जमीर काझी : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात?, या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच झापले. तसेच शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ते शरण न आल्यास योग्य तो आदेश जारी केला जाईल, असा इशारा न्या. माधव जामदार यांनी गुरुवारी दिला.न्यायालयाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे रायगड पोलिसासह राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. मंत्री भरतशेठ गोगवले यांचा फरारी पुत्र विकास याला पोलिसाकडे हजर होण्याबाबत युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत.
मंत्री गोगवलेंनी मुलांशी संपर्क साधून शरण येण्यास सांगितले
नगरपालिका निवडणुकीवेळी महाड येथे झालेल्या राजकीय हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या फरारी मुलगा विकास याच्या अटकपूर्व जामीनाबाबात सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला जोरदार चपराक लगावली. त्याला पकडण्यामध्ये चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट करीत न्यायमूर्ती जमादार म्हणाले “दबाव तुमच्यावर असेल, माझ्यावर नाही. तो पाच वाजेपर्यंत शरण येणार की नाही?, ते कळवावे नाहीतर मी माझे आदेश जारी करणार,असे खडसावले होते. त्यावेळी त्यानंतर महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सायंकाळी हायकोर्टाला सांगितले की, मंत्री गोगवले यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी आपल्या मुलाशी संपर्क साधून त्याला शरण यायला सांगितलं आहे, अशी हमी देत हायकोर्टाकडे उद्यापर्यंतचा वेळ मागण्यात आला. (High Court delivers a blow to Fadnavis)
शरण येण्यास शुक्रवारी ११ पर्यंत मुदत
त्यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी स्पष्ट केलं की, राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणं गरजेचं आहे. केवळ त्याकरता आम्ही तुम्हाला उद्यापर्यंतचा वेळ देतोय. मात्र उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या सुनावणीपूर्वी मंत्र्याच्या मुलाला तपास यंत्रणेपुढं शरण यायला सांगा, असे निर्देश देत हायकोर्टानं विकास गोगवलेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तहकूब केली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
रायगडमधील महाड परिसरात दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात फरार झालेल्या विकास गोगावले आणि महेश गोगावले या दोघांना अटक करण्यात टाळाटाळ का करताय?, असा सवाल करत हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारची खरडपट्टी काढत गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आजच्या सुनावणीवेळी त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आल्यानंतर कोर्ट भडकले. याप्रकरणी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश याला पाठीशी का घातलं जातंय? त्यांना अद्याप अटक का केली नाही?, असा सवाल करत न्या. माधव जामदार यांच्या रायगड पोलिसांना धारेवर धरत धरले. याप्रकरणी विकास गोगावले आणि महेश गोगावले यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं २३ डिसेंबरला फेटाळला. (High Court delivers a blow to Fadnavis)
नोटरीसमोर हजर राहूनही पोलिसांना का सापडत नाही
न्यायालयाने विकास गोगावले आणि महेश गोगावले यांना पोलीस अटक करू शकलेले नाहीत, हे आश्चर्यकारक आणि गंभीर निरीक्षण नोंदवले. त्यावर राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सांगितलं की, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यावर पोलीस रेकॉर्डनुसार महेश गोगावले फरार आहे. मात्र, त्याच महेश गोगावलेनं १४ जानेवारी रोजी नवी मुंबईतील एका नोटरीसमोर हजर राहून या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी कशी केली?, जर आरोपी नोटरीसमोर हजर होऊ शकतो, तर तो पोलिसांना कसा सापडत नाही? यावरून पोलिसांचा कल आरोपींना वाचवण्याकडे आहे का?, असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला. (High Court delivers a blow to Fadnavis)