प्रखर सांगीतिक बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असलेले आशा भोसले हे नाव कधीही काळाच्या मागे पडले नाही, भूतकाळ बनले नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया… या चालीवर आयुष्य जगल्याने त्यांचे असणे नेहमीच कालसुसंगत ठरले. त्यांच्या आवाजाला प्रस्थापित, अभिजन, विशेषाधिकासंपन्नांचे वावडे नव्हते, पण त्यांचा आवाज सर्वाधिक आर्ततेने खुलला तो जगण्याने नाकारलेल्यांसाठी, समाजाच्या नजरेतल्या दुय्यमांसाठी… रुढी-परंपरांनी ठोकून बसवलेल्या चौकटींची मोडतोड करणाऱ्या बंडखोरांसाठी… आशा भोसले जाहीर न करताच आपल्या गाण्यातून स्त्रीवादाची कड घेत राहिल्या… जाहीर न करताच जगण्याचा प्रगतीशील मार्ग अवलंबत राहिल्या… आणि जाहीर न करताच नव्या जगाची प्रस्थापितविरोधी सांगीतिक भाषाही बोलत राहिल्या… (great singer asha bhosle)
- गायत्री चंदावरकर
आशा मंगेशकर. तेव्हाचे वय जेमतेम १५. शरीर – मनात खळबळ माजवणारा हा काळ. भावनांच्या उद्रेकाला धरबंध नसलेला, ज्योतीवर झेप घेऊन स्वतःला संपवण्याची बेफिकिरी असलेला. या अडनिड्या वयात खरी-खोटी स्वप्ने दाखवणारा पुरुष भेटणे, हा ट्रिगर पॉईंट ठरू शकतो, बंडखोरीचा. तसा तो ठरला. त्या वयात कौटुंबिक परिस्थितीची जाण थोडीफार असेलही, रूढी-परंपरांच्या बेड्या वारशात मिळाल्याही असतील. आपण कोण आहोत, आपली हैसियत काय हे कधी कोणी जवळच्याने ऐकवले असेलही. पण वयाच्या बेफिकिरीने हे सारे झुगारून दिले, थोरल्या बहिणीच्या आपल्यापेक्षा वयाने थोराड असलेल्या सेक्रेटरी पुरुषाबरोबर संसार मांडण्यासाठी एका धुंदीत मंगेशकरांचे घर सोडले आणि भोसलेंचे घर आपले मानले. मंगेशकरांकडचे ते पहिले लग्न. तेही कुटुंबाचा तोल बिघडवणारे. भावंडांत काही काळापुरती का होईना, नामुष्कीची भावना देणारे, कटुता निर्माण करणारे.
पित्याकडून आलेला वारसा गात्या गळ्याचा होता. थोरली तो वारसा चालवून वडिलांच्या पश्चात संसाराला कसाबसा हातभार लावत होती आणि आशा मंगेशकर ही तिच्या नंतरची मुलगी, आपल्याला काय करायचं आहे, पुढे काय करणार आहोत, पित्याच्या वारशाचं काय, कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे काय, या कशाचीही फिकीर न करता बंडखोरीचे निशाण फडकवून, कुटुंबाला लाथाडून निघून गेली होती, तेव्हाच आशा मंगेशकरची आशा भोसले झाली होती. (great singer asha bhosle)
त्यानंतर तब्बल ७७ वर्षांनी वयाच्या ९२व्या वर्षी (१२ एप्रिल २०२६) अखेरचा श्वास घेतला, तेव्हा ज्योतीवर झेप घेऊन आत्मनाशाची धुंदी असलेला हा एकेकाळचा पतंग, काळाने घडवलेला पार्श्वगायनातला लिजंड होऊन गेला होता. चैतन्याचा झरा त्या आवाजातून अखंडपणे पाझरत होता. जणू लिजंड होण्याची बीजं पंधराव्या वर्षी कुटुंबाला, जगाला, लाथाडून आगीत उडी घेण्याच्या त्या कृतीत दडली होती. सांगीतिक वारशाचे वेळीच आलेले भान आणि परिस्थितीचा असह्य रेटा या दबावातून आशा भोसले नावाचे रसायन पुढे प्रत्येक पिढीला चैतन्याची, जीवनरसाची मात्रा पुरवणारे ठरले होते.
