कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. गोकुळचे माजी संचालक करणसिंह गायकवाड आणि जिल्हा परिषद माजी सदस्य योगीराज गायकवाड, इंद्रजीत गायकवाड यांच्या त्या मातोश्री तर माजी आमदार स्वर्गीय संजयसिंह गायकवाड यांच्या पत्नी होत. (Sanjivanidevi Gaikwad passes away)
संजीवनीदेवी यांचा जन्म शाहूवाडी तालुक्यातील सरुड या गावी शेतकरी कुटुंबात झाला. माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संजयसिंह गायकवाड यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात त्या सहभागी होत्या. २००० साली आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर झालेल्या शाहूवाडी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. पोटनिवणुकीत त्या निवडून आल्या. चार वर्षे त्यांनी विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. गोकुळ दूध संघात त्या १० वर्षे संचालिका होत्या. (Sanjivanidevi Gaikwad passes away)
सोमवारी सकाळी ११ वाजता नागाळा पार्क येथील करणसिंह गायकवाड यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रेस सुरूवात झाली. त्यानंतर पंचगंगा नदी जुना बुधवार पेठेतील गायकवाड वाडा येथे अंत्ययात्रा आला. तिथे जुना बुधवार पेठ आणि शाहूवाडीतील ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sanjivanidevi Gaikwad passes away)