Home » Blog » पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?

महाराष्ट्र हादरवणा-या हत्येचे धागेदोरे पोलिसांना कसे मिळाले?

by प्रतिनिधी
0 comments

मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली आणि महाराष्ट्र हादरला. या हत्येमध्ये मुख्य आरोपी म्हणून माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे नाव आल्यामुळे त्याची देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या खटल्याचा निकाल शनिवारी (२० जून २०२६) रोजी लागणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

कोण होते पवनराजे निंबाळकर?

पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबादमधील (सध्याचे धाराशिव) येथील राजकीय नेते. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे पवनराजेंचे पुत्र. उस्मानाबादचे बडे राजकीय प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणा-या डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पवनराजे चुलत भाऊ. आणि राजकीय विरोधक. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तर पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमध्ये होते. ३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर मुंबईत आले होते. मुंबईतील कामे आटोपून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांना एका व्यक्तीसोबत बार्शी येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करावयाची होती.

पांढ-या रंगाच्या मोटारीतून पवनराजे निंबाळकर कळंबोली येथीलचार रस्ता भागात पोहचले. तिथे मारेकरी आधीपासूनच पवनराजेंवर हल्ला करण्यासाठी पाळत ठेवून होते, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीला ओव्हरेटक केले. चालकाला कार थांबवायला सांगितले. त्यावेळी मोटारीत असलेल्या पवनराजेंना गाडीतच झोप लागली होती. मारेकरी गाडीजवळ आले आणि चौकशी करण्याच्या निमित्ताने बोलू लागले. तेव्हा चालकाने पवनराजेंना झोपेतून जागे केले आणि खिडकीच्या काचा खाली केल्या. गाडीच्या काचा खाली होताच शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. चालक समद काझीही यावेळी जखमी झाला.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार मारेकरी इंडिका गाडीतून पळून गेले. काही अंतरावर त्यांनी बंदूक आणि इतर हत्यारे फेकून दिली. पनवेल येथील बेलवली गावात हल्लेखोरांनी गाडी सोडून दिली. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

कसा लागला तपास? (Who Killed Pawanraje Nimbalkar)

पवनराजे निंबाळकर हत्येचा तपास नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी सुरू केला. मात्र या तपासावर पवनराजेंच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २००८ मध्ये पवनराजे निंबाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे सूपुर्द केला.

सीबीआयने तपास हाती घेतला, त्यानंतरही पवनराजे निंबाळख हत्या प्रकरणाचे काहीच धागेदोरे मिळत नव्हते. २००९ मध्ये अचानक मुंबई गुन्हे शाखेला एक मोठा पुरावा मिळाला. एक व्यक्ती खूप ‘मोठं काम’ केल्याचं बोलतोय अशी खबर खबऱ्याने आणली. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

गुन्हे शाखेने पारसमल जैनला ताब्यात घेतले. डोंबिवलीत रहाणारा जैन सोने व्यापारी होता. पण प्रचंड नुकसान झाल्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला होता. जैन आणि दिनेश तिवारीकडून पोलिसांनी बंदूक आणि गोळ्या जप्त केल्या. २५ फेब्रुवारी २००९ रोजी जैनला अटक करण्यात आली. जैन चोरी केल्याची माहिती देत होता. जैनला दरोड्याच्या दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पण, खबरी पोलिसांना सातत्याने ‘मोठं काम’ काय केलं हे विचारा असं सांगत होता.

दरम्यान पारसमल जैनने पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाची माहिती दिली.” असे गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी जाहीर केले. तब्बल तीन वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा पहिला धागा तपास यंत्रणांच्या हाती लागला होता. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरोपी सीबीआयकडे सुपूर्द केले

राजकीय वैमनस्यातून हत्या

सीबीआयने दोषारोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, २००५ मध्ये पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे आणि मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांचे राजकीय विरोधक होते आणि त्यांची ताकद वाढत चालल्यामुळे ते पद्मसिंह पाटील यांच्यासाठी आव्हान बनत चालले होते. त्यामुळेच आपल्या राजकीय विरोधकाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांनी पवनराजे निंबाळकर यांची हत्या घडवून आणली. हत्याप्रकरणी सीबीआयने जून २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. पाटील त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार होते.

तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता.

पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा

सीबीआयने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येबाबत सविस्तर उल्लेख केला आहे. आरोपपत्रानुसार, जानेवारी २००५ मध्ये या प्रकरणातील सह आरोपी मोहन शुक्लाला पारसमल जैन आर्थिक मदतीसाठी भेटला. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला कसा धोका आहेत याची माहिती शुक्लाने जैनला दिली. त्यावेर शुक्लाने लातूरच्या सतीष मंदादे यांना भेटण्यासाठी पारसमल जैनला सांगितले. जैन हे मंदादेला घेऊन पद्मसिंह पाटील यांच्या घरी गेले आणि सुपारी दिल्याचे सांगितलं. पवनराजेंच्या हत्येची मोहीम फत्ते झाल्यानंतर अण्णा हजारे यांचीही हत्या करायची असल्याचे जैनला सांगण्यात आले. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

३५ लाखांची सुपारी (Pawanraje Nimbalkar Murder Case)

राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैमनस्यातून आपले चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला. पद्मसिंह पाटील यांनी ३५ लाखांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा दावा सीबीआयने केला आहे. २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. मात्र तेव्हापासून ते जामिनावर आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी मुंबईच्या सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीला २०११ मध्ये सुरूवात झाली होती.

यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने सर्व नऊ आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होती. त्यानुसार माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपी कोर्टात हजर झाले होते. मात्र आजही या हत्याकांडावर अंतिम निकाल लागला नाही. अवघ्या काही मिनिटांत न्यायालयाने ही सुनावणी संपली. (Pawanraje Nimbalkar Murder Case)

१४ मे रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार असे सांगितले जात होते. मात्र त्यावेळी न्यायालयात आरोपी हजर नव्हते. त्यावेळी न्यायालयाने १६ जूनला सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व आरोपी न्यायालयात हजरही झाले. न्यायाधीशांनी सर्वांची हजेरी घेतली. त्यानंतर, हा निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचे सांगून पुढील सुनावणी २० जूनला ठेवल्याचे सांगितले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00