कधीतरी कोणीतरी त्यांना त्यांच्या अलौकिक गायकीबद्दल प्रश्न विचारला होता, पण आशाबाई तुम्हाला हे सगळे जमले कसे ? त्यावर आशाबाई चेहऱ्यावर स्मितहास्य आणून म्हणाल्या होत्या, ती माझी अपरिहार्यता होती…
चौकटीत राहून चौकटीची मोडतोड
आशाबाईंचा जन्म झाला, तो काळ १९३० च्या दशकाचा. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या अस्थिर अवकाशाचा, दुसऱ्या महायुद्धाची बीजे पडण्याचाही. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग येण्याचा, आदर्शाची नवी मांडणी होण्याचाही काळ तोच. आशाबाईंना वयाचे पंधरावे वर्ष लागले, तेव्हा देशाला स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले होते. भारताने समाजवादी, धर्मनिरपेक्ष नि उदारमतवादी प्रागतिक विचारांची वाट धरली होती. या मूल्यांचे प्रतिबिंब चित्रपटांतही उमटत होते नि चित्रपटांतल्या पात्रांच्या तोंडी असलेल्या गाण्यांतही उमटत होते.
सुरुवातीला लता मंगेशकरांच्या आवाजाशी मिळताजुळता, मात्र वेगळा पोत असलेला, तरीही त्या काळी शिष्टसंमत असलेली बहुतेक सगळी गाणी लताबाईंना आणि शिष्टसंमत नसणारी गाणी आशाबाईंना मिळत गेली. हेही एकप्रकारचे राजकारणच. पण काळ झपाट्याने सरत होता. जुने आदर्श कोसळू लागले होते. मूल्यव्यवस्था ढासळू लागली होती. जगण्यातली फसफस पृष्ठभागावर येऊ लागली होती. १९६३-६४ विशेषतः पं. नेहरूंच्या अस्तानंतर आदर्शवादाचे इमले गतीने ढासळू लागले होते.
सत्तरीच्या दशकात तर समाजस्वास्थ्यात कमालीचा बिघाड होऊ लागला होता, असंतोष, अस्थिरता, अस्वस्थता येत सारे उलटेपालटे होऊन त्याचे प्रतिबिंब चित्रपटांत उमटू लागले होते. असंतोष, अस्थिरतेची जी काही एक्स्प्रेशन्स होती, ती सारी गाण्याच्या माध्यमातून आशा भोसलेंच्या वाट्याला आली होती. चित्रपट अधिकाधिक नाट्यमय (मेलोड्रॅमॅटिक) होऊ लागले होते आणि साहजिकच त्यात खलनायक, खलनायिका (व्हॅम्प) तसेच अभिसारिकांचा, खुलेआम शृंगारिक हावभाव करणाऱ्या, बोलणाऱ्या “त्या दुसऱ्या स्त्री”चा प्रवेश झाला होता. त्यांच्यासाठीही गाणी लिहिली जाऊ लागली होती. हेलन, बिंदू यांच्यासारख्या अनेक खलनायिका हिंदी चित्रपट सृष्टी गाजवू लागल्या होत्या.
त्यांच्या मुखी असलेली सगळी गाणी सुरुवातीच्या काळात आशाबाईंना मिळू लागली. मात्र, या सगळ्या शिष्टसंमत नसणाऱ्या भावभावनांना आशाबाईंनी अशा ताकदीने जिवंत आणि लोकप्रिय केले, की त्यामुळे त्या नट्या आणि आशाबाईंची बंडखोर अशी प्रतिमा आकारास आली. मात्र त्या चौकटबद्ध आयुष्य नाकारून कधी टोकाचे दुःख, टोकाचा आनंद, टोकाचे नाकारलेपण आणि टोकाचे यश आशा भोसलेंच्या वाट्याला आले. पण या चढउतारात जीवनावरची त्यांची श्रद्धा कधी ढळली नाही…
सगळ्या जणींना मोडू लागलेल्या या चौकटीत एक वेगळे का होईना, पण स्थान मिळत गेले.
