नवी दिल्ली : ‘पेनल्टी चुकल्यावर मी खचलो होतो’, अशी कबुली अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कबुली दिली. सामन्याच्या ६७ व्या मिनिटापर्यंत २-० ने मागे असलेल्या अर्जेटिनाने कमबॅक करत इजिप्तवर ३-२ असा थरारक विजय मिळवला. सामना संपल्यावर मेस्सीला रडू फुटले होते. त्याच्यादृष्टीने हा सामना खूपच तणावात गेला. पण शेवटच्या क्षणी मेस्सीने जिगरबाजी दाखवत त्यांच्या संघातील खेळाडूंनी अर्जेटिनासाठी विजय खेचून आणला. (Messi missed the penalty)
सामन्याच्या सुरवातीला अर्जेटिनाला पेनल्टी मिळाली. त्यामुळे अर्जेटिना समर्थकांनी जल्लोष सुरू केला. पेनल्टी मारण्यासाठी मेस्सी आला. त्याने मारलेली पेनल्टी किक इजिप्तचा गोलरक्षक मुस्तफा शोबेरने रोखल्याने अर्जेटिना संघातील खेळाडू आणि समर्थकांच्या पोटात खड्डा पडला. या विश्वचषक पेनल्टी चुकल्याची मेस्सीची दुसरी वेळ होती.
…मला खूप राग आला होता.
सामन्यानंतर चुकलेल्या पेनल्टीबद्दल मेस्सीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पेनल्टीची संधी गमावल्याने मी खूप निराश झालो होते. आपण आपल्या सहकाऱ्यांना निराश केले आहे, अशी भिती वाटत होती. मी ज्या पद्धतीने पेनल्टी मारली त्याबद्दल मला खूप राग आला होता. एका महत्वाच्या क्षणासाठी मी संघाला निराश केले. पण सुदैवाने शेवटी देवाने पुन्हा एका माझ्यासाठी काहीतरी खास राखून ठेवलं होतं. मी बरोबरीचा गोल करु शकलो. हा आमच्यासाठी आणि सर्वांसाठी खूप मोठा दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाजी गोष्ट होती. अर्जेटिनी म्हणून आम्ही काय करत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. (Messi missed the penalty)
मेस्सीकडून संघाच्या झुंजार वृत्तीचेही कौतुक
स्वत:च्या चुकीची कबुली देताना मेस्सीने आपल्या संघाच्या झुंजार वृतीचेही कौतुक केले. संघाच्या हार न मानण्याच्या वृतीमुळेच आम्ही एका कठीण परिस्थितीतून बाहेर पडलो, असेही मेस्सी म्हणाला. मी अनेकदा सांगितले आहे, वारंवार सांगतो आहे. हा एक असा संघ आहे जो स्पर्धा करतो. संघ नेहमी आपले सर्वस्व देतो. जो कधीही हार मानत नाही, कधीही माघार घेत नाही.
यासर इब्राहिमचा परफेक्ट हेडर
या सामन्यात अर्जेटिनाला १५ व्या मिनिटाला इजिप्तने धक्का दिला. यासर इब्राहिमचा हेडर इतका परफेक्ट होता की गोलरक्षकाला बचाव करण्याच् संधीच मिळाली नाही. मेस्सीची पेनल्टी शोबरने रोखली. त्यानंतर अलेक्सिस मॅक अलिस्टर, ज्युलियन अल्वारेज यांचे फटकेही गोलरक्षकाने रोखले. बॅलोन डी ओरने मारलेली फ्री क्रीक क्रॉसबारला तटली. मध्यंत्तरास इजिप्त १-० ने आघाडीवर होता.
सलाहच्या पासवर हसनचा दुसरा गोल
उत्तरार्धातही अर्जेटिनाला निराशजनक क्षणांना सामोरे जावे लागले. मुस्तफा झिकोने गोल नोंदवला पण व्हीएआर घेतल्यानंतर तो गोल पंचांनी रद्द केला. एकीकडे परतफेड करण्यासाठी अर्जेटिनाची आक्रमणे सुरु असताना इजिप्तने अर्जेटिनाला ६७ व्या मिनिटाला दुसरा धक्का दिला. मोहम्मद सलाहच्या पासवर हैसेम हसनने गोल करत २-० अशी आघाडी घेतली.
अर्जेटिनाचे कमबॅक आणि बरोबरी
अर्जेटिनाची वाटचाल पराभवाकडे चालली आहे असे वाटत असताना अर्जेटिनाने शानदार पुनरागमन केले. ७९ व्या मिनिटाला मेस्सीच्या फ्री किकवर रोमेरोने हेडरवर गोल केला. त्यानंतर चारच मिनिटांनी कर्णधार मेस्सीने डी मधून मारलेल्या वेगवान फटका गोलजाळ्याचा अचूक वेध घेत सामना २-२ बरोबरीत आणला. मेस्सीचा फटका गोलरक्षकाच्या हाताला लागून क्रॉसबारच्या खालच्या बाजूला लागून गोलमध्ये गेला.
स्टापेज टाईममध्ये फर्नांडिसने हेडरद्वारे गोल करत अर्जेटिनाला आघाडीवर नेले. हीच आघाडी कायम टिकवत अर्जेटिनाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. १२ जुलैला अर्जेटिनाचा स्वित्झर्लंडशी सामना होणार आहे. (Messi missed the penalty)