Home » Blog » Gopichand Padalkar vs NCP : राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम

Gopichand Padalkar vs NCP : राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम

by विजय चोरमारे
0 comments
BJP’s strategy through Padalkar

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अलीकडं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला. तो होणं गरजेचं होतं. त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती मोठं समर्थन आहे, हे दिसून आलं. पण एका सामान्य आमदारासाठी एवढा मोठा घाट घालण्याची आवश्यकता होती का, असाही प्रश्न विचारला जातोय. (BJP’s strategy through Padalkar)

विजय चोरमारे

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी सांगलीत मोर्चा काढून सभा घेतली. या सभेत पडळकर यांच्यासह त्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तीव्र शब्दात टीका करण्यात आली. (BJP’s strategy through Padalkar)

या मोर्चानंतर एकूणच या विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यासह फडणवीस यांचा निषेध व्हायलाच पाहिजे. परंतु एका सुमार आमदाराला एवढं महत्त्व देण्याची आवश्यकता होती का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. फडणवीसांनी पडळकरांना कोणतं टार्गेट दिलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं पडळकर यांच्याबाबतीत संयमाचं धोरण का अवलंबलं, राष्ट्रवादीतले धनगर नेते का गप्प राहिले, अशा अनेक गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.

गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास आधी समजून घ्यायला हवा. तो समजून घेतला तरच त्यांच्या बेताल बडबडीची कारणं लक्षात येतील. (BJP’s strategy through Padalkar)

राजकारणात जातीपातींचं प्राबल्य वाढू लागल्यानंतर त्याचा आक्रमक अविष्कार महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडवला तो महादेव जानकर यांनी. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख ठसवली आणि प्रस्थापित नेत्यांना ते जाहीर आव्हान देऊ लागले. त्यात आक्रमकता होती. गावरान ठसका होता, परंतु कुणाच्या आई-बहिणीचा, जन्मदात्याचा उपमर्द नव्हता. नसायचा. याच जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोपीचंद पडळकर पहिली निवडणूक लढले. २००९ साली खानापूर मतदार संघातून ते रासपचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांना १९०२४ मतं मिळाली. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. २०१४ ची विधानसभा निवडणूक ते खानापूरमधूनच भाजपकडून लढले, यावेळीही पराभव झाला, पण मतांमध्ये मोठी वाढ झाली. ती ४४ हजार ४१९ पर्यंत पोहोचली.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे वारे जोरात वाहात होते. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तव्यावर पोळी भाजून प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकारणाचा पाया विस्तारला होता. गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीकडं गेले. सांगली मतदार संघातून त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना ५ लाख ८९९५ तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांना ३ लाख ४४ हजार ६४३ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाख २३४ मते मिळाली. त्यात वंचितचा वाटा मोठा होता, परंतु तो गोपीचंद पडळकर यांचाच जनाधार असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं. गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाच्या नव्या नेतृत्वाच्या नजरेत भरले होते. असा हिरा आपल्याच पक्षात असायला हवा, असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं असल्यास नवल नाही. (BJP’s strategy through Padalkar)

आपल्याला आठवत असेल की, २०१४च्या आधी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजानं बारामतीमध्ये आंदोलन केलं होतं. तिथं भाषण करताना तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी, २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं होतं.

फडणवीस सरकारची पाच वर्षे होत आली तरी हे आरक्षण दिलं नाही. दरम्यान वंचितकडून लोकसभा लढवताना एका भाषणात पडळकर म्हणाले होते, `भाजपनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळं यापुढं कुणी भाजपला मतदान करायचं नाही. माझ्या घरातलं कुणी अगदी माझी आई उभी राहिली, मी उभा राहिलो किंवा माझा भाऊ भाजपकडून उभा राहिला तरी भाजपला मतदान द्यायचं नाही. बिरोबाची शपथ आहे तुम्हाला.`

पण बिरोबाची शपथ हवेत विरून गेली. आणि पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकर पुन्हा घराकडे परत आले आहेत. ते वंचितमध्ये गेल्यानंतर दुःख झालं होतं. कोणतीही मागणी न करता फक्त धनगर सामाजासाठी त्यांनी व्रत स्वीकारलं आहे. गोपीचंद हे ढाण्या वाघ आहेत. ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे.”

देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन लक्षात घ्या. सांगलीचा गडी थेट बारामतीला. म्हणजे तिथं जाऊन त्यांनी पवारांना यथेच्छ शिविगाळ करावी. जुबान उसकी शब्द हमारे स्टाइलनं. त्याच्या बातम्या छापून याव्यात. टीव्हीवर याव्यात. पवार कंपनीची यथेच्छ बदनामी करावी, अशी ती रणनीती होती. तोपर्यंत अजितदादांचं आणि फडणवीसांचं सूत जुळलं नव्हतं. त्यामुळं त्यांना पवारांच्यातल्या कुणाबद्दल प्रेम वाटण्याचं कारण नव्हतं.

पण बारामतीसंदर्भातला हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. कारण पडळकर अर्ज भरायला गेले तेव्हाच अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हाग्या दम देऊन ठेवला होता. त्यामुळं भाजपला ज्या रितीनं निवडणूक गाजवायची होती, तशी ती गाजली नाही. अजितदादांना एक लाख ९५ हजार ६४१ मतं मिळाली. पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं, त्यांना ३० हजार ३७६ मतं पडली. (BJP’s strategy through Padalkar)

बारामती लढल्याचं बक्षीस फडणवीस यांनी त्यांना दिलं. काही महिन्यातच पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. तिथून त्यांची जी गाडी सुसाट सुटली त्यांनी मागं वळून पाहिलं नाही.

आपली उंची किती, आपलं वय किती, आपण बोलतो किती, ज्याच्यावर बोलतो तो नेता कोण आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं पद काय आहे यापैकी कशाचाही विचार न करता पडळकरांची गाडी सुसाट सुटली.

पवार कुटुंबीय हे त्यांचं भाजपनं ठरवून दिलेलं टार्गेट होतं. त्यामुळं भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावरही पडळकर यांनी अजितदादांचा अपमान करणं सोडलं नाही.

जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे… हे पडळकरांचं ताजं विधान चर्चेत आलं. जयंत पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या सन्मानासाठी सगळे पक्ष एकवटले. ज्या विशाल पाटलांच्या विरोधात जयंत पाटील यांनी लोकसभेला काम केलं होतं, ते विशाल पाटीलही मैदानात उतरले. सांगलीत मोठा मोर्चा काढला. सभा घेतली.

त्याआधीची पडळकरांची विधानं बघा –

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोनो.

शरद पवार यांना ८० वर्षानंतर अक्कल यायला लागली आहे.

पुण्यात एक कॉकटेल घर आहे. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच.

धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी ‘सैराट’ करेल त्याला अकरा लाखांचे बक्षिस देणार.

रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला.

जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीच सांगलीचं सर्वाधिक वाटोळं केलं. जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु.

अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू

संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत नाहीत, त्यांची सुंता झाली असावी.

मुस्लिम धर्मात अनेक जाती, पण ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवतात. ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा.

वगैरे वगैरे वगैरे. कोळसा उगाळावा तेवढा काळाच अशी पडळकरांच्या विधानांची स्थिती आहे.

भाजपनं पडळकरांना दिलेलं टार्गेट हे पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचं दिसून येतं. पडळकर राष्ट्रवादीच्या टॉप लीडरशीपवर बोलतात आणि त्याचा प्रतिवाद तिसऱ्या चौथ्या फळीतले कार्यकर्ते, प्रवक्ते करतात. एकदा पत्रकारांनी अजितदादांना पडळकरांबद्दल विचारलं त्यावर ते म्हणाले, कोण कुठला उपटसुंभ त्याच्यावर बोलायला वेळ नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय.

अगदी परवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासंदर्भातील कार्यक्रमाला अजितदादांना बोलावणार नाही, असं पडळकरांनी जाहीर सांगितलं. प्रत्यक्षात अजितदादा कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अजितदादांच्या खुर्चीच्या मागं पडळकर उभे असलेले फोटोत दिसले.

