नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. न्यायालयात न्यायमूर्तींना शिवीगाळ करत कागदपत्रे हवेत फेकणाऱ्या याचिकाकर्त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळजबरीने न्यायालयाबाहेर काढले.न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. (Petitioner causes a scene in the Supreme Court)
याचिकाकर्ता प्रबल प्रताप स्वतःच न्यायालयात आपली बाजू मांडत होता. मात्र सुरुवातीपासूनच त्याची भूमिका आक्रमक होती. सुनावणी सुरू होताच त्याने न्यायालयाला उद्देशून, “मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट, मी तुम्हाला आदेश देतो की लखनौचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या,” असे म्हटले.
त्यावर आश्चर्य व्यक्त करत न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी विचारले, “तुम्ही आम्हाला आदेश देत आहात? आम्हालाच आदेश देता आहात?”यावर प्रताप म्हणाला, “माझ्याकडून एवढेच. सर्व काही नोंदीवर आहे.”
याचिकाकर्त्यांने कागदपत्रांचे बंडल हवेत फेकले
यानंतर त्याने अचानक न्यायालयातील कागदपत्रांचे बंडल हवेत फेकले आणि न्यायालयातच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला न्यायालयाबाहेर नेले. (Petitioner causes a scene in the Supreme Court)
नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.आदेशात म्हटले आहे, “हे प्रकरण पुकारल्यानंतर स्वतःच याचिकाकर्ता म्हणून उपस्थित असलेल्या प्रबल प्रताप यांनी प्रकरण मांडण्याऐवजी विसंगत आणि असंदीय भाषेतील विधाने केली.”
न्यायालयाचा कारवाई न करण्याचा निर्णय
न्यायालयीन शिस्तीचा भंग झाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात कठोर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. आदेशात न्यायालयाने म्हटले आहे, “सदर याचिकाकर्त्याची परिस्थिती लक्षात घेता त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा आमचा सध्या विचार नाही.”
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने एप्रिल २०२६ मध्ये दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेच्या गुणदोषांवर विचार केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचे नमूद केले. त्यामुळे याचिका फेटाळून लावण्यात आली. (Petitioner causes a scene in the Supreme Court)