मुंबईः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दुर्मीळ दस्तावेजांचे जतन करून संग्रही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यासंदर्भातील निवेदन विधिमंडळात केले. ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी या दुर्मीळ दस्तावेजांचे संकलन आणि जतन केले आहे. त्यासंदर्भात कदम यांना सन्मानजनक मोबदला देऊन त्यांच्याकडील ऐतिहासिक ठेवा आपल्या संग्रही ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेलार यांनी जाहीर केले. (Samyukt Maharashtra Documentation)
तरुण पिढीसाठी उपयुक्त
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदविली गेली. या चळवळीमध्ये १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. या चळवळीच्या रेट्यामुळेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज वयाची साठी पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरी तो पुढील पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचे महत्त्व तरुण पिढ्यांना ज्ञात झाले पाहिजे या हेतूने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी त्यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाचा ऐवज शासनाने जतन करावा अशी विनंती केली होती. शासनाच्या याबतच्या समितीमार्फत त्याचे परिक्षण व मूल्यांकन करुन सांस्कृतिक कार्य विभागाने हा ठेवा आपल्या संग्रहात घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Samyukt Maharashtra Documentation)
कुमार कदम यांच्याकडून संग्रह
श्री. कुमार कदम यांनी पदरमोड करुन अतिशय मेहनतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा दुर्मिळ ठेवा आपल्या संग्रही जतन केला होता. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १५० दुर्मिळ छायाचित्रे व त्यामध्ये भाग घेतलेल्या नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या या मुलाखतींची संख्या ३५ एवढी असून त्यांचा कालावधी सुमारे एक हजार २५८ मिनिटे एवढा आहे. (Samyukt Maharashtra Documentation)
यामध्ये मधू शेट्ये, दिनू रनदिवे, शिरीष पै, अहिल्याताई रांगणेकर, बाबा आढाव, भाई वैद्य, शाहीर लिलाधर हेगडे, एन डी पाटील, नारायण आठवले, बाळ देशपांडे, कमल भागवत, श्रीमती हौसाबाई मोरे-पाटील, मालिनी तळपुळे, मृणाल गोरे, डॉ. बापूसाहेब काळदाते, आचार्य शांताराम गरुड, दताजी ताम्हणे, मोहन धारिया, गणेश प्रभाकर प्रधान, प्रभाकर काशीनाथ कुंटे, नागनाथअण्णा नायकवडी, कॉम्रेड यशवंत चव्हाण, मधू जोशी, मधुकर पागे, बापूसाहेब पुजारी, बबनराव क्षीरसागर, रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी, गजानन हुद्दार, वसंतराव रंगनाथ होशिंग, अॅड. राम महादेव आपटे, परशुराम नंदिहळ्ळी, कॉ. कृष्णा मेणसे, अशोक याळगी, वसंतराव पाटील, नारायणराव तरळे व शाहीर लीलाधर हेगडे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश आहे.
संशोधक, विद्यार्थ्यांसाठी दालन
मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतर पत्रव्यवहार आदी दस्तऐवजाचा यामध्ये समावेश आहे. (Samyukt Maharashtra Documentation)
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात भाग घेतलेल्या या व्यक्तींपैकी आज बऱ्याचशा व्यक्ती हयात नाहीत. त्यामुळे या मुलाखतींना अनन्यसाधारण महत्व आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली.
या निर्णयामुळे संशोधक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माहितीचे एक नवीन दालन उपलब्ध होणार आहे.



