मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमून त्यांनी महाराष्ट्रात पक्षविस्ताराकडे लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात अखिलेश यादव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ते धुळे आणि मालेगाव या दोन मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दोन्ही ठिकाणी एमआयएमचे आमदार असल्यामुळे याठिकाणी समाजवादी पक्षाला यश मिळू शकते, अशी त्यांची धारणा आहे. (Akhilesh Yadav)
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला चांगले यश मिळाल्यामुळे उत्तर प्रदेशच्या बाहेरही पक्षाचा विस्तार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, महाराष्ट्र हा त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुस्लिम मतांवर दावेदारी करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’सोबत उत्तर प्रदेशातही त्यांचा संघर्ष आहे. त्यामुळे त्यांनी धुळे आणि मालेगावपासून सुरुवात करण्याचे ठरवल्याचे सांगण्यात येते. उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार ही आपली हक्काची मतपेढी असल्याचा अखिलेश यांचा दावा आहे. तोच दावा मजबूत करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीतील पक्षांसोबत केंद्रात ते इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र असले तरी महाराष्ट्रातही आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. महाविकास आघाडीने त्याचा विचार केला नाही, तर सुमारे बारा जागांवर स्वतंत्रणे लढण्याची व्यूहरचना समाजवादी पक्षाने केल्याचे सांगण्यात येते. (Akhilesh Yadav)
लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. उत्तर प्रदेश, बिहारच्या मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या तसेच मुस्लिम बहुल असलेल्या महाराष्ट्रातील मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले असून अशा बावीस जागांवर चाचपणी करण्यात येत आहे. विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्रात समाजवादी पक्षाला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. भिवंडी पूर्वमधून रईस शेख आणि मानखुर्द शिवाजीनगर येथून अबू असीम आझमी निवडून आले होते. या दोन्ही जागांव्यतिरिक्त इतर दहा जागा लढवण्यासाठी पक्ष इच्छुक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढणार आहेत. केंद्रातील इंडिया आघाडीत असलेल्या प्रमुख पक्षाला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीवरील दबाव वाढला आहे. हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला असला तरी समाजवादी पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात काँग्रेससह आघाडीतील अन्य पक्ष कितपत लवचिक धोरण स्वीकारतात, हा खरा प्रश्न आहे. समाजवादी पक्षाच्या रडारवरील काही जागा मुंबईतील असल्यामुळे शिवसेनेसाठीही त्यांची अडचण होणार आहे, त्यामुळे समाजवादी पक्षाला सोबत घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मविआचे नेते समाजवादी पक्षासाठी किती जागा सोडण्यास तयार होतात आणि समाजवादी पक्ष किती जागांवर तडजोड करतो, यावर भविष्यातील राजकारण अवलंबून आहे. आधीच जागावाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरू असताना, समाजवादी पक्षाच्या नव्या पवित्र्यामुळे आघाडीची अवस्था ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्यांनी धाडले घोडे….’ अशी झाली आहे. उत्तर प्रदेशातून आलेले घोडे नव्हे, पण समाजवादी पक्षाची सायकल आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचे आव्हान महाविकास आघाडीपुढे आहे.
हेही वाचा :
- ‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना
- अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू