श्रीनगर : दहशतवादाचा पराभव करण्यासाठी भारताने एकसंघ राहणे महत्त्वाचे आहे, असे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) व्यक्त केले. (Rahul Gandhi visit)
पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी श्रीनगरमध्ये भेट दिली. हल्ल्यात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांनी बदामीबाग कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलला भेट दिली.
त्यावेळी श्रीनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
‘‘पहेलगाममधील हल्ला ही एक भयानक दुर्घटना आहे. येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आलो आहे. जम्मू आणि काश्मीरच्या संपूर्ण जनतेने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी देशाला पूर्ण पाठिंबा दिला आहे,’’ असे ते म्हणाले. (Rahul Gandhi visit)
‘‘मी जखमींपैकी एकाला भेटलो, इतरांना भेटू शकलो नाही कारण ते परत गेले आहेत. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या प्रत्येकासोबत माझे प्रेम आणि आपुलकी आहे. संपूर्ण देश एकत्र उभा आहे हे सर्वांना कळावे अशी माझी इच्छा आहे,’’ असे ते म्हणाले.
गुरुवारी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा संदर्भ देताना, श्री. गांधी यांनी सांगितले की, आम्ही सर्व विरोधी पक्ष दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारच्या मागे उभे आहोत.
‘‘या दहशतवाद्यांचा हेतू समाजात फूट पाडणे, भावाभावांत भांडणे लावणे हा आहे. मात्र त्यांचा हेतू कधीही तडीस जाणार नाही. दहशतवाद्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकजुटीने उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे,’’ असे श्री. गांधी म्हणाले. (Rahul Gandhi visit)
राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. या दोघांनी त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
काश्मिरींवरील हल्ले वेदनादायी
देशाच्या काही भागात काश्मिरींच्या कथित हल्ले होत असल्याबद्दल गांधी म्हणाले, ‘‘काही लोक काश्मीरमधील माझ्या बंधू आणि भगिनींवर हल्ला करत आहेत हे पाहून दुःख होते… अशा घटना वेदनादायी आहेत. मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र उभे राहणे, एकजूट होऊन या घृणास्पद कृतीशी लढणे आणि दहशतवादाला कायमचा पराभूत करणे खूप महत्वाचे आहे.’’
राहुल गांधी यांनी व्यापारी, विद्यार्थी नेते आणि पर्यटनाशी संबंधित लोकांच्या शिष्टमंडळांचीही भेट घेतली.
हेही वाचा :
मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!
सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली
आम्ही सरकारच्या पाठीशी, पण निर्णय तडीस न्या