आशाबाईंनी आणि या सगळ्या ‘खलनायिकां’नी पितृसत्ताक संस्कृतीत असणाऱ्या “सोज्ज्वळ, शालीन, घरंदाज स्त्रियांच्या” प्रतिमेला तडे दिले आणि काही अंशी भंजनदेखील केले. हे करत असताना, आधुनिक स्त्री ही न-नायिका आहे, “हृदयी पान्हा आणि नयनी पाणी” अशी ती नाही आणि व्यवस्थेच्या सगळ्या मर्यादा न मानणारी पाळणारी असण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करून दिली आहे, हे फारच मोलाचे आहे. (great singer asha bhosle)
बंडखोरीचा अवकाश ताकदीने व्यापला
मंगेशकरांच्या घरातील अस्फुट पातळीवरचे कुटुंबकारण, गायनातली भावंडातील स्पर्धा आणि टोकाचा पितृसत्ताक असणारा भारतीय चित्रपट उद्योग या अशा मोठ्या आव्हानात्मक वातावरणात, आशाबाईंनी जी मिळाली ती गाणी गायली, असेही एका पातळीवर म्हणता येते. अनेकांनी पाणउतारा केला, पैसे बुडवले, अपमानास्पद वागणूक दिली. घरी नवरा छळ करीत असे. शेवटी विभक्त झाल्या. उतारवयात त्यांना मुलीने आत्महत्या करणे आणि कॅन्सरग्रस्त मुलाचा मृत्यू या सारखी भयंकर दुःखे त्यांना सोसावी लागली. मात्र कोणत्याही प्रसंगात आशाबाईंनी कर्तव्यनिष्ठतेशी तडजोड केली नाही, ना नित्याच्या व्यवसायातर्गत राजकारणाचा, हेव्यादाव्यांचा त्यांनी मनावर परिणाम होऊ दिला. सहनसिद्धीच्या आणि आंतरिक ऊर्जेच्या बळाने, नव्या क्षणांचे आनंदाने स्वागत करत त्या गात राहिल्या. सतत नवेनचे शिकत राहिल्या आणि जिथे
जिथे शक्य होते, तिथे तिथे मूल्यवर्धन करत राहिल्या.
खरे पाहता, बंडखोरीचा अवकाश आशाबाईंनी मोठ्या ताकदीने व्यापला होता. म्हणजे, सत्तरच्या दशकातल्या उफाळून आलेल्या बंडखोरीला ‘पिया तू अब तो आजा’ म्हणत त्यांनीच आवाज दिला आणि २००० च्या दशकात ‘बचके तू रहना… ए खल्लास…’ म्हणत आपल्या ठसकेबाज आवाजात त्यांनी नव्यांनाही चकित केले… नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्यांना आशाबाईंच्या आवाजाने साथ दिली. यातही खय्याम, आरडी, हृदयनाथ मंगेशकर आणि नंतरच्या पिढीतल्या ए. आर. रहमान सारख्यांना काही अस्सल काही खणखणीत द्यायचे होते, त्यांनीही आशाबाईंच्या दमदार आवाजावर विश्वास दाखवला होता. (great singer asha bhosle)
परंतु, यासंबंधात नव्वदीच्या दशकातील एक बोचरी आठवण इथे उद्धृत करायला हवी. पत्रकार राजू भारतन आणि हरीश भिमाणी यांच्यापैकी एक जण गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्याशी लताबाई आणि आशाबाई यांच्याबद्दल चर्चा करत होते. त्यावेळी जराशा तिरस्कायुक्त सुरात मजरुह म्हणाले की, “आशा की आवाजसे बाजारूपन आजतक नही गया…” हे छापायचे नव्हते, पण छापून आले आणि आशाबाई ते वाचून खूप दुःखी झाल्या होत्या. आशाबाईंना स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करताना चित्रपटसृष्टीतल्या राजकारणाचा, अपमानाचा, श्रेय नाकारणाऱ्या प्रस्थापितांशी सामना करावा लागला, त्यांच्याशी हरघडी फार मोठा संघर्ष करावा लागला, याची बोचरी आठवण करून देणारा असा हा प्रसंग होता. मात्र, आशाबाई सगळ्या आव्हानांना पुरून उरल्या. पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीतच राहूनच त्यांनी ही चौकट मोडण्याची बंडखोरी केली. आणि इथेच त्यांच्या जिनिअस असण्याचा पहिला आयाम अधोरेखित झाला.
