Home » Blog » ‘शोले’सारखाच करूण शेवट झालेला मराठी एडिटर

‘शोले’सारखाच करूण शेवट झालेला मराठी एडिटर

by प्रतिनिधी
0 comments
  • नीलेश बने

‘शोले’ म्हटलं तरी तो महान सुपरड्युपर हिट सिनेमा आठवतो. अगदी आजच्या जेन झी आणि जेन अल्फालाही आठवतो. तीन पिढ्या उलटल्या तरी ज्याची जादू ओसरली नाही असा हा सिनेमा. जवळपास साडेतीन तासांच्या या सिनेमाचा एडिटर एक मराठी माणूस होता. त्यांचं नाव एम. एस. शिंदे म्हणजे माधवराव शिंदे. शोले चित्रपटाच्या एडिटरची शोकांतिका चित्रपटाच्या करुण शेवटासारखीच आहे.

तीन लाख फुटाच्या फिल्मचे एडिटिंग

त्यांनी या सिनेमासाठी तब्बल तीन लाख फुटाची फिल्म मॅन्युअली एडिट केली होती. शोलेला मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कारही या एडिटिंगला आहे. पण या महान एडिटरचा शेवट शोलेसारखाच करूण झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. सिनेसृष्टीतील या मराठी एडिटरची आणि त्यांच्या दादा एडिटिंगची ही गोष्ट.

हेही वाचाः Dharmendra Passes Away : धर्मेंद्र गुपचूपपणे का निघून गेले?

फक्त एकदा या आकड्याचा विचार करा. पडद्यावर आपण पाहतो तो ‘शोले’ साधारण १८ हजार फुटांच्या फिल्मएवढा लांब होता. त्याची पडद्यावरील वेळ होती, तीन तास २४ मिनिटांची. पण रमेश सिप्पी यांनी शूट केलेलं फुटेज होतं तब्बल तीन लाख फूट. म्हणजे जवळपास ६० तासांचं हे शुटिंग होतं. जवळपास १७ पट लांब असलेल्या या फुटेजमधून आपण जो ‘शोले’ पाहिला, तो एडिट करणं किती अवघड असेल, त्याचा विचार करून पाहा.

कॅमे-यासमोर आणि एडिटिंग टेबलवर

आज आपण एडिटिंग म्हटलं की कॉम्प्युटरवर टाइमलाइन दिसते, हवे ते शॉट कापायचे, पुढे-मागे करायचे, आवडलं नाही तर Ctrl+Z करायचं. शिंदेंच्या काळात असं काहीच नव्हतं. समोर फिल्म होती, शॉट्स होते आणि त्यातून नेमकं काय ठेवायचं, काय कापायचं आणि दोन दृश्यांच्या मध्ये किती वेळ सोडायचा, हा सगळा निर्णय प्रत्यक्ष फिल्म हाताळत घ्यायचा होता.

‘शोले’चं शूटिंग बंगळुरूजवळच्या रामनगरच्या खडकाळ प्रदेशात सुरू होतं आणि एडिटिंग मुंबईत. त्यामुळे शिंदेंचं काम आणखी वेगळं होतं. शूट झालेली फिल्म विमानानं मुंबईला यायची. मुंबईच्या फिल्म सेंटरमध्ये शिंदे त्या रशेसवर काम करायचे. मग त्यांचा रफ कट पुन्हा बंगळुरूला रमेश सिप्पी यांच्याकडे जायचा. म्हणजे एक ‘शोले’ कॅमेऱ्यासमोर तयार होत होता आणि दुसरा ‘शोले’ मुंबईच्या एडिटिंग टेबलवर तयार होत होता.

एडिटिंगचं अवाढव्य काम

अनुपमा चोप्रा यांच्या ‘शोले: द मेकिंग ऑफ अ क्लासिक’ या पुस्तकात शिंदेंचं काम किती अवाढव्य होतं याचं चित्र दिसतं. सेटवर शूटिंग सुरू असतानाच शिंदे एडिटिंग करत होते. त्यांना या कामासाठी युनिटमध्ये प्रेमानं ‘दादा’ म्हटलं जायचं. ॲक्शन सिक्वेन्सवर काम करताना ॲक्शन डायरेक्टर जिम ॲलन आणि शिंदे यांच्यात शॉट्सबाबत वादही होत. ॲलनला आपलं शूट केलेलं ॲक्शन फुटेज जास्तीत जास्त ठेवायचं होतं, तर शिंदेंसमोर संपूर्ण सिनेमाचा वेग, लय आणि परिणाम होता आणि इथेच एडिटरची खरी ताकद दिसते.

हेही वाचाः बंडखोरीचे अढळ ‘आशा’ स्थान !

एडिटिंग म्हणजे फक्त मोठ्या फुटेजमधून छोटा सिनेमा बनवणं नाही. एखादा चेहरा दोन सेकंद आधी दाखवायचा की दोन सेकंद उशिरा, गोळी झाडण्याआधी बंदूक दाखवायची की आधी समोरच्याची प्रतिक्रिया दाखवायची, हिंसा प्रत्यक्ष दाखवायची की ती घडल्यानंतरचा परिणाम दाखवायचा, या छोट्या निर्णयांमधून सिनेमाचा स्वभाव तयार होतो. ‘शोले’मध्ये याची अनेक उदाहरणं आहेत.

हिंसेपेक्षा तिचा परिणाम

काही पूर्ण सिक्वेन्स शूट झाले, पण पडद्यावर आलेच नाहीत. ‘सूरमा भोपाली’च्या आधीचा मारुतीचा ढाब्याचा कॉमेडी सिक्वेन्स त्यातला एक. वीरू आणि जय ढाब्यावर जेवतात, गुळण्या करतात आणि ढाबेवाल्याशी भांडतात, असा तो प्रसंग होता. तो शूट झाला होता, पण अंतिम सिनेमातून गेला. सचिनचा मृत्यू दाखवणारा प्रसंगही बदलला गेला. गब्बर अहमदला मारतो ते थेट दाखवण्याऐवजी शिंदेंनी कट केला, गब्बर मुंगीसुद्धा मारतो त्या क्षणापासून पुढच्या दृश्यात मृत अहमदचा घोडा गावात येतो. हिंसा दाखवण्यापेक्षा तिचा परिणाम दाखवणारा हा कट अधिक प्रभावी ठरला.

पहिला कट तयार झाला तेव्हा तो साधारण २१ हजार फुटांचा होता, म्हणजे जवळपास चार तासांचा. त्यातून पुन्हा कात्री चालली. शेवटी पडद्यावर दिसणारा ‘शोले’ तयार झाला. आज २०२५ मध्ये ‘शोले’च्या निर्मितीवर बोलताना एडिटर अपूर्व असरानी यांनीही म्हटलं की, शिंदेंनी केलेल्या निवडींमुळेच त्या तीन लाख फुटांच्या फुटेजमधून आपण ओळखतो तो ‘शोले’ जन्माला आला. त्या सिनेमाला मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कारही एम. एस. शिंदेंना सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी मिळाला.

शोलेनंतरही पडद्यामागेच

या ‘शोले’च्या यशानंतरही शिंदे पडद्यामागचाच माणूस राहिले. त्यांनी शंभरहून अधिक सिनेमांचं एडिटिंग केलं. ‘ब्रह्मचारी’, ‘सीता और गीता’, ‘शान’, ‘सागर’, ‘सोहनी महिवाल’, ‘चमत्कार’, ‘राम जाने’ अशा अनेक सिनेमांच्या नावांमध्ये त्यांचं काम आहे. रमेश सिप्पी यांच्या अनेक सिनेमांचं त्यांनी एडिटिंग केलं. १९९५ मध्ये आलेले ‘जमाना दीवाना’ आणि ‘राम जाने’ हे त्यांचे शेवटचे सिनेमे ठरले. मात्र पुढची गोष्ट ऐकताना ‘शोले’च्या चकचकीत पडद्यामागचं दुसरंच जग दिसतं.

परळमध्ये ते तब्बल ४८ वर्षं राहिले होते. पण त्यांची इमारत कोसळली आणि त्यांना मुलगी अचला हिच्यासोबत धारावीच्या पीएमजीपी कॉलनीतल्या अवघ्या १६० चौरस फुटांच्या घरात जावं लागलं. त्या वेळी ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर फेमरची शस्त्रक्रिया झाली होती आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनचीही गरज होती. अचला त्यांची काळजी घेत होती. परिस्थिती इतकी बिकट होती की घर चालवण्यासाठी ती केक आणि फळांच्या ज्यूसच्या ऑर्डर्स घेत होती.

सेलिब्रेशनपासून दूरच

आणखी एक विचित्र योगायोग म्हणजे ‘शोले’च्या ३५ व्या वर्धापनदिनी, ज्याच्या एडिटिंगसाठी शिंदेंना फिल्मफेअर मिळाला होता, त्या दिवशी ते आणि त्यांची मुलगी त्यांच्या पडलेल्या घराच्या जागेवर आपलं सामान गोळा करत होते. अचलाने पत्रकारांना सांगितलं होतं की, वडिलांना ‘शोले’साठी पुरस्कार मिळाला असला तरी त्या सिनेमाच्या सेलिब्रेशनसाठी त्यांना कधी बोलावण्यात आलं नव्हतं.

२०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत शिंदे आपल्या फिल्मफेअर ट्रॉफीसोबत दिसतात. त्यांना विचारण्यात आलं, अमिताभ बच्चन किंवा सिनेमातल्या इतर मोठ्या लोकांकडे मदतीसाठी का जात नाही? त्यांचं उत्तर होतं, “मी त्यांच्याकडे मदत मागायला का जाऊ?” मुलगी अचलानेही सांगितलं होतं की अनेक निर्मात्यांकडे त्यांच्या वडिलांचे पैसे बाकी होते, पण ते स्वतः जाऊन आपले पैसे मागत नसत.

स्वतःची कथा एडिटरपासून वंचित

‘शोले’मध्ये गब्बर विचारतो, “कितने आदमी थे?” आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर शोधताना संपूर्ण सिनेमाचा ताण वाढत जातो. पण एम. एस. शिंदेंच्या आयुष्याच्या शेवटी एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता, ज्यांनी तीन लाख फुटांच्या फिल्ममधून अठरा हजार फुटांचा इतिहास घडवला, त्यांची स्वतःची कथा मात्र एडिट करण्यासाठी चांगला एडिटर मिळालाच नाही.

२८ सप्टेंबर २०१२ रोजी मुंबईत धारावीच्या त्या छोट्याशा घरात एम. एस. शिंदे यांचं निधन झालं. वय होतं ८३. ‘शोले’च्या पडद्यावर जय, वीरू, गब्बर, ठाकूर, बसंती आणि राधा कायमचे राहिले. पण त्या सगळ्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी आणून त्यांची कथा घडवणारा माणूस मात्र शेवटच्या काळात जवळजवळ विस्मृतीत गेला.

आज ‘शोले’ पुन्हा पाहताना कदाचित एक गोष्ट नव्यानं जाणवेल. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यामागे एक दृश्य कापलं गेलेलं आहे, प्रत्येक संवादामागे कुठेतरी एक थांबा कापलेला आहे आणि प्रत्येक थरारामागे कुणीतरी हजारो फुटांची फिल्म हातात घेऊन निर्णय घेतलेला आहे. त्या कात्रीचं नाव होतं, एम. एस. शिंदे.

सिनेमाचं जग त्यांना विसरलं असलं तरी आपण त्यांना विसरून चालणार नाही. या महान दादा एडिटरला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!