Home » Blog » राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

by प्रतिनिधी
0 comments
Asha Bhosle Sangeet Jeevan Gaurav Award

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभा व विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केली.

८ सप्टेंबरदरम्यान पुरस्कार वितरण

सांस्कृतिक क्षेत्रातील गायन संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरव करणे आणि त्याद्वारे कलाक्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. हा पुरस्कार दरवर्षी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ८ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. (Asha Bhosle Sangeet Jeevan Gaurav Award)

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, महाराष्ट्राला संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट, लोककला आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रांची समृद्ध परंपरा लाभली असून भारतीय संगीताच्या विकासात राज्यातील अनेक नामवंत कलाकारांचे मोलाचे योगदान आहे. या कलाकारांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय आणि  आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

कलाकारांसाठी प्रेरणादायी पुरस्कार ठरेल

आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर आणि असाधारण व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमध्ये गायन करत संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. विशेषतः मराठीतील बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी आणि लोकसंगीताला त्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केले आहे. त्यांच्या गायकीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून त्यांची कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Asha Bhosle Sangeet Jeevan Gaurav Award)

या पुरस्काराअंतर्गत गायन-संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांचा गौरव करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे. पुरस्कारासाठी पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी गायन-संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री ॲड. शेलार यांनी दिली.

हा पुरस्कार दरवर्षी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ८ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. (Asha Bhosle Sangeet Jeevan Gaurav Award)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00