स्त्रीत्वाचा कर्णमधुर जागर आणि ऊर्जस्वल
आशाबाईंच्या जिनिअस असण्याचा दुसरा आयाम आहे, त्यांनी जाहीर न करता केलेल्या स्त्रीत्वाच्या जागराचा ! १९५७साली आलेल्या ‘नया दौर’ या चित्रपटातील “उडे जब जब जुल्फे तेरी कवारीयों का दिल मचले” असे लडिवाळपणे नवतरुर्णीच्या मनातील असोशी, घालमेल इतक्या मधाळ आणि खट्याळ आवाजात आशाबाईंनी व्यक्त केली. मग पुढे येणाऱ्या प्रत्येक दशकांत स्त्री मनाचे गूज, इच्छा, कामना आणि गुपितांना मदभऱ्या आवाजाने जिवंत करण्याचे सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या मोलाचे काम आशाताईंनी अत्यंत ताकदीने आणि सातत्याने केले.
किंबहुना, असेही म्हणता येते की, १९६०, ७० आणि ८० या स्त्री मुक्तीची सेकंड इनिंग मानल्या गेलेल्या दशकांत आशाबाईंनी स्त्रियांच्या नाजूक, अस्फुट, अस्पष्ट आणि दबलेल्या किंवा दाबल्या गेलेल्या सर्व भाव-भावनांना सुरेल अन् मखमली आवाज दिला. त्यात केवळ वात्सल्य भावना नव्हती, प्रेम, आनंद, दुःख, उत्स्फूर्तता, बहार, मौज, रोमान्स, मिलनाची ओढ, व्याकुळता, विरह, असोशी, रती भाव आणि क्लब मधील उच्छृंखल किंवा अगदी छचोर भावनांचा पटच त्यांनी अतिशय उत्कटपणे उलगडून अजरामर केला होता. (great singer asha bhosle)
‘तरुण आहे रात्र अजुनी’ म्हणणाऱ्या प्रेम विव्हळ आतुर तरुणीचे मदभरे आर्जव असो किंवा ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ असे रतिभाव जागृत करणारं शृंगारिक गाणं असो किंवा अगदी ‘चुरा लिया है तुमने जो दिलको,’ अशी प्रेमाची कबुली देणारे तरुणाईचे आवडते गाणे असो किंवा आर्त सुरांत ‘कतरा कतरा मिलती हैं, जिंदगी हैं… प्यासी हूं मैं प्यासी रहने दो’ म्हणत जगण्याची व मिलनाची कर्णमधुर असोशी गात आशाबाईंनी तरुण-तरुणी आणि मध्यमवयीन ते ज्येष्ठ अशा सगळ्यांच्या आयुष्यातील रोमान्स आणि त्याची कोवळीक गाण्यांतून कायम ठेवली. आपल्या प्रत्येक गाण्यातून आशाबाईंनी स्त्रीत्वाचा सोहळा साजरा केला आहे, हेही नोंदवणे आवश्यक आहे.
एरवी, ८ मार्चला ज्याप्रकारे स्त्रीत्वाचे गोडवे गायले जातात आणि त्याच्या अतिरेकाने बेगडीपणाचा संताप येऊ लागतो, तसल्या प्रकारचा खोटा, नावापुरता स्त्रीत्वाचा जागर त्यांनी केलेला नाही हे देखील इथे अधोरेखित केले पाहिजे.
