- विजय चोरमारे
नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनानं अभिजित दीपके हा नवा चेहरा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकला. आईसा या डाव्या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा वोरानंही देशवासियांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघांपाठोपाठ आणखी एक नवा चेहरा पुढं आला. त्या चेह-याचं नाव आहे गुरमेहर कौर. नऊ वर्षांपूर्वी भाजपच्या ट्रोल आर्मीनं छळलेल्या एका शहिदाची मुलगी असलेल्या गुरमेहरनं थेट काँग्रेसच्या मंचावरून राजकारणात एंट्री घेतली आहे. (Who is Gurmehar Kaur?)
काँग्रेसच्या हेल्पलाइनची घोषणा
जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू झाले, तेव्हा गुरमेहर कौर चर्चेत नव्हती. त्या आंदोलनाचे चर्चित चेहरे वेगळे होते. काँग्रेसनं उघडपणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उडी घेतली, त्यानंतर गुरमेहरची चर्चा सुरू झाली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं मदतीचे दरवाजे खुले केले. गुरमेहर कौरनं काँग्रेसच्या मंचावरून पत्रकार परिषद घेतली.
नीट पेपरफुटीच्या विरोधात देशभरात आंदोलन करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची घोषणा तिनं केली. ती युवक काँग्रेसच्या विद्यार्थी विंगची सक्रिय कार्यकर्ती आहे. राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ अंतर्गत कायदेशीर मदतीसाठी हेल्पलाइन नंबर (98118-67474) जारी करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. (Who is Gurmehar Kaur?)
हेही वाचाः दिल्लीतल्या लाठीमारानं देश शुद्धीवर आलाय का ?
देशाच्या कोणत्याही भागात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर तसेच सर्व प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसनं ही हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यानिमित्तानं युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि एका शहिदाची मुलगी असलेल्या गुरमेहर कौर हिला मुख्य चेहरा बनवलं.
Gen-Z चा प्रभावी आवाज
या मोहिमेसह गुरमेहर कौर आज देशातील विद्यार्थी आंदोलनाचा, Gen-Z चा प्रभावी आवाज म्हणून पुढं आली आहे. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षानं या युवा कार्यकर्ती आणि लेखिकेला राष्ट्रीय पत्रकार परिषदेच्या मुख्य मंचावर आणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजपचा आयटीसेल जुनाच खेळ खेळत असताना काँग्रेसनं खेळलेली ही स्मार्ट चाल चर्चेचा विषय ठरली आहे. (Who is Gurmehar Kaur?)
हेही वाचाः आळशी काँग्रेस आणि कॉक्रोच
गुरमेहर कौर ही एका शहिदाची मुलगी आहे. शहिदाची मुलगी ते ‘नेक्स्ट जनरेशन लीडर’ असा तिचा प्रवास सुरू झाला आहे.
वडिल शहीद झाले…
पंजाबच्या जालंधरमधील एका सैनिकी कुटुंबापासून तिची कहाणी सुरू होते. तिचे वडिल कॅप्टन मनदीप सिंग भारतीय सैन्याच्या ‘४ राष्ट्रीय रायफल्स’मध्ये तैनात होते. ६ ऑगस्ट १९९९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेदरम्यान त्यांच्या कंपनी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला, त्यात ते शहीद झाले. तेव्हा गुरमेहर अवघी दोन वर्षांची होती. वडिलांच्या हौतात्म्यानंतर आई राजविंदर कौर यांनी गुरमेहर आणि तिची लहान बहीण बानी कौर यांचं संगोपन केलं
गुरमेहर यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. दिल्ली विद्यापीठाच्या ‘लेडी श्रीराम कॉलेज’मधून तिनं इंग्रजी साहित्यातील पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात परतली असून इथे तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
`अभाविप`ने निर्माण केलेला वाद
२०१७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या ‘रामजस कॉलेज’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवल्यानंतर गुरमेहर पहिल्यांदा देशभरात चर्चेत आली होती. त्यावेळी तिनं सोशल मीडियावर हातात एक फलक घेऊन मोहीम चालवली होती. (Who is Gurmehar Kaur?)
जेएनयूमध्ये कन्हैय्याकुमार आणि सहकाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी व्हिडिओमध्ये छेडछाड करून अभाविपनं ‘देशद्रोही देशद्रोही’ खेळ सुरू केल्याचं आपल्याला आठवत असेल. त्यानंतर त्यांनी कथित देशभक्ती मिरवण्यासाठी एका शहिदाच्या मुलीला छळलं होतं, ती मुलगी म्हणजे गुरमेहर.
‘मी अभाविपला घाबरत नाही’ असं म्हणणाऱ्या गुरमेहरचा एक फोटो नियोजनपूर्वक वायरल करण्यात आला. ज्यामध्ये तिच्या हातातील फलकावर लिहिलं आहे की, ‘पाकिस्ताननं माझ्या वडिलांना नाही मारलं, युद्धानं मारलं’ (Who is Gurmehar Kaur?)
