मुंबई : प्रतिनिधी : ‘भाजप मुर्दाबाद’, ‘अमित शाह मुर्दाबाद’ या घोषणा दिल्याने हद्दपारी कशी होऊ शकते? असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. नागरिकांवर खटले दाखल करुन सरकार त्यांना गुलाम बनवत आहे का? असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Externment for raising slogans)
सय्यद अहमद अब्दुल वहिद चौधरी (वय ४९) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. चौधरी हे सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस आहेत. नागरिकत्व कायद्यातील सुधारणा आणि ज्ञानवापी मशीद वाद संदर्भात मोर्चे आणि धरणे आंदोलनात चौधरी यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी त्यांना एक वर्षे हद्दपार केले होते. मुंबई आणि आसपासच्या परिसरातून एक वर्षे हद्दपारीच्या विरोधात चौधरी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती जामदार यांनी हद्दपारीचा आदेश रदद केला. (Externment for raising slogans)
सुनावणीच्यावेळी न्यायमूर्ती जमादार यांनी ‘भाजप मुर्दाबाद’, ‘अमित शाह मुर्दाबाद’ या घोषणा दिल्या म्हणून तडीपारी कशी होऊ शकते? असा सवाल पोलिसांना केला. तसेच सरकारच्या निर्णयांना विरोध करणे हे एकाद्याला तडीपारीचे कारण असू शकत नाही असे सुनावले. तसे केल्यास व्यक्तीच्या भाषण स्वातंत्र्यावर आणि त्याच्या सन्मानने जगण्याच्या अधिकारावर गदा येईल, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. पोलिस हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत तर ते जनतेचे सेवक आहेत, असेही पोलिसांना सुनावले. (Externment for raising slogans)