- प्रियदर्शन
ही गोष्ट सूर्याने किरणांना सांगितली; किरणांनी वाऱ्याला, वाऱ्यांने ढगांना, ढगांनी चंद्राला, चंद्राने धरतीला, धरतीने बिज्जींना आणि बिज्जींनी आम्हाला. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, उन्हापासून सावलीपर्यंत, सत्यापासून मायापर्यंत, क्षितिजापासून अनंतापर्यंत, आकाशापासून पाताळापर्यंत पसरलेल्या या कथेत दिवस-रात्र येत-जात राहिले, सूर्य-चंद्र उगवत-मावळत राहिले; देवतांच्या कोपाला बळी पडलेली धरती शेतकऱ्यांच्या नांगरामुळे ओसाड पडण्यापासून वाचत राहिली; आशा जीवनाला वाचवत राहिली, द्विधा प्रेमात बदलत राहिली आणि या सगळ्या रंगांनी बनणारे जीवनाचे रंग हसत राहिले. विजयदान देथा यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.
या कथेत राजा आले, रंक आले, प्रेत आले, माणसे आली, भुते आली, भांड आले, राणी आली, दाई आली; जगभरचा भाबडेपणा आला, काळाच्या कानाकोपऱ्यातली चतुराई आली. ही गोष्ट आम्हाला जागवतही राहिली आणि झोपवतही राहिली; हसवतही राहिली आणि रडवतही राहिली.
लोककथांचे विशाल विश्व
खरंच, बिज्जी—म्हणजे विजयदान देथा—नसते तर आपल्या लोककथांचे विश्व किती विशाल आहे, हे आपल्याला कदाचित कळलेच नसते. जवळपास अर्धशतक राजस्थानच्या वाळवंटी-रंगीबेरंगी, जलहीन तरीही तरल अशा प्रदेशांत फिरत-भटकत, हवेल्या, विहिरी, बावड्या, महाल, किल्ले आणि शेत-शिवारांची धूळ-माती, पाणी-वारा, आग-ताप झेलत-वेचत ते लोककथांचा तो खजिना शोधत आणि जपून ठेवत राहिले, जो मातीच्या स्मृतींचाच भाग आहे आणि स्मृतिविहीनतेच्या या नव्या उजाड प्रदेशात हळूहळू मातीत मिसळत चालला आहे.
‘बातां री फुलवाडी’चे आजवर प्रकाशित झालेले चौदा खंड म्हणजे राजस्थानी लोककथांच्या त्या समृद्ध वारशाचे दालन आहे, ज्याचा कोणत्याही संस्कृतीला अभिमान वाटावा. ही एक विलक्षण तपश्चर्या होती. एकाच जागी बसून नव्हे, तर ठिकठिकाणी फिरत बिज्जींनी ती केली. या तपश्चर्येने त्यांना साधूसारखी भ्रमंती दिली, शिशूसारखा उत्साह दिला आणि एखाद्या ऋषीसारखी उदात्तताही दिली.
लोककथांचे पुनर्सृजन
पण विजयदान देथा केवळ संग्राहक आणि संचितकार नव्हते; त्यांनी या लोककथांचे पुनर्सृजनही केले. काळाची धूळ या कथांवरून झटकली, समकालीनतेच्या आरशातून त्यांना नव्याने घडवले आणि आपल्या कल्पक लेखणीचा असा स्पर्श दिला की त्या कथा जणू जादू बनून गेल्या.
त्यांच्या सूक्ष्म नजरेने या कथांमध्ये दडलेला तो जनपक्षीय घटक शोधला, जो राजाच्या मिजासेला अंगठा दाखवतो आणि मेंढपाळाच्या फकिरीला सलाम करतो. त्यांच्या कथेतील एक भांड साधूचे रूप घेऊन एका शेठला असा भुलवतो की तो आपली सारी संपत्ती साधूच्या नावे करून टाकतो. पण त्याच क्षणी भांड आपल्या खऱ्या रूपात येतो आणि ढोल बडवत म्हणतो की हे ‘रिजकच्या मर्यादे’च्या विरोधात आहे. ही कंगालीची अशी बादशाही आहे, जी अखेर अत्याचारी राजा आणि त्याच्या मेहुण्याच्या अंताचे कारण बनते.
बिज्जींसारखी पारदर्शक नजरच एखाद्या कोल्हिणीच्या ठायी जगातील सर्वांत सुंदर स्त्रीसारखा गर्व पाहू शकते आणि एखाद्या कोल्ह्यात असा अभिमानी प्रेमी, जो सूर्य आणि चंद्राशीही झुंज द्यायला तयार होईल. कोल्हीण तहान भागवण्यासाठी तलावाकाठी जाते आणि रात्री चंद्राचे, दिवसा सूर्याचे प्रतिबिंब पाहून त्याला एखाद्या परक्या पुरुषाचा उद्धटपणा समजते. आपल्या शीलाबाबत—आपल्या ‘सत्त’बाबत—ती इतकी सजग आणि सावध आहे की तिला ‘ऊन आणि वाऱ्याचाही स्पर्श नकोसा वाटतो.’
