले. ते म्हणाले,’ आता जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, गुलाल डोक्यावर पडत नाही, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, गोळ्या घातल्यातरी एकही इंच मागे हटणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा, हे आंदोलन आपल्याला संयमाने व शिस्तीत हाताळायचे आहे. सरकारने विनाकारण मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नये, मराठ्यांची मने जिंकण्याची संधी तुमच्या हातातून अजून गेलेली नाही.
खासदार, आमदारांचा पाठिंबा
पहिल्या दिवशी आझाद मैदानावर आंदोलन स्थळी खासदार सर्वश्री बजरंग सोनवणे, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, कल्याण काळे, भगरे तसेच आ. संदीप क्षीरसागर, तर सत्तारुढ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश साळुंखे, विजयसिंह पंडित यांनी व्यासपीठावर भेट देऊन जरांगे यांना जाहीर पाठिंबा दिला.