सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. चप्पल फेकणारा कुणी सराईत गुन्हेगार, अडाणी किंवा अल्पवयीन नव्हता. ७२ वर्षांचा वकील होता. आपण एमएस्सी पीएचडी केल्याचा त्याचा दावा आहे. या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तो म्हणजे राकेश किशोर तिवारी नामक गृहस्थाने फेकलेली चप्पल देशाच्या सरन्यायाधीशांवर फेकली की दलित सरन्यायाधीशांवर फेकली? या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण याच मुद्द्याचा, त्यातील बारीक सारीक तपशीलांचा, भूतकाळातील संदर्भांचा, वर्तमानातील परिस्थितीचा आणि चप्पल फेकणाऱ्या प्रवृत्तींची चर्चा करणार आहोत. (Attack on Chief Justice)
संघानं पंगतीला घेतलं म्हणजे…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. म्हणजे त्यांनी आपल्याला पंगतीला घेतलं असं होत नाही. म्हणजे आपला सामाजिक दर्जा सुधारला, त्यांच्या नजरेत आपण मोठे झालो वगैरे भ्रम तयार होतात. मग त्यांचं गुणगाण करणं स्वाभाविकपणे येतं. ते कसे उदारमतवादी आहेत. सर्वसमावेशक आहेत. निर्मळ मनाचे आहेत. देशप्रेमी आहेत. आपणही कसं उदारमतवादी बनायला पाहिजे वगैरे वगैरे ज्ञान जगाला देणं सुरू होतं. रा. सु. गवईंनी हे ज्ञान दिलं होतं. कमलताई गवई या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत होत्या. गेल्या नाहीत, पण शुभेच्छांमधून त्यांनी ज्ञान दिलंच. आणि राजेंद्र गवई तर आपल्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं ठासून सांगताना जणू संघाचा गणवेश परिधान करून बसले होते. (Attack on Chief Justice)
दलित, बहुजनांना लायकी दाखवून देणे…
तर हे सगळं मुद्दाम आठवलं म्हणून. गवई कुटुंबासाठीच नव्हे तर कुणाही दलिताची, बहुजनांची त्यांच्या नजरेतून काय लायकी आहे, हेच त्यांना सर्वोच्च न्यायालयातल्या घटनेवरून दाखवून द्यायचं होतं. ते त्यांनी दाखवून दिलं. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे वगैरेंच्यावर भविष्यात ही वेळ येणारच नाही असं नाही. अगदी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, प्राऊड हिंदू म्हणून मिरवणा-या राम सातपुतेचीही सुटका होणार नाही. कारण त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आणि स्वच्छ आहे. तुम्ही शूद्र आहात. तुम्हाला उच्च स्थानावर आम्ही पाहू शकत नाही. जे बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही तिथं पोहोचला आहात. (Attack on Chief Justice)
मोदीयुगात माजलेल्यांचा उन्माद
राकेश तिवारी ही एक व्यक्ती नाही. अशा विकृत आणि सडलेल्या मेंदूच्या लोकांची देशात कमतरता नाही. सोशल मीडियावर त्यासंदर्भात ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात त्या पाहिल्यानंतर या देशाची काळजी वाटायला लागते. `आय लव्ह नथुराम`पासून `आय लव्ह राकेश रंजन`पर्यंत अनेक पोस्ट सोशल मीडियावर दिसतात. त्यातही गंभीर म्हणजे सरन्यायाधीशांच्या गळ्यात मडकं बांधलेलं आहे आणि त्यांच्या तोंडावर चप्पल मारले जात असल्याचे मीमही प्रचंड व्हायरल होत आहेत. मोदीयुगात माजलेल्या जमातीचा उन्माद शिगेला पोहोचला आहे. ज्या लोकांना वाटत होतं, की उच्चवर्णियांना म्हणजे ब्राह्मणांना राग फक्त मुस्लिमांवर आहे,त्यांचाही गैरसमज या घटनेनंतर दूर व्हायला हरकत नाही. मुस्लिमांइतकाच, किंबहुना त्यांच्याहून काकणभर अधिक द्वेष ते दलितांचा करतात, हे यावरून दिसून आले. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडेंपासून आनंदराज आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी सोशल मीडियावरचं हे चित्र बघावं आणि काय ते ठरवावं. हिंदू म्हणून टेंभा मिरवणा-या दलितांनीही हे चित्र नीट बघून घ्यावं म्हणजे त्यांना आपली जागा कळेल. (Attack on Chief Justice)
खजुराहोच्या मूर्तीचे निमित्त
हा सगळा विषय़ समजून घ्यायचा असेल तर याची सुरुवात कुठून झाली, हे पाहायला हवं.
१६ सप्टेंबरची घटना आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात चप्पलफेकीची घटना घडली त्याच्या २२ दिवस अगोदरची.
सर्वोच्च न्यायालयात राकेश दलाल नामक इसमाने एक जनहित याचिका दाखल झाली होती. मध्य प्रदेशातील खजुराहो स्मारक समूहातील जावरी मंदिरात भगवान विष्णुची सात फूट उंचीची शीर नसलेली मूर्ती आहे. या मूर्तीच्या पुनर्स्थापनेची मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं निकाल देताना सांगितले की, हा विषय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) कार्यक्षेत्रात येतो, न्यायालयाच्या नाही. (Attack on Chief Justice)
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश गवई म्हणाले, “तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णुचे निष्ठावान भक्त आहात, तर त्यांच्याकडे प्रार्थना करा. हे एक पुरातन स्थळ आहे आणि ASI ने त्यासाठी परवानगी वगैरे द्यावी लागेल.”
याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, मुघल आक्रमणादरम्यान ही मूर्ती खराब झाली होती. सरकारकडे वारंवार विनंती करूनही मूर्ती त्यात सुधारणा किंवा दुरुस्ती झालेली नाही. ब्रिटिश राजवटीत झालेले दुर्लक्ष आणि स्वातंत्र्योत्तर काळातील निष्क्रियतेमुळे स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही मूर्तीची दुरुस्ती झालेली नाही, याकडे याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. मूर्तीची पुनर्स्थापन न करणे हा भक्तांच्या पूजेच्या मूलभूत अधिकाराचा भंग आहे, असेही याचिकेत म्हटले होते. परंतु हा प्रश्न पुरातत्त्व संरक्षण विभागाच्या अखत्यारितील असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली. (Attack on Chief Justice)
सरन्यायाधीशांच्या टिपणीचा विपर्यास
ज्या राकेश किशोर तिवारी नामक वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर चप्पल फेकली, त्याचं म्हणणं असं की सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची खिल्ली उडवली. टिंगल केली. त्यामुळं मी दुखावलो गेलो होतो. या गृहस्थांना दुखावण्यासारखं सरन्यायाधीश काय म्हणाले होते, तर त्यांनी हा प्रश्न पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारितील असल्याचे सांगितले होते. आणि भगवान विष्णूचे भक्त आहात, तर विष्णूची प्रार्थना करा.. असं म्हटले होते. आता त्याचा विपर्यास करून असं सांगितलं जातंय की, सरन्यायाधीशांनी खिल्ली उडवली आणि ते म्हणाले की, विष्णूची प्रार्थना करा आणि त्यांनाच सांगा की मूर्तीचे शीर दुरुस्त करायला वगैरे वगैरे. तर प्रत्यक्षात गवई यांच्या वक्तव्याचा तसा अर्थ नसल्याचे त्यासंदर्भातील १६ आणि १७ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून लक्षात येते. चप्पल भिरकावणाऱ्याने तसा सोयीचा अर्थ काढला आहे. (Attack on Chief Justice)
एवढा गंभीर प्रकार केल्यानंतर राकेश किशोर तिवारी म्हणजे जणू कुणीतरी स्वातंत्र्ययोद्धा असल्यासारख्या त्याच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. तोही सांगतोय की, मला सोळा सप्टेंबरपासून झोप येत नव्हती. दैवी शक्ती मला सतत जागं करीत होती. देश जळतोय आणि तू झोपतोस काय, म्हणून विचारणा करीत होती.
सरन्यायाधीशांची जात डोक्यात
तर हा राकेश तिवारी हल्द्वानीच्या रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणे, दहीहंडीची उंची वाढवण्याची याचिका आणि नुपूर शर्मा केसची उदाहरणे देऊन सरन्यायाधीश कसे हिंदूंबाबत पक्षपाती असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ सरळ आहे, सरन्यायाधीशांची जात त्याच्या डोक्यात होती आणि आहे. हा भंपक माणूस पुढं असं सांगतो की, मी हिंसेच्या विरोधात आहे. अहिंसक आहे. माझ्यावर कोणतीही केस नाही. मी एमएस्सी पीएचडी एलएलबी आहे. मी नशेत नव्हतो, कसल्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या. केलेल्या प्रकाराबद्दल मला वाईटही वाटत नाही आणि कसली भीतीही वाटत नाही. सोळा तारखेपासून मला झोप नसल्यामुळं मी हे ठरवूनच कोर्टात गेलो होतो वगैरे वगैरे…
आपण फार मोठं देशकार्य केलंय अशा थाटात तो म्हणतो की, मला हे का करावं वाटलं याचं चिंतन देशानं करायला पाहिजे.