पडळकर यांच्या विधानांबद्दल पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना काही वेळा विचारलं, तेव्हा त्यांनी त्यांना सूचना केली आहे वगैरे थातुर मातून उत्तरे देऊन वेळ मारून नेली. पडळकर पुन्हा पुन्हा बोलत राहिले. पवारांच्यासंदर्भात गंभीर तक्रारी झाल्या असाव्यात. त्यामुळं पवारांवर बोलू नये, अशी सूचना देण्यात आली. जाहीर कार्यक्रमात त्यांनी तसं सांगितलं. त्यानंतर पवार सोडून त्यांनी जयंत पाटील यांना धरलं. (BJP’s strategy through Padalkar)

पडळकरांना खऱ्या अर्थानं नडले ते जितेंद्र आव्हाड. त्यांनी पडळकरांना व्यवस्थित आपल्या सापळ्यात अडकवलं आणि फडणवीसांचं राजकारण एक्सपोज केलं. आव्हाड होते, म्हणून त्यांनी ते केलं. बाकी मराठा नेते नेहमी बॅकफूटवरच राहिले.

पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर घाणेरड्या भाषेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अगदी एकत्रित पक्ष असतानाही त्याचा नीट प्रतिवाद केला जात नव्हता. त्याचं कारण नेतृत्वाच्या संयमात होतं.

पडळकर यांच्यासारखा एक आमदार थेट शरद पवारांवर घाणेरड्या भाषेत बोलत होता. त्यांच्या कार्यकर्त्यांना उचकावण्याचा वारंवार प्रयत्न करीत होता. तरीही सगळं शांत होतं. त्याचं कारण सामाजिक सलोखा बिघडू नये ही पक्षनेतृत्वाची भूमिका.

जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांना मी पडळकरांबद्दलचा प्रश्न विचारला होता, तेव्हा ते म्हणाले होते, मराठा आणि धनगर यांच्यात संघर्ष सुरू व्हावा असे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पडळकर यांना त्यांनी मोकळं सोडलंय. आम्हाला ते घडू द्यायचं नाही. शरद पवार साहेबांच्या तशा सक्त सूचना आहेत.

राष्ट्रवादीतले धनगर नेते का उत्तर देत नाहीत, यावर जयंत पाटील काही बोलले नव्हते.

वस्तुस्थिती अशी होती की, उत्तम जानकर आणि सध्या कृषीमंत्री असलेले दत्ता भरणे हे राष्ट्रवादीतले दोन धनगर नेते. पडळकर यांच्या टीकेला यांनी उत्तर द्यावं, अशी पक्षातल्या नेते, कार्यकर्त्यांचीही इच्छा होती. परंतु त्यांनी कधी पडळकरांच्या विरोधात तोंड उघडलं नाही. दत्ता भरणे हे तर सत्तेचे लाभार्थी होते, परंतु त्यांनाही आपल्या नेत्यावरील टीकेला उत्तर द्यावंसं वाटलं नाही. उत्तम जानकर परवाच्या सभेत बोलले पण त्याआधी कधी त्यांनी पडळकरांचं नाव घेतलं नाही. याचा दुसरा अर्थ असा की कुठल्याही पक्षात असले तरी धनगर समाजाच्या नेत्यांचं आपसात संगनमत होतं. याउलट चित्र मराठा समाजातल्या नेत्यांचं असल्याचं दिसून येतं.
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अलीकडं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला. तो होणं गरजेचं होतं. त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती मोठं समर्थन आहे, हे दिसून आलं. पण एका सामान्य आमदारासाठी एवढा मोठा घाट घालण्याची आवश्यकता होती का, असाही प्रश्न विचारला जातोय. एका आमदाराला नेता बनवण्याचे, त्याचं महत्त्व वाढवण्याचे उद्योग आपण करतोय, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. आपले लाडके गोपीचंद पडळकर एवढे मोठे झाल्याचं पाहून देवेंद्र फडणवीस गालातल्या गालात हसलेच असतील. गोपीचंद यांना लवकरात लवकर लाल दिवा कसा देता येईल, याचं नियोजन त्यांनी सुरू केलं असेल. तर परवाच्या मोर्चाची फलनिष्पत्ती लवकरच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळण्यामध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00