Home » Blog » सचिन अहिर यांच्या फुटीमुळे ठाकरेंच्या मुळावर घाव

सचिन अहिर यांच्या फुटीमुळे ठाकरेंच्या मुळावर घाव

आदित्य ठाकरे यांचे राजकीय भवितव्य टांगणीला

0 comments
  • विजय चोरमारे

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले आणि पक्षाच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्हही ताब्यात घेतले. केंद्रातील महाशक्तीच्या पाठिंब्यावर त्यांनी सगळा खेळ केला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सहा खासदार त्यांनी फोडले. आता ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देत शिंदे यांनी ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनाच आपल्याकडे घेतले आहे. पक्षफुटीनंतरचा ठाकरे यांना दिलेला हा मोठा धक्का मानला जातो. कारण हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असून वरळी मतदारसंघातील त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सचिन अहिर गेले, आता मिलिंद नार्वेकर कधी जाणार, याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

शिंदे यांचा सूचक इशारा

विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीची चर्चा अलीकडे सुरू होती. नीलम गो-हे यांना उमेदवारी पुन्हा मिळणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच महाविकास आघाडीच्यावतीने उपसभापतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीरही झाली. मात्र मंगळवारी सकाळी अचानक शिंदे गटाच्या नेत्यांसोबत सचिन अहिर उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करायला गेले. तो सहा खासदारांच्या फुटीपेक्षा मोठा धक्का होता. आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ती शिंदे यांच्या जिव्हारी लागली होती. त्यावेळी त्यांनी तुम्हाला आणखी धक्के बसणार आहेत, असा इशारा दिला होता. तो इशारा थेट आदित्य ठाकरे यांच्यासाठी असल्याचे आजच्या घडामोडीमुळे स्पष्ट झाले. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

आधी पवारांना सोडले, आता ठाकरेंना

सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते मानले जात असत. अर्थात सचिन अहिर हे शरद पवारांचे विश्वासू असताना त्यांनी पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी ठाकरेंच्या विश्वासाला तडा दिला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत सहा खासदार ठाकरेंचं शिवबंधन सोडून शिवसेनेत गेले असतानाच आता सचिन अहिर यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर काय परिणाम होणार आहे, हे नेमके समजून घेऊया. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

आदित्य ठाकरे यांचे घटते मताधिक्य

२०१९ ला एकत्रित शिवसेना असताना आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उमेदवारी जाहीर केली. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळे त्याची देशभर चर्चा झाली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८ म्हणजे ७२.७० टक्के मते मिळाली होती. त्यावेळी त्यांचे मताधिक्य होते ६७ हजार ४२७. त्यांच्यासमोर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एड सुरेश माने उभे होते. ती निवडणूक औपचारिकच होती.

मात्र २०२४ ला परिस्थिती बदलली. एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले होते. शिंदे सत्तेत होते आणि मुख्यमंत्री होते. त्यांनी मिलिंद देवरा यांना वरळीतून उमेदवारी देऊन आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना ६३ हजार ३२४ म्हणजे ४४.६८ टक्के तर मिलिंद देवरा यांना ५४ हजार ५२३ म्हणजे ३८.४७ टक्के मते मिळाली होती. मनसेने संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले होते, त्यांना १६ हजार ३६७ म्हणजे १३.६६ टक्के मते मिळाली होती. आदित्य ठाकरे यांच्या विजयाचे अंतर २०१९च्या  ६७ हजारांवरून २०२४ ला ८ हजारांवर आले होते. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

आणि आता तर आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराची सूत्रे ज्यांच्याकडे होती, त्या सचिन अहिर यांनीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याअर्थाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा पक्षफुटीनंतरचा मोठा धक्का आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील भवितव्यावरच या प्रवेशाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कदाचित २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर हेच आदित्य ठाकरे यांचे प्रतिस्पर्धी असतील. घोडामैदान लांब आहे. अजून ब-याच घटना घडामोडी घडणार आहेत. परंतु आतासारखीच परिस्थिती राहिली तर आदित्य ठाकरे वरळीतून पुन्हा नशीब अजमावणार का, याची चर्चा पुढील काळात होत राहील.

कोण आहेत सचिन अहिर? Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena

१९९९ मध्ये सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. पुढे २००४ आणि २००९ मध्येही त्यांनी आमदारकी राखली. २००९ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. ते राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपदही भूषवत होते. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी सुरक्षित करण्याच्यादृष्टिनेच शिवसेनेने केलेली ही व्यूहरचना होती.

सचिन अहिर यांनी १९९३ मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. सचिवपद भूषवल्यानंतर ते या संघटनेचे अध्यक्ष झाले. १९९६ पासून ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचेही प्रमुख राहिले. त्यांनी माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा युनियन इत्यादींचेही नेतृत्व केले. सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. वरळी फेस्टिव्हल आणि दहीहंडीच्या काळात त्यामार्फत मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

वरळी अहिरांचा बालेकिल्ला

वरळी हा सचिन अहिर यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे २०१९ आणि २०२४ मध्ये आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा महत्त्वाचा सहभाग मानला जातो. २०२० मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्यावर पुणे संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडल्याबद्दल २०२२ मध्ये त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती. (Sachin Ahir Joins Eknath Shinde Shivsena)

सचिन अहिर यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा काळ २०२८ पर्यंत आहे. परंतु बदलती राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी सोयीचा मार्ग पकडलेला दिसतो. एकनाथ शिंदे हात धुवून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मागे लागले आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. आणि ठाकरे यांचे विश्वासू म्हटले जाणारे लोक त्यांच्या गळाला लागत आहेत. यातून महाराष्ट्राती बदलती राजकीय संस्कृती दिसत आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00