पहिल्या वाहिल्या रॉकस्टार
आशाताईंच्या जिनिअस व्यक्तिमत्वाचा तिसरा आयाम हा त्यांना प्रत्येक दशकातल्या गाण्याच्या शैलीतील बदलेला बॉल गेम कळणे, त्याबरहुकूम स्वतःच्या शैलीत बदल करणे आणि यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या उत्तम पार्टनरशिप्स अर्थात भागीदाऱ्या करणे हा आहे. हा शैलीतला बदल आपल्याला, ‘अच्छा जी मैं हारी, चलो मान जाओ ना’मधील लडिवाळ चढ उतार, मुरके त्यांनी पडद्यावर दिसणाऱ्या मधुबालासाठी घेतले, तेव्हा जाणवला. असाच खास अंदाज आणि सूरस्पर्श त्यांनी झीनत अमान, रेखा, श्रीदेवी, माधुरी, काजोल अशा अनेक नट्यांच्या गाण्यांना दिला. आशाबाईंना आदरांजली वाहताना
झीनत अमान म्हणाल्यादेखील, की आशाबाईंनी ‘दम मारो दम’ या गाण्यात एका तरुण मुलीची अस्वस्थता आणि मुक्त संचार असा काही व्यक्त केला होता, की झीनत यांना फक्त पडद्यावर त्यांच्या विद्रोही सुरांना न्याय द्यायचा होता. (great singer asha bhosle)
काळाशी सुसंगत असणाऱ्या आशाबाईंनी ओ. पी. नय्यर व आर.डी. बर्मन हे संगीतकार आणि मो. रफी व किशोर कुमार हे गायक यांच्या बरोबर दीर्घकाळ युगुलगीते गायिली. ती सगळी गाणी म्हणजे सांगीतिक आनंद देणारा खजिनाच म्हटला पाहिजे. नव्वदीच्या दशकात खुद्द ए. आर. रहमान यांनी आशाताईंना, ‘हो जा रंगीला रे’, ‘तनहा तनहा’, ‘मुझे रंग दे’, ‘राधा कैसे न जले’, ‘कम्बख्त इश्क’ अशी अत्यंत वेगळ्या नि आधुनिक धाटणीची गाणी दिली आणि प्रेक्षकांना या गाण्यांनी अक्षरशः वेड लावले.
कॉन्सर्टमध्ये पार्श्वगायन करायचे नसते, तर तिथे मनोरंजनात्मक परफॉर्मन्स द्यायचा असतो, याची त्यांना नेमकी जाण होती. त्यामुळे त्यांचे अत्यंत उत्स्फूर्त, उत्फुल्ल, अतिशय ऊर्जाप्रवाही आणि बहारदार व्यक्तिमत्व झळाळून उठे. खरे तर आशाबाईंनी जसे कॉन्सर्ट्स सुरू केले, तसे स्वतःचे अधिकच व्यक्तिमत्व खुलवत नेले. उत्तम साड्या, गजरे किंवा मॅचिंग फुले असे ‘पॉवर ड्रेसिंग’ सुरू केले. प्रेक्षकांना जे ऐकायचे आहे, त्यांची उत्सुकता, त्यांची ऊर्जा आपल्याकडे वळवून कैकपटीने ती परत देऊन, वातावरण निर्मिती करण्यात त्या माहीर होत्या. म्हणूनही त्या पहिल्या महिला भारतीय रॉकस्टार होत्या. पुरुष गायकात अर्थातच पहिले रॉकस्टार होते, किशोर कुमार !
नवनवी क्षितिजे धुंडाळली
आशाबाईंनी फक्त भारतीय भाषा आणि संगीतातच रमण्याऐवजी विदेशी संगीतकार आणि गायक यांच्याबरोबर कॉन्सर्ट केले, भागीदाऱ्या केल्या, जुगलबंदी पेश केल्या. हा त्यांच्या जिनिअस असण्याचा चौथा आयाम आहे. नवनवी क्षितिजे धुंडाळणे हा त्यांचा जणू स्थायीभावच होता. आशाबाई प्रयोगशील तर होत्याच. त्यामुळेच त्यांनी अगदी बॉय जॉर्ज, मायकेल स्टाइप, कोड रेड, ब्रेट लीपासून ते क्रोनॉस क्वाटेट ते गोरिलाझ या व्हर्चुअल बँड बरोबर गाणी आणि संगीताचे अगदी आनंदाने, नवनवीन प्रयोग केले. कोण काय म्हणेल, आपल्या अस्तित्वाला धक्का लागेल याची भीती तमा न बाळगता त्यांनी हे प्रयोग केले. (great singer asha bhosle)
गायनातून रस निष्पत्ती करणाऱ्या आशाबाई पाक कौशल्यात देखील निपुण होत्या, हेही एक ओपन सिक्रेटच होते. खाणे आणि खिलवणे याची अत्यंत आवड असणाऱ्या आशाबाईंनी ‘आशाज्’ नावाने दुबई, इंग्लंड आणि इतर काही देशात रेस्टॉरंट्स काढली. त्यात त्यांनी गाण्याइतकाच रस घेतला.
‘आशा भोसले’ नामक मदभरा, सगळे रस किंवा भावभावनांचा परिपोष करणारा आवाज, विलक्षण हुन्नर असणारी गायिका अशी ओळख आणि ७० वर्षांपेक्षा अधिकची सांगीतिक कारकीर्द असलेल्या आशाबाईंच्या चिरकालीन ठरणाऱ्या वारशाची तुलना दुसऱ्या एका भुरळ घालणाऱ्या व्यक्तिमत्वाशी होऊ शकते, ती म्हणजे मर्लिन मत्रो ! दोघींमध्ये अनेक साधम्र्ये आहेत. जसे की, सौंदर्य, निरागसता, मादकता, कलात्मकता, करिष्मा आणि तीव्र बुद्धी, जिनिअस दडवून ठेवण्याचे कसब ! दोघींमधले वैधर्म्य असे, की मर्लिनने स्वतःला पस्तिशीतच संपवून टाकले आणि आशाबाई मात्र सगळी दुःखे सोसत, आव्हाने पेलत, स्वतः कला आणि कामगिरी अधिकच धारदार करत गात राहिल्या जणू आकाशातला एक अढळतारा त्यांचा मार्गदर्शक वाटाड्या होता. म्हणूनच आशाबाई जिवंतपणीच एक लिजंड आणि आयकॉन बनल्या !
समरसून जगण्याची विलक्षण हातोटी
मर्लिनचा आयक्यू अर्थात बुद्धांक १६५-१६८ च्या मध्ये होता, असे म्हणतात. आशाबाईंचा आयक्यू कुणी काढला नसावा. मात्र त्यांचाही आयक्यू १६० च्या जवळ असणार. तसेच त्यांचा ईक्यू (इमोशनल कोशंट-भावनांक) देखील मोठा असणार, याचे कारण प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचा त्यांचा चिवटपणा, सतत नवे करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी त्यांच्यात टिकून राहिलेली उर्मी. याचमुळे त्यांचे गाणे अखेरच्या श्वासापर्यंत थांबले नाही. संपले नाही. ऐंशीच्या वयात देखील आवाजातील माधुर्य, कोवळीक, नजाकत, निरागसता टिकवण्याची किमया त्यांनी साधली. (great singer asha bhosle)
त्यांच्या स्वभावातील आनंद, निरागसता, जगण्यावरील प्रेम आणि सगळ्या मानवी भावभावना समरसून जगण्याची विलक्षण हातोटी यामुळे ते शक्य झाले.
आशाबाई नेहमी म्हणे, की त्या तासन्तास रियाझ करत, रेकॉर्डिंग स्टुडिओत थांबत, एकदा का गाणे रेकॉर्ड झाले की त्या तिथून तडक निघून जात. कुणाशी बोलणे नाही की काही सांगणे नाही. त्यांचा लगाव, ठहराव आणि तन-मन बांधिलकी होती ती सुरांशी! त्यामुळेच त्या फक्त गात राहिल्या, निर्व्याज आनंदाने. या मौलिक बंडखोरीची, समृद्ध करणाऱ्या मुशाफिरीची आणि आधुनिक मूल्यांच्या स्वीकाराची त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. त्यांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा सतत चढणारा आलेख आणि त्यांची १२ हजारांहून सुरेल गाणी, असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजलेली दीर्घ कारकीर्द आणि सांगीतिक वारसा मात्र असंख्य पुस्तकं -विश्लेषणं अनेक पिढ्या करतील, हे मात्र नक्की. ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या पंडित भास्कर चंदावरकरांच्या गाण्यातून लहान मुलांना आशाबाई भेटत राहतील. ‘चुरा लिया सारख्या असंख्य रोमँटिक गाण्यांतून तरुणाईचा रोमान्स अधिकच खुलवत राहतील आणि आनंद, उन्मेष आणि गहिऱ्या भावनांनी समस्त लहानथोरांना रिझवत राहतील…
वयाच्या पंधराव्या वर्षी आशा मंगेशकरच्या, आशा भोसले काय झाल्या. सुरांच्या दुनियेत बंडखोरीलाही एक आशास्थान मिळाले !
(समतावादी मुक्त संवाद पत्रिकेवरून साभार, लेखिका गायत्री चंदावरकर या समाज, संस्कृती आणि साहित्याच्या आस्वादक आहेत.)