नवी दिल्ली : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रिती पवारने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत क्रीडा नगरीत भारताचा तिरंगा फडकावला. जस्मिन लँबेरियानेही पाठोपाठ सुवर्णपदक जिंकत भारताचा डबल बार अडवून दिला. दोघींवर संपूर्ण देशातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Gold medal for Preeti Pawar in boxing)
प्रितीचा कॅनडाच्या स्कार्लेंटवर जबरदस्त पंच
आज झालेल्या ५४ किलो वजनी गटात प्रिती पवार आणि कॅनडाच्या स्कार्लेट डेलगाडो यांच्यात अंतिम लढत झाली. अचूक पंच, प्रभावी आक्रमण आणि बचावाच्या बळावर तिने यश खेचून आणले. प्रितीने या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत तिने झांबियाच्या कॅथरीन म्वापे हिचे ५-० असे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत दमदार खेळाच्या जोरावर तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. (Gold medal for Preeti Pawar in boxing)
जस्मिनने वॉल्शलना एकतर्फी हरवले
५७ किलो वजनी गटात भारताच्या जस्मिन लँबोरियाने मालकेला वॉल्शलना ५-० असे हरवत सुवर्णपदक पटकावले. अटीतटीच्या लढतीत लॅम्बोरियाने पहिली फेरी जिंकली. दुसऱ्या फेरीतही तिने आक्रमक खेळाने वर्चस्व गाजवले. प्रतिस्पर्धी खेळाडूवर तिने जोरदार प्रहार करत विजय मिळवला. प्रिती पवारनंतर लँबोरियानेही सुवर्णपदक जिंकत डबल बार उडवून दिला.
प्रिती पवार भारतीय सेनादलाची सुभेदार
२००३ मध्ये जन्मलेली प्रिती पवार ही हरियाणातील भिवानी गावची आहे. तिचे आई आणि वडील दोघेही माजी खेळाडू आहेत. वयाच्या १४ वर्षी तिचे बॉक्सर असलेले काका विनोद पवार यांनी बॉक्सिंगची ओळख करुन दिली. काकांच्या अकादमीत तिने बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. २०२५ पासून भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. २०२५ च्या जागतिक बॉक्सिंग कपमध्येही तिने ५४ किलो गटात सुवर्णपदक मिळवले होते. तर २०२२ च्या अशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ब्राँझ पदक मिळवले होते. (Gold medal for Preeti Pawar in boxing)