Home » Blog » क्रांतिवीरचा तो डायलॉग नाना कुठं शिकलाय ?

क्रांतिवीरचा तो डायलॉग नाना कुठं शिकलाय ?

by प्रतिनिधी
0 comments
A dialogue by Nana Patekar from the movie ‘Krantiveer’

१९९२चा डिसेंबर. अयोध्येत बाबरी मशीद पाडली आणि देशभर दंगली उसळल्या. मुंबईतही त्याची आग पोहोचलीच. डिसेंबर आणि जानेवारी असे जवळपास दोन महिने हे शांततेत राहणारं शहर दुभंगलं. कर्फ्यू, जाळपोळ, दगडफेक, गोळीबार आणि सगळ्यात भयानक म्हणजे एकमेकांबद्दल वाटणारा अविश्वास. या सगळ्यात नाना भयंकर अस्वस्थ होता. पेपर, टीव्ही सगळीकडे रक्त पाहून त्याच्या आधीच सणकी असलेल्या डोक्यात आगडोंब पेटत होता.

नीलेश बने

अखेर तो घराबाहेर पडला, कर्फ्यू असलेल्या शहरातून नाना जीप घेऊन फिरत होता. स्वतःला असलेलं ग्लॅमर आणि देवानं दिलेलं तोंड वापरून जमेल तेवढं शांत करण्यासाठी प्रयत्न करू लागला. लोकांमध्ये जाऊन बोलू लागला. राजकारणी लोकांना भडकवत आहेत, त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका, असं पटवून देऊ लागला. जे काही चाललं होतं, ते थांबेल का नाही माहीत नाही, पण मी गप्प बसून चालणार नाही, एवढीच त्याची भूमिका होती. (A dialogue by Nana Patekar from the movie ‘Krantiveer’)

“ये मुसलमान का खून है… ये हिन्दू का खून है

त्या दिवसांत जे काही अनुभवलं त्याबद्दलचा राग, अस्वस्थता आणि असहायता नानाच्या मनात बराच काळ राहिली. काही वर्षांनी हा सगळा राग त्यानं आपल्या ‘क्रांतिवीर’ सिनेमातून काढला आणि त्यातूनच जन्माला आला तो अजरामर डायलॉग…“ये मुसलमान का खून है… ये हिन्दू का खून है… इसमें से मुसलमान का कौनसा और हिन्दू का कौनसा?”

मी काही देशाचा ठोका घेतलेला नाही

या सिनेमाचा किस्साही भारी आहे. मेहुल कुमार यांच्या कॉलेजच्या दिवसांत त्यांचा एक मित्र होता. देशात काय चुकतंय, व्यवस्था कशी बिघडली आहे, देश कसा सुधारायला हवा, यावर तो सतत बोलत असे. मोठमोठ्या गोष्टी, मोठमोठे विचार. एकदा मेहुल कुमार त्याला म्हणाले, “तू एवढं बोलतोस, मग काहीतरी करून दाखव ना.” त्यावर मित्राचं उत्तर होतं, “मी काही देशाचा ठेका घेतलेला नाही. मला जे वाटतं ते मी बोलतो.”

मेहुलकुमारच्या डोक्यात चित्रपटाची गोष्ट बसली

हा माणूस काही प्रत्यक्ष क्रांती करणार नव्हता, पण बोलण्याची त्याची सवय होती. मेहुल कुमार यांच्या डोक्यात त्या माणसाची प्रतिमा बसली होती. त्यावरून क्रांतिवीरची मूळ व्यक्तिरेखा आधीच त्यांच्या मनात होती, पण अजून चित्रपटाची गोष्ट नव्हती. मग ६ डिसेंबर १९९२नंतर बाबरी मशीद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दंगली उसळल्या. त्या घटना पाहिल्यानंतर मेहुल कुमारला वाटलं की, हिंदू-मुस्लिम संबंधांवर चित्रपट करता येईल का?

पण हा विषय थेट हातात घ्यायला त्यांना भिती वाटत होती. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, हा विषय थेट चित्रपटात मांडला तर प्रेक्षकांना तो कदाचित पचणार नाही, म्हणून त्यांनी विचार केला की आधी त्या कॉलेजमधल्या मित्रावरून तयार झालेली व्यक्तिरेखा घेऊन एक गोष्ट बांधायची आणि हिंदू-मुस्लिम प्रश्नाचा स्फोट चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये करायचा.

नानाचा ‘प्रताप’ पडद्यावर तुफान गाजला

१९९४ मध्ये क्रांतिवीर प्रदर्शित झाला. नाना पाटेकरांचा प्रताप पडद्यावर तुफान गाजला. सुरुवातीपासूनच तो काही नेहमीचा हिरो नव्हता. त्याच्यात राग होता, चीड होती, समाजाच्या ढोंगीपणाबद्दल संताप होता. पण त्याला आपल्या आयुष्याची, आपल्या माणसांची आणि आपल्या जगण्याची पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे तो जे बोलतो, ते सुरक्षित अंतरावर उभं राहून बोलत नाही. परिस्थिती त्याला जेव्हा निवड करायला भाग पाडते, तेव्हा तो स्वतः त्या आगीत उतरतो. आणि मग येतो चित्रपटाचा क्लायमॅक्स.

समोर हिंदू-मुस्लिम दंगली पेटवणारी गर्दी आहे. धर्माच्या नावाने माणसं एकमेकांच्या विरोधात उभी केली गेली आहेत. त्या गर्दीसमोर प्रताप उभा राहतो. आणि नाना पाटेकरांचा आवाज घुमतो, “ये मुसलमान का खून है… ये हिन्दू का खून है… इसमें से मुसलमान का कौनसा और हिन्दू का कौनसा?”(A dialogue by Nana Patekar from the movie ‘Krantiveer’)

धर्माच्या पलिकडं जाऊन ‘आयडिया ऑफ इंडिया’ सांगितली,

हा डायलॉग फक्त सिनेमातला संवाद राहिला नाही. तो सिनेमानं द्वेषाच्या राजकारणावर केलेलं स्टेटमेंट बनला. ज्या बॉलिवूडनं धर्माच्या पलिकडं जाऊन ‘आयडिया ऑफ इंडिया’ सांगितली, त्यानं या दंगलीवर केलेलं ते भाष्य होतं. ज्या शहरानं बॉलिवूड उभं केलं, त्याच शहरात धर्माच्या नावावर माणसांना धर्माच्या चष्म्यातून पाहण्याला तो विचारलेला दाहक प्रश्न होता.

दंगलीतला रस्त्यावर उतरलेला नाना असेल किंवा क्रांतिवीरमधला नाना असेल… पण या नानातल्या माणसाला घडवलं होतं ते मुरुडमध्ये राहत असताना त्याच्या आईनं केलेल्या संस्कारांनी. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत नानानं हा किस्सा सांगितलाय.

हिंदू मुस्लीमांतील नमस्काराचा फरक आईने सांगितला

नानाचं बालपण समुद्रासमोर गेलं. अंगाईऐवजी त्यानं समुद्राच्या लाटा ऐकल्यात. ज्या घरात नानाचं कुटुंब भाड्यानं राहत होतं, ते घर नाझिरा अनवारी आणि नियामतसाहेबांचं होतं. त्यांच्या मुलांची नावं होती दिलशाद आणि सैफू. दिलशाद आणि सैफू नानाचे मित्र होते. त्यांच्यासोबत खेळायचं, भांडायचं, पुन्हा एकत्र यायचं हे त्याचं बालपण होतं.

मग एकदा नानाला कळलं की ते मुस्लिम आहेत आणि आपण हिंदू. त्यानं आईला प्रश्न विचारला की, हिंदू आणि मुसलमान यांच्यात फरक काय? आता जरा त्या घरातलं ते दृश्य डोळ्यांसमोर आणा. एका छोट्या मुलाला दोन माणसांमध्ये काहीतरी फरक आहे असं जाणवतंय आणि तो आईला विचारतोय, ‘फरक काय?’

आईने त्याला धर्मशास्त्र समजावलं नाही. इतिहास सांगितला नाही. कुणी कुणावर राज्य केलं, कोण कुणाविरुद्ध लढलं, याची यादी दिली नाही. आईनं एवढंच सांगितलं की, ‘आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतात. बस, एवढाच फरक.’

एखादा माणूस घडतो तो अशा लहानलहान प्रसंगातूनच. आपण जे पाहिलं, अनुभवलं त्याचा अर्थ आपण कसा लावायचा, हे ज्याचं त्याला कळायला हवं. आपण स्वतःच्या पलिकडं जाऊन जग पाहिलं तर, जे नानाला जाणवलं ते कुणालाही जाणवू शकेल. (A dialogue by Nana Patekar from the movie ‘Krantiveer’)

नाना जातिवंत अभिनेता होता. पडद्यावरही आणि जमिनीवरही….

कधीकधी तर एवढा अभिनय करायचा की नाटकीही वाटायचा.

पण कसाही असला तरी, तो भिडायचा…

त्याचं हे भिडणं आज कायमचं काळाच्या पडद्याआड गेलं.

नाना, मिस करू रे तुला….

तुला श्रद्धांजली वगैरे नाही रे म्हणवत!

…………

(नानाचं मृत्यूसमयी वय ७५ वगैरे असलं तरी, त्याला अहो-जाहो करणं हा त्याच्या अभिनयाचा अपमान आहे, म्हणून पोस्टमध्ये त्याला अरेतुरेच केलं आहे.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!