या फोटोवरून देशात एक नवं विखारी वातावरण तयार करण्यात आलं. कारगील युद्धातील शहीदाच्या वीस वर्षांच्या मुलीवर तुटून पडणाऱ्या या तथाकथित देशभक्तांनी त्या फोटोमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक एक फलक चुकीच्या पद्धतीने वायरल केला. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा काही खेळ त्यांना हवा होता, तो गुरमेहरच्या फोटोमुळं आयता मिळाला.
मोठ्या व्हिडिओमधला सुटा फलक
गुरमेहर कौर हिचा फलक घेतलेला फोटो वादग्रस्त करण्यात आला, तो त्याआधी काही महिन्यांपूर्वी यूट्यूबवर वायरल झालेल्या एका व्हिडिओचा भाग होता. त्या व्हिडिओमध्ये गुरमेहरने न बोलता केवळ या फलकांच्या माध्यमातून आपली कहाणी सांगितली होती. हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. गुरमेहरनं न बोलता फलकांच्या माध्यमातून आपली कहाणी सांगितली आहे. तिचा सारांश असा होता :
माझं नाव गुरमेहर कौर आहे (Who is Gurmehar Kaur?)
मी भारतातल्या जालंधर शहरात राहते
माझ्या वडिलांचं नाव कॅप्टन मनदीप सिंह आहे…
अशी सुरुवात करून तिनं पुढं एकेका फलकावर म्हटलंय –
माझे वडिल १९९९च्या कारगील युद्धात मारले गेले.
मी दोन वर्षांची होते, तेव्हा त्यांचं निधन झालं.
त्यांच्याशी संबंधित खूप कमी आठवणी माझ्याजवळ आहेत.
वडिल नसताना काय जाणवतं, याच्याच अधिक आठवणी माझ्याजवळ आहेत.
मीही पाकिस्तानचा द्वेष करीत होते

मला आठवतं की, मी पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोकांचा किती द्वेष करीत होते, कारण त्यांनी माझ्या वडिलांना ठार केलं होतं.
मी मुसलमानांचाही द्वेष करीत होते, कारण मी समजत होते की सगळे मुसलमान पाकिस्तानी असतात.
मी सहा वर्षांची असताना एका बुरखाधारी महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा मला वाटत होतं की तिनंच माझ्या वडिलांना मारलं असेल.
माझ्या आईनं मला अडवलं आणि समजावलं की,
पाकिस्ताननं माझ्या वडिलांना नाही मारलं, युद्धानं मारलं
(हाच एक फलक घेतलेला फोटो वायरल करण्यात आला.)
वेळ लागला पण आज मी माझ्यातील द्वेषाची भावना नष्ट करण्यात यशस्वी झाले.
हे सोपं नव्हतं परंतु अवघडही नव्हतं. (Who is Gurmehar Kaur?)
जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकता.
आज मी माझ्या वडिलांप्रमाणं सैनिक बनले आहे.
मी भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी लढते आहे.
कारण जर आमच्यात युद्ध झालं नसतं, तर आज माझे वडिल जिवंत असते.
मग आम्ही हे का नाही करू शकत?
बहुतेक भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना शांतता हवी आहे, युद्ध नव्हे
मी दोन्ही देशांच्या नेत्यांच्या क्षमतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करते
आम्ही तिसऱ्या दर्जाच्या नेतृत्वाखाली पहिल्या दर्जाचा देश नाही बनवू शकत
प्लीज, तयार राहा, परस्परांशी चर्चा करा आणि काम पूर्ण करा
खूप झाला स्टेट प्रायोजित दहशतवाद
स्टेट प्रायोजित हेर खूप झाले. स्टेट प्रायोजित द्वेष खूप झाला
सरहद्दीच्या दोन्ही बाजूला खूप लोक मारले गेलेत
बस्स, खूप झालं
मला असं जग हवंय, जिथं कुणी गुरमेहर कौर नसेल, जिला आपल्या वडिलांच्या आठवणी सतावताहेत
मी एकटी नाही. माझ्यासारखे अनेक आहेत.
शहीदाच्या मुलीवर विकृत हल्ला
हे सगळं वाचल्यानंतर लक्षात येतं, की एका शहीदाच्या मुलीवर विकृतपणे हल्ला करणारे कोण लोक होते आणि त्यांचा हेतू काय होता. तिसऱ्या दर्जाचं नेतृत्व हा शब्द अनेकांच्या जिव्हारी लागला. त्याचमुळं अभाविप पासून ते थेट किरण रिजिजू, रविशंकर प्रसाद यांच्यासारखे मंत्री मैदानात उतरले. एका वीस वर्षांच्या शहिदाच्या मुलीला आरोपीच्या पिंज-यात उभे करू लागले. आणि त्यांचे भक्त तिला बलात्कारापासून ठार मारण्यापर्यंतच्या धमक्या देऊ लागले.
हेही वाचाः धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना
त्या घटनेला नऊ वर्षे झाली आहेत आणि नऊ वर्षांपूर्वी तथाकथित देशभक्तांनी छळलेली गुरमेहर ऑक्सफर्ड विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातली पदव्युत्तर पदवी घेऊन परतली आहे. (Who is Gurmehar Kaur?)
नऊ वर्षांपूर्वीचा काळ भाजप समर्थकांच्या उन्मादाचा काळ होता. आज तो ओसरलाय असं म्हणता येत नाही. त्यावेळी गुरमेहरला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली होती. पण ती मागं हटली नव्हती. तिचं धैर्य पाहून ‘टाइम मॅगझिन’नं २०१७ मध्ये जगाला प्रभावित करणाऱ्या १० तरुणांच्या यादीत ‘नेक्स्ट जनरेशन लीडर: फ्री स्पीच वॉरियर’ म्हणून तिचं नामांकन केलं होतं.
लेखिका गुरमेहर आंदोलनात
गुरमेहर कौर लेखिका असून तिनं ‘स्मॉल ॲक्ट्स ऑफ फ्रीडम’ आणि ‘द यंग अँड द रेस्टलेस’ ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. आपल्या कुटुंबाचा इतिहास, वडिलांचे बलिदान आणि भारतीय राजकारणात तरुणांचा सहभाग यावर तिनं मोकळेपणानं भाष्य केलं आहे. तीच निडर गुरमेहर आज प्रचंड आत्मविश्वासानं काँग्रेसच्या मंचावर आली आहे. राहुल गांधी यांच्या राजकारणाशी जोडली गेली आहे.
२०१७ मध्ये वीस वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या गुरमेहरला धमक्या मिळत होत्या, तेव्हा राहुल गांधींनी तिला पाठिंबा दिला होता. “भीती आणि अत्याचाराविरुद्ध असहमतीचा आवाज उठवणाऱ्या या मुलीच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे.” असं राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते. (Who is Gurmehar Kaur?)
नऊ वर्षांनंतर नीट पेपर फुटीच्या विरोधात जेव्हा देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली, तेव्हा राहुल गांधींचं ‘युथ पॉलिटिक्स’ आणि गुरमेहर यांची विचारसरणी एकत्र आली. काँग्रेसला एका नव्या तरुण चेह-याची गरज होती. त्याचमुळं ज्येष्ठ चेहऱ्यांना बाजूला ठेवून गुरमेहर कौरला राष्ट्रीय पत्रकार परिषदेचा मोठा मंच देण्यात आला. एका शहीद सैनिकाची मुलगी असल्यानं तिच्या मांडणीला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं.
गुरमेहर कौर आता केवळ सोशल मीडियावरची ‘पोस्टर गर्ल’ राहिलेली नाही, तर ती विद्यार्थी आंदोलनाचा, काँग्रेसच्या युवा राजकारणाचा नवा चेहरा बनली आहे.
काँग्रेस वॉर रुमची रणनीती
गुरमेहरला अचानक पत्रकार परिषदेत आणलं नाही. तर त्यामागे काँग्रेसच्या ‘वॉर रूम’चं दीर्घकालीन नियोजन होतं. राहुल गांधींना देशाच्या राजकारणातील ‘नेतृत्वाचा’चा चेहरा आणि रचना बदलायची आहे. सुशिक्षित विषय तज्ज्ञ आणि तरुण कार्यकर्ते पॉलिसी बनवण्यात आणण्याच्या त्यांच्या मोहिमेचा हा भाग आहे. नीट पेपर फुटीविरोधात रणनीती आखण्यात आली, तेव्हा गुरमेहर यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांचा आराखडा तयार करणाऱ्या मुख्य रणनीतिकार म्हणून बॅकएंड टीममध्ये समाविष्ट करण्यात आले.
२०१७ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. एका शहीद सैनिकाची मुलगी राष्ट्रीय मंचावरून देशातील विद्यार्थ्यांचे अश्रू आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचा हिशेब मागते आहे. अशावेळी भाजपच्या छावणीतल्या लोकांना राष्ट्रवादाचं घासून गुळगुळीत झालेलं कार्ड खेळणं कठिण जाणार आहे.
नीट पेपर फुटीविरोधात सुरू झालेलं हे आंदोलन अजून थांबलेलं नाही. कायदेशीर लढाईची तयारी सुरू आहे आणि या लढाईला धार देण्यासाठी गुरमेहर कौर या आंदोलनाचा सर्वात नवा, तरुण आणि आक्रमक चेहरा बनली आहे.