जमीर काझी : मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी आणि छाननी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी दिले आहेत. त्यानुसार १६ व १७ एप्रिलला ही तपासणी केली जाणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयाने अशा प्रकारे आदेश दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते व काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान दिली. (High Court Orders Inspection of EVMs. Mumbai High Court)
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्या.सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाबाबत नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीम ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील — म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मधील — ‘बर्न झालेली मेमरी’ किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.” (High Court Orders Inspection of EVMs. Mumbai High Court)
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ईव्हीएम उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल मुंबईत केवळ ‘निदान चाचणी करण्यास परवानगी दिली जाईल. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये ईव्हीएम आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. (High Court Orders Inspection of EVMs. Mumbai High Court)