समृद्ध भारतीयतेचा पाया
त्यांच्या ‘उलझन’ या कथेतली बंजारीण आपल्या गर्विष्ठ बंजारा पतीला सोडून जंगलात वनमानवाप्रमाणे जगत असलेल्या एका हरवलेल्या मुलाला माणूस बनवते, त्याला भाषा शिकवते आणि जग दाखवते. पुढे तो राजाचा मुलगा असल्याचे उघड होते; पण ज्या स्त्रीने त्याला राजपदास योग्य बनवले, तिचीच तो उपेक्षा करतो. आपल्या विरोधात उभ्या असलेल्या जगात स्त्रीचे धैर्य आणि तिचा एकाकीपणा यांची अशी हृदयस्पर्शी कथा बिज्जींच्या संचित खजिन्यातच संभवते.
अशा कथा असंख्य आहेत. त्यांची मालिका सुरू झाली तर दिवस पुरणार नाहीत आणि रात्री संपणार नाहीत. खरी गोष्ट अशी की विजयदान देथा यांची अचूक दृष्टी या कथांच्या माध्यमातून ते लोकतत्त्व सहजपणे निवडून आणि पारखून घेते, जो एका अर्थाने आपल्या समृद्ध आणि वास्तविक भारतीयतेचा पाया आहे.
विकसित लोकदृष्टीचा अविष्कार
बिज्जी या कथांना केवळ आधुनिक आणि बहुलतावादी वाचन देत नाहीत; ते आपल्यासमोर ती संपूर्ण परंपराच उभी करतात, जिच्यात सरंजामी जीवनदृष्टीच्या समांतर आणि तिच्या प्रतिकारातून एक लोकदृष्टीही विकसित होत गेली.
केवळ राजस्थानीत लिहिण्याचा त्यांचा आग्रह आणि नंतर त्याचे हिंदीत पुनर्लेखन करताना बिज्जींनी लोक आणि आधुनिक यांच्यामध्ये असा पूल बांधला की त्यात आपल्या भाषेची विलक्षण समृद्धी दिसते. राजस्थानी म्हणी आणि बोलींच्या थाटामाटाने सजलेली ती भाषा निःसंशय अखिल भारतीय आवाहन निर्माण करणारी ठरली. लोक आणि शास्त्रीय यांच्या दरम्यानची ही ताणलेली दोरी बिज्जींनी ज्या प्रकारे विणली आणि सांभाळली, त्याचाच परिणाम असा झाला की, एकीकडे त्यांच्या गंभीर वाचकांची संख्या मोठी होती, तर दुसरीकडे लोकरंजनाचे सर्वांत मोठे माध्यम असलेल्या सिनेमालाही त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा आपल्याकडे खेचत राहिल्या.
अनेक बिज्जींची गरज
विजयदान देथा यांचे साहित्यिक कार्य हेही सांगते की, भारताची ही विपुल आणि विराट लोकसंपदा जपण्यासाठी आपल्याला एक नव्हे, तर अनेक बिज्जींची गरज आहे. त्यांनी जपलेल्या अनेक राजस्थानी लोककथा राजस्थानच्या सीमांबाहेरही सांगितल्या आणि ऐकल्या जात होत्या. तरीही अजूनही असे प्रचंड भांडार आहे, जे अतिशय वेगाने लुप्त होत चालले आहे; कारण ज्या स्मृतीमध्ये ते साठवले आहे, त्यावर अनेक सांस्कृतिक—किंवा अपसांस्कृतिक—आघात होत आहेत.
पण हा खजिना वाचवणे आवश्यक आहे. केवळ लुप्त होत चाललेल्या एका परंपरेचे संरक्षण करण्यासाठी नव्हे, तर अशी नवी आधुनिकता घडवण्यासाठीही, जी आपल्या मुळाशी जनपक्षीय, बहुलतावादी आणि संवेदनशील आहे. अशी आधुनिकता जी जड, यांत्रिक आणि वरून दिलेली नाही; तर विजयदान देथा यांच्या कथांतील वेगवेगळ्या पात्रांमध्ये, आपल्या परंपरेतून जन्मलेल्या रक्तामांसाच्या जीवनाप्रमाणे धडधडत राहते.
आणि जिच्यात इतकी मौलिकता आहे की ती पुन्हा पुन्हा स्वतःचेच पुनर्सृजन करू शकते.
(विजयदान देथा (१ सप्टेंबर १९२६-१० नोव्हेंबर २०१३) यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.)
(प्रियदर्शन हे हिंदीतील ज्येष्ठ कवी आणि पत्रकार असून एनडीटीव्ही इंडियाचे निवृत्त कार्यकारी संपादक आहेत.)