घटना घडल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी कामकाज सुरू ठेवले. आपण अशा घटनांनी विचलित होणार नसल्याचे सांगितले. त्यांनी तक्रार नोंदवली नसल्यामुळं पोलिसांनी ताब्यात घेऊन राकेश तिवारीला सोडून दिलं. त्यानंतर मात्र प्रसारमाध्यमे त्याच्या मुलाखती घेऊ लागले. मुलाखतीची प्रशंसा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे. यावरून विष किती भिनलंय हे दिसून येतं.
हिंदुत्ववादी सरकारांनी काय केलं?
राकेश तिवारी सरन्यायाधीशांवर चप्पल फेकण्याचे काहीही कारण सांगतोय आणि कृतीचं समर्थन करतोय. पण मूळ मुद्दा जो खजुराहोच्या मूर्तीचा आहे,त्याचं काय… तर इंग्रजांनी त्याकडं दुर्लक्ष केलं आणि स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांनीही दुर्लक्ष केलं. काँग्रेसनं दुर्लक्ष केलं, असं म्हणता येतं. पण मधे पाच वर्षे वाजपेयींचं सरकार होतं. गेली अकरा वर्षे मोदींचं सरकार आहे, या हिंदूंच्या सरकारांनी त्याकडं का दुर्लक्ष केलं, हा प्रश्नही विचारायला पाहिजे. पुरातत्त्व विभागाकडील कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा राज्यसरकार करू शकतं. तर गेल्या ३५ वर्षांपैकी मध्य प्रदेशात २५ वर्षे भाजपचं सरकार आहे. या सरकारनं त्यासाठी केंद्राकडं का पाठपुरावा केला नाही. इतका सनातन धर्माचा अभिमान असेल आणि त्यावर राजकारण केलं जात असेल तर शीर नसलेली विष्णूची मूर्ती या हिंदूंच्या सरकारांना दिसली नाही का. राकेश दलालला किंवा राकेश तिवारीला या सरकारांच्याकडं दाद मागता आली नाही का? अशी वस्तुस्थिती असेल तर मग राकेश तिवारीनं आतापर्यंत कुणाकुणावर चप्पल फेकायला हवी होती? (Attack on Chief Justice)
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दहन
तो काहीही सांगत असेल तरी त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे डोक्यातली जात. दलित समाजातील एक व्यक्ती सरन्यायाधीशपदी आहे, हे या ७२ वर्षांच्या म्हाताऱ्या वकिलाला खुपत होते. बरेच दिवस खुपत असणार. त्यासाठी त्याला काहीतरी कारण हवं होतं. ते त्याला सोळा सप्टेंबरच्या सुनावणीत सापडलं. त्यानंतरही तो २२ दिवस शांत राहिला. ही जी विकृती आहे, ती आजची नाही. अनेक वर्षांपासूनची आहे. सरन्यायाधीश भूषण गवई त्यांना खुपताहेत असं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही त्यांना खुपत होते. म्हणूनच तर हिंदू कोड बिलाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १२ डिसेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जाळला होता. रामलीला मैदानावर ११ डिसेंबरला संघाच्या बैठकीत हिंदू कोड बिलाचा निषेध केला होता. आणि १२ डिसेंबरला पुतळा जाळला होता. हा द्वेष तेव्हापासूनचा आहे. संविधानाच्या निर्माणापासून संविधानाबद्दलचा द्वेष त्यांच्या मनात आहे. तो वारंवार उफाळून येत असतो.
तर मुद्दा असा आहे, की तुम्ही कितीही त्यांच्या कार्यक्रमांना गेलात. त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलीत. तरी तुमची लायकी त्यांनी ठरवून टाकली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरचा हल्ला संविधानावरचा हल्ला आहे. न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. ही गोष्ट खरीच आहे. पण इथं न्या. चंद्रचूड असते तर अशी कृती झाली असती का, असा प्रश्न विचारून पाहिला तर उत्तर मिळेल – नाही. म्हणूनच म्हणतो. हा सरन्यायाधीशांवरचा हल्ला आहे. त्याहीपेक्षा तो दलित सरन्यायाधीशांवरचा हल्ला आहे.