Home » Blog » गांधी अजून मेला नाही!

गांधी अजून मेला नाही!

by प्रतिनिधी
0 comments
Gandhi is not dead yet

लंडनमध्ये पार्लमेंट स्क्वेअर परिसरात चालत असताना अचानक गांधीजी दिसले. क्षणभर आश्चर्यच वाटले. ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा दागिना – हिंदुस्तान – ज्याने इंग्रजांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतले, त्या माणसाचा जिवंत भासणारा तांब्याचा पुतळा इंग्लंडच्या संसदेसमोर, इतक्या महत्त्वाच्या जागी उभारलेला आहे?

मनीष सिंग

मला या पुतळ्याची माहिती नव्हती. कुठे वाचलेलेही नव्हते. शोध घेतल्यावर कळले की हा पुतळा २०१५ मध्येच बसवण्यात आला. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी गांधीजी आफ्रिकेतून भारतात परत आलेल्या घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त तिचे अनावरण केले होते. ही किती मोठी विसंगती आहे! ज्या काळात भारतात गांधींना नाकारण्याची, त्यांच्याविरोधात बोलण्याची लाट उसळली आहे, त्याच काळात जगभरात गांधींची स्वीकारार्हता मात्र वाढतच चालली आहे.

गांधी हे फक्त भारताचे राष्ट्रीय प्रतीक नाहीत. ते तर जगाचे नैतिक दैवत आहेत. येशू ख्रिस्तांची पूजा फक्त पॅलेस्टाईनमध्ये होत नाही. पॅलेस्टाईन हा येशूंचा, तसे भारत हा गांधींचा फक्त रंगमंच आहे.

रामचंद्र गुहा यांनी २०१३ मध्ये गांधींचे चरित्र लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रचारासाठी ते अमेरिकेत गेले होते. हॉटेलमध्ये खोली साफ करायला आलेल्या कर्मचाऱ्याने पुस्तकावरचा फोटो पाहिला आणि विचारले –“हे तर तरुण गांधी आहेत ना?” वकिलाच्या पोशाखातल्या गांधींना तो ओळखतोय, याचे गुहांना आश्चर्य वाटले. त्यांनी होकार दिला. तो कर्मचारी म्हणाला – “आमच्या देशात गांधींचा फार मान आहे.” मग गुहांनी विचारले – “तुझा देश कोणता?” तो म्हणाला – “डोमिनिकन रिपब्लिक.” कदाचित गांधींनी कधी डोमिनिकन रिपब्लिकचे नावही ऐकले नसेल. पण आज डोमिनिकन रिपब्लिकला गांधी माहीत आहेत. (Gandhi is not dead yet)

कारण गांधींचा संदेश आहे – सत्य, सहिष्णुता, सत्याग्रह आणि माणुसकी. या मूल्यांत बुद्ध आणि येशू यांचीच परंपरा पुढे चाललेली दिसते. हा संदेश एखाद्या राजकारण्याचे भाषण नाही. हे जीवन आहे, जगण्याची पद्धत आहे.

जगाने दोन महायुद्धे पाहिली. भाषा, धर्म, रंग, वंश यांच्या श्रेष्ठत्वाच्या भांडणांनी मानवतेला विनाशाच्या उंबरठ्यावर नेले. अशा वेळी थकलेले, गोंधळलेले मन गांधींमुळे पुन्हा माणुसकीकडे वळते. जर अमेरिका आणि युरोप गांधींना “मानवतेच्या अलीकडच्या स्मृतीतील तारणहार” मानत असतील, तर त्यात भारतभूमीचा काहीच वाटा नाही, असे नाही.

गांधींची महानता याच्यात आहे की ते कुणालाही घाबरवत नाहीत. खरा महान तोच, ज्याची भव्यता भीती निर्माण करत नाही. ज्याच्यावर टीका करता येते, प्रश्न विचारता येतात. गांधींच्या अहिंसेला “बायकी” म्हणून हेटाळले गेले. त्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, लैंगिक वर्तनावरही चर्चा झाली. गांधींबाबत सर्व प्रकारची चर्चा खुली आहे. पण चीनमध्ये माओ, पाकिस्तानमध्ये जिन्ना, व्हिएतनाममध्ये हो-चि-मिन्ह यांच्यावर अशी मोकळी टीका होत नाही. लिंकन किंवा फ्रँकलिन यांच्यावरही सहज प्रश्न विचारता येत नाहीत. (Gandhi is not dead yet)

गांधी मात्र नाकारता येतात. त्यांना मानायचे की न मानायचे – तुमच्यावर आहे. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते –गांधींपासून दूर जाणारा प्रत्येक मार्ग शेवटी भयावह ठरतो. तो द्वेषाकडे, हिंसेकडे, विनाशाकडे जातो. कौतुक म्हणून माणूस थोडा पुढे जातो, पण रक्ताचा धूर दिसताच परत फिरतो. हो.तुम्ही माणूस असाल, तर शेवटी तुम्हाला गांधींकडेच परत यावे लागते.

कारण गांधी तुमची ताकद आहेत. गांधी ही भित्र्या लोकांची ताकद आहे. सामान्य, शांतताप्रिय, घाबरट माणूस संघर्षाला घाबरतो. क्रांतीला घाबरतो. हातात शस्त्र घेऊन पुढे जाण्याची त्याची हिंमत नसते. कायदा, पोलीस, तुरुंग, सरकार, मृत्यू – यांना तो घाबरतो. गांधी त्यालाच उभे करतात. ते सांगतात – अहिंसक राहा, पण निर्भयपणे सत्य बोला. निर्भयता येते सत्य उघड झाल्यावर, कर्तव्याची जाणीव जागी झाल्यावर. इतरांचे दुःख समजून घेण्याची आणि ते दूर करण्याची जबाबदारी स्वीकारल्यावर. गांधी तुमची करुणा जागवतात. ते चरखा फिरवायला सांगतात. कपड्यांची होळी करायला लावतात. मीठ बनवायला सांगतात.  साध्या कृतींना ते प्रतिकाराचे चिन्ह आणि क्रांतीचे शस्त्र बनवतात. बंदूक उचलायला घाबरणारे, बॉम्ब नको म्हणणारे लोक टकळी फिरवतात. तुमच्यासारखे लाखो लोक तेच करतात.आता चरखा कोणाचाही रंग, धर्म, भाषा राहत नाही. तो सगळ्यांचा होतो. तो एकत्रित प्रतिकार बनतो. हे कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही. यासाठी तुरुंगात गेलात तरी अपराधबोध नाही, अभिमान वाटतो. आणि जेव्हा तुरुंगात जाणेच अभिमानाची गोष्ट बनते…तेव्हा त्या समाजाला किती काळ दडपून ठेवणार?असा थेंबाथेंबाचा प्रतिकारच शेवटी त्या साम्राज्याला वाहून घेऊन गेला. ज्याच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही, असे म्हणत.

त्याच पार्लमेंट स्क्वेअरमध्ये चर्चिलचाही पुतळा आहे. ज्याने युद्धे लढली, साम्राज्य वाचवले. तोच चर्चिल, ज्याने बंगालमधील सगळा तांदूळ ब्रिटनला नेऊन चार लाख लोकांना उपासमारीने मरू दिले. जेव्हा या मृत्यूंची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा फाईलवर त्याने लिहिले होते – “व्हाय हॅव्हन्ट गांधी डाइड येट?” (गांधी अजून मेला का नाही?)

पण गांधी मेला नाही. तो पसरत गेला – जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात. आज ब्रिटन लहान झाला आहे, आणि ज्या-ज्या देशांत गांधींचे पुतळे उभे आहेत, त्या साम्राज्यावर आजही सूर्य मावळत नाही. (Gandhi is not dead yet)

आज भारतात गांधींना हटवण्याचे प्रयत्न होत आहेत. पण गांधी अजिबात हलत नाहीत. ते आपल्या मारेकऱ्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतात. हिंदुस्थानात त्यांच्याकडं बघून हसतात. मी पाहतोय, ते लंडनच्या संसदेकडं बघूनही हसताहेत. जर तुम्ही बारकाईनं ऐकण्याचा प्रयत्न केला, तर हळुवार, गंभीर आवाज ऐकू येईल, नाही. मी अजून मेलो नाही!!!

(लेखक हिंदीतील मुक्त पत्